सर्वोच्च न्यायालयाने उपहार चित्रपटगृह आग दुर्घटनाप्रकरणी ६० कोटी रुपये भरपाई देण्याचे आदेश अन्सल बंधूंना दिले असले तरी पीडितांनी दिल्ली सरकारने ही मदत स्वीकारण्यास नकार द्यावा, अशी मागणी केली आहे. या प्रकरणी दिल्ली सरकारने कायदेशीर सल्ला घेण्याचे आश्वासन पीडितांना दिले आहे.
उपहार आग दुर्घटनेतील पीडित संघटनेने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेत नुकसानभरपाई स्वीकारण्यास नकार दिल्यावर दिल्ली सरकारने कायदेशीर सल्ला घेण्याचे आश्वासन दिले. अर्धा तास झालेल्या चर्चेदरम्यान पीडितांनी ६० कोटी रुपयांची भरपाई नाकारण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांना दिला असून दोषींना कठोर शासन करण्याची मागणी केली.
पीडितांच्या ६० कोटी रुपयांची भरपाई नाकारण्याच्या मागणीबाबत दिल्ली सरकार कायदेशीर सल्ला घेणार आहे. या प्रकरणी पीडितांनी आरोपींना अधिक कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केल्याची माहिती दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. पीडितांनी ही मानवनिर्मित दुर्घटना असल्याचाही आरोप केला आहे. दिल्ली सरकारने अन्सल बंधूंच्या मदतीने पीडितांसाठी उपचार केंद्र उभारू नये, अशी मागणीही पीडितांकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पीडितांच्या उपचार केंद्र उभारण्यास लागणारा आवश्यक निधी दिल्ली सरकारकडे उपलब्ध असून त्यांनीच हे उपचार केंद्र उभारावे, अशी मागणी करण्यात येत आहे.