राज्यसभेचे उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांचे नाव जोडले गेल्याने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या महिला आघाडीने १९९६च्या सूर्यनेल्ली सामुहिक बलात्कार प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी बुधवारी केली. 
केरळमधील कॉंग्रेस नेतृत्त्वाखालील युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट या आघाडीने या विषयाची नव्याने चौकशी करता येणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर तेथील विरोधी पक्षांनी विधानसभेत हा मुद्दा लावून धरला.
राज्य सरकारने या विषयाची नव्याने चौकशी न करण्याची घेतलेली भूमिका म्हणजे पीडितेवर आणि तिच्या कुटुंबीयांवर अन्याय करण्यासारखे आहे. सरकारच्या आडमुठेपणामुळे देशातील महिलांनाही न्याय नाकारल्यासारखेच आहे.
या घटनेतील पीडितेने आपल्या वकिलांना लिहिलेल्या पत्रामुळे कुरियन यांचे नाव पुढे आले. पीडितेने २९ जानेवारीला लिहिलेल्या पत्रात या प्रकरणी फेरयाचिका दाखल करता येईल, याची विचारणा वकिलांकडे केली. त्याचवेळी कुरियन यांच्याविरुद्ध नव्याने चौकशीची मागणीही तिने केली आहे.
दरम्यान, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वृंदा कारत यांनी कुरियन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. नव्याने काही पुरावे हाती लागले असल्याने या प्रकरणाची फेरचौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.