शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला असतानाच, याच मुद्यावर चर्चेसाठी उभयदेशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी  एकत्र यावे आणि ‘सुसंवाद’ सुरु करावा अशी अपेक्षा पाकिस्तानी उच्चाधिकाऱ्यांनी भारताकडे व्यक्त केली आहे.
भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषा शस्त्रसंधी उल्लंघन प्रकरणी उभयदेशांमध्ये चर्चा व्हावी अशी अपेक्षा प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीतून पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हीना रब्बानी खार यांनी व्यक्त केली होती. तोच धागा पकडत पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयातील उच्चाधिकाऱ्यांनीही भारतीय अधिकाऱ्यांकडे ‘सुसंवादा’ची गरज अधोरेखित केली.
भारताने चर्चेच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून हीना रब्बानी खार यांच्या आवाहनाबद्दल भारताने समाधान व्यक्त केले असल्याचे पाकिस्तानी उच्चाधिकाऱ्यांनी सांगितले. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मतभेद केवळ चर्चेच्या मार्गानेच सुटू शकतात आणि मात्र यासाठी परिस्थिती अनुकुल होण्यास थोडा वेळ द्यावा लागेल असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.