नवीन माध्यमांचा उदय फार झपाटय़ाने झाला असला तरी नाटक हे माध्यम त्यातही टिकून राहील, असा आशावाद ज्येष्ठ रंगकर्मी डॉ़  मोहन आगाशे यांनी मंगळवार येथे व्यक्त केला. ते म्हणाले की, आता आपल्यापुढे अनेक पर्याय आहेत हे खरे आहे, त्याचबरोबर प्रेक्षकांचा एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याचा कालावधीही कमी होत चालला आहे. अलीकडच्या काळात लोक चोखंदळ बनले आहेत. पूर्वीच्या काळात लोकांपुढे फार पर्याय नव्हते. आता तुम्ही जेव्हा कॉफीच्या दुकानात जाता तेव्हा कॉफी मागत नाही, कॅपस्युयानो मागता. त्याचप्रमाणे नाटकाला आता अनेक स्पर्धक आहेत. असे असले तरी नाटय़सृष्टी घडते आहे, प्रगत होते आहे. चांगली नाटके केव्हाही चालणारच, ती प्रेक्षकांना खेचून घेणार याविषयी आपल्या मनात शंका नाही.
‘पार’, ‘गांधी’, ‘अपहरण’ यासारख्या अनेक चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या आगाशे यांनी सांगितले की, आता फक्त एक आव्हान आहे ते म्हणजे समकालीन अभिरूची व शैलीत नाटकांना बसवावे लागेल. तसे केले तरच इतर कलाप्रकारांइतकेच प्रेक्षक नाटकालाही मिळू शकतील.
लिलेट दुबे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आधे अधुरे’ नाटकाचा प्रयोग व्होडाफोन ओडिऑन नाटय़ महोत्सवात होत असून त्यानिमित्त आगाशे येथे आले असता त्यांनी वृत्तसंस्थेला खास मुलाखत दिली.
विजय तेंडुलकर यांच्या ‘घाशीराम कोतवाल’ नाटकात नाना फडणवीसांची भूमिका त्यांनी अधिक प्रभावीपणे साकारली होती. ते म्हणाले की, कोलकात्यात ८० च्या दशकात जेव्हा आपण घाशीराम कोतवाल नाटकाच्या प्रयोगात काम केले होते त्या वेळी प्रेक्षक अतिशय मंत्रमुग्ध झाले होते. त्यांनी या नाटकाला समरसून दाद दिली होती, त्याची आठवण अजूनही येते.
मराठी व बंगाली नाटय़सृष्टीत अनेक साम्यस्थळे आहेत, असे सांगून ते म्हणाले की, या दोन्ही राज्यात नाटय़कर्मी व प्रेक्षक यांना नाटय़कलेची खूपच आवड आहे. चांगली नाटके ही नेहमी त्यात समरसून जाणाऱ्या प्रेक्षकांमुळे टिकतात, असेही ते म्हणाले.