नासाच्या पहिल्या व्यावसायिक अवकाश वाहनातून उड्डाणासाठी चार अवकाशयात्रींची निवड करण्यात आली असून त्यात भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स हिचा समावेश करण्यात आला आहे.
सुनीता विल्यम्स हिच्याबरोबर रॉबर्ट बेनकेन, एरिक बो व डग्लस हर्ले यांची निवड झाली असून त्यांना व्यावसायिक उड्डाणासाठी प्रशिक्षण दिले जाईल. खासगी क्षेत्राने तयार केलेल्या अवकाश वाहनातून हे अवकाशयात्री अंतराळात जातील. पृथ्वीनिकटच्या कक्षेत सामान घेऊन जाण्यासाठी हे वाहन उपयोगी पडणार असून २०३० पर्यंत मंगळावर जाण्याचे उद्दिष्ट गाठण्याची ती पहिली पायरी मानली जात आहे. नासाचे प्रशासक चार्लस बोल्डन यांनी सांगितले की, आम्ही निवड केलेले अवकाशयात्री एक दिवस इतिहास घडवतील व अमेरिकी लोक मंगळावर पाऊल ठेवतील. हे चारही अवकाशयात्री बोईंग कंपनी व स्पेस एक्स यांच्याबरोबर  काम करणार आहेत.