संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला लक्ष्य केले जाणार आहे, हे लक्षात आल्यावर केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दोन पावले मागे येण्याचे ठरविले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे हे भाजपच्या नेत्यांच्या संपर्कात असून, गरज पडल्यास हिंदू दहशतवादाबद्दल केलेले विधान मागे घेण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे.
शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांशी संपर्क साधून हिंदू दहशतवादावरून केलेल्या विधानावरून संसदेमध्ये फार मोठा गोंधळ होऊ नये, यासाठी नव्याने आपली भूमिका मांडणारे वक्तव्य करण्याची तयारी दाखविली. मात्र, शिंदे काहीतरी थातूरमातूर बोलून वेळ मारून नेतील, अशी शंका आल्याने ते जोपर्यंत आधीच्या वक्तव्याबद्दल माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आमच्या भूमिकेत बदल करणार नाही, असे भाजपच्या नेत्यांनी ठरविले आहे.
शिंदे हे लोकसभेचे नेते आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृह नेते म्हणून त्यांच्या सर्व कामकाजावर बहिष्कार घालण्याचे भाजपच्या नेत्यांनी ठरविले आहे. त्यांनी जर पक्षनेत्यांची बैठक बोलावली, तर त्यावरही पक्ष बहिष्कार घालणार आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भगव्या दहशतवाद्यांची शिबिरे चालवतात, असे वक्तव्य शिंदे यांनी जयपूरमधील अधिवेशनात केले होते.