तामिळनाडूला १० हजार क्युसेक्स पाणी द्यावे, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या निषेधार्थ कर्नाटकातील काही भागांत कन्नड संघटनांनी निदर्शने करून आणि हरताळ पाळला त्यामुळे अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने येथील सत्यमंगलमहून मैसूरला जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे.
शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ८०० हून अधिक ट्रक, ३०० व्हॅन आणि २०० अन्य वाहने सत्यमंगलम, बन्नारी चेक-पोस्ट आणि थिंबमजवळ थांबवून ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तामिळनाडू-कर्नाटक सीमेवरील कराप्पलम आणि पुझिंजुरे येथे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
वाहनांची ये-जा होत नसल्याने व्यापारी आणि घाऊक बाजारपेठेतील दुकानदारांना दोन दिवसांत पाच कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.
 म्हैसूर आणि चामराजनगर येथे पाठविण्यासाठी जाईच्या फुलांच्या घाऊक विक्रेत्यांनी फुले खरेदी केली नाहीत. त्यांनी सत्यमंगलमच्या खासगी बाजारपेठेतच फुलांची विक्री केली.
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी, तामिळनाडूला दररोज १० हजार क्युसेक्स पाणी देण्याचा, अंतरीम आदेश दिला. राज्यांना किती पाण्याची गरज आहे त्याचा निर्णय घेण्याचा आदेशही कावेरी पाहणी समितीला दिला. न्यायालयाच्या आदेशानुसार कर्नाटकने गुरुवारी रात्रीपासून कृष्ण राजा सागर जलाशयातून तामिळनाडूला पाणी सोडण्यास सुरुवात केली.