नेटकऱ्यांची, लघुसंदेशाची भाषा, ट्विटरवर ट्विट करताना वापरली जाणारी भाषा, फेसबुकवर ‘कमेंट्स’ लिहिताना वापरली जाणारी भाषा.. एकंदरच सोशल नेटवर्किंगवरील भाषा ही कोणाला आवडो न आवडो आजच्या युगाची भाषा झाली आहे. आता या भाषेतील काही शब्दांना तर ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोषातील स्थानाचे कोंदण प्राप्त झाले आहे!
‘टीएचएक्स’, ‘ट्विटेबल’, ‘डंबफोन’, ‘टचलेस’, ‘रेंज अँक्झायटी’, ‘क्रफ्ट’, ‘सोशल शेअरिंग’ या शब्दांचा जगभर प्रतिष्ठा असलेल्या ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोषात समावेश झाला आहे.
भाषेच्या बाबतीत सोवळे मानणाऱ्या, प्रत्येक शब्द तावूनसुलाखून घेऊन, त्याची सत्त्वपरीक्षा घेऊन मगच त्याचा शब्दकोषात समावेश करण्याची ऑक्सफर्डची पद्धत असल्यामुळे नेटयुगातील भाषेतील या शब्दांना प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या शब्दकोषात स्थान मिळाल्याने प्रसारमाध्यमांमध्ये सध्या याविषयी जोरदार चर्चा आहे.
ऑक्सफर्डची पद्धत आहे कशी?
* आपल्या शब्दकोषात इतर कोणत्याही भाषेतील शब्दाला स्थान देण्याची ऑक्सफर्डची एक विशिष्ट अशी कार्यपद्धती आहे. त्या शब्दाची, म्हणीची व्याप्ती, तो कितीजणांकडून वापरला जातो, त्याचा अर्थ काय वगैरे कसोटय़ा ऑक्सफर्डतर्फे लावल्या जातात.
* एखादा शब्द ऑक्सफर्डच्या शब्दकोषात समाविष्ट व्हावा असे लोकांकडून सुचवले जात असेल किंवा ऑक्सफर्डचे तज्ज्ञांचे पथकच त्याची शिफारस करत असेल तर त्या शब्दाचा समावेश शब्दकोषात करण्याचा निर्णय घेतला जातो, असे समजते.
* निव्वळ तरुणांकडूनच एखादा शब्द वापरला जात असेल तर एवढय़ा कारणासाठी त्याचा समावेश ऑक्सफर्डमध्ये केला जात नाही.
* एखाद्या शब्दाची शहानिशा करण्यासाठी प्रसंगी ऑक्सफर्डचे व्यवस्थापन तज्ज्ञांचा सल्ला घेते.
* नव्या शब्दाचा समावेश आधी ऑनलाइन शब्दकोषात होतो व नंतरच त्याचा समावेश छापील शब्दकोषात केला जातो.
नव्याने समाविष्ट झालेल्या ‘ऑक्सफर्ड’मधील शब्दांचा अर्थ..
टीएचएक्स :
थँक्सचे (धन्यवाद) लघुरूप
ट्विटेबल :
ट्विट करण्याजोगे
डंबफोन व टचलेस :
असा फोन की ज्याला हात न लावताही त्याचा वापर केला जाऊ शकतो
रेंज अँक्झायटी :
सध्या इलेक्ट्रिक कारचा जमाना आहे. इलेक्ट्रिक कारचा वापर करणारा चालक वाहतूककोंडीत अडकला तर कारची बॅटरी संपण्याआधी गंतव्य स्थानावर पोहोचण्याची त्याला घाई असते. त्यामुळे हा शब्द अनेकदा वापरला जातो.
सोशल शेअरिंग :
म्हणजे सोशल नेटवर्किंग साइट्सवरून शेअर केलेले अनुभव.