अफगाणिस्तानमधील महत्त्वाचे शहर असलेल्या कुंडझच्या काही भागांवर तालिबानने ताबा मिळविला आहे. अमेरिकेने केलेल्या पाडावानंतर तालिबानने पहिल्यांदा एखाद्या शहरावर ताबा मिळविला आहे.
काबूलपासून २५० किमी उत्तरेकडे कुंडझ हे महत्त्वाचे शहर आहे. नाटो सैन्याने तालिबानचा पाडाव करताना २००१ मध्ये तालिबानला या शहरातून हुसकावून लावले होते. नाटोने २०१४ मध्ये आपले सैन्य माघारी बोलाविल्यानंतर अफगाणिस्तानच्या सैन्याकडे सूत्रे सोपविण्यात आली होती. यानंतर तालिबान पुन्हा सक्रिय झाले होते. मात्र महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळविण्यात त्यांना अपयश येत होते. अखेर या शहराच्या काही भागांवर ताबा मिळविण्यात तालिबानी दहशतवादी यशस्वी झाले आहेत.
कुंडझ शहराच्या आसपास आणि काही भागांत तालिबानचे सशस्त्र दहशतवादी दिसत आहेत. काही नागरिकांच्या हवाल्यानुसार तालिबानचे दहशतवादी रविवारी पहाटे ३ वाजता शहराच्या एका जिल्ह्य़ात घुसले आहेत. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणापासून ते फक्त एक किमी लांब आहेत. तसेच त्यांनी एक २०० खाटांचे इस्पितळही ताब्यात घेतले आहे.
तर अफगाणिस्तान पोलिसांच्या प्रवक्त्याच्या दाव्यानुसार तालिबानने शहरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला मोठा प्रतिकार केल्याने त्यांना माघारी परतावे लागल्याचे म्हटले आहे. तर लष्करी अधिकाऱ्यांनी ३५ दहशतवाद्यांना ठार केल्याचे सांगितले आहे.