मांडवा किनारपट्टीवर पाणी अडविण्यास केंद्राची तत्त्वत: मंजुरी
मुंबईत येण्यासाठी जलवाहतुकीचा स्वस्त पर्याय कोकणवासीयांना लवकरच वर्षभर खुला राहणार आहे. कोकण ते मुंबई सागरी प्रवासासाठी रायगड जिल्ह्य़ातील मांडवा किनारपट्टीवर पाणी अडविण्यास राष्ट्रीय सागरामला शिखर परिषदेने तत्वत मान्यता दिली आहे. यामुळे पावसाळ्याचे चार महिने बंद राहणारा हा जलमार्ग वर्षभर सुरू राहिल. मांडव्यावरून ‘गेट वे ऑफ इंडिया’ चे अंतर अवघ्या चाळीस मिनिटात पूर्ण करता येत असल्याने लाखो कोकणवासीयांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
यापूर्वी खर्चिक असल्याचे कारण पुढे केल्याने १९९० पासून हा प्रकल्प रखडला होता. केंद्रीय जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत दिल्लीत झालेल्या पहिल्या सागरमाला शिखर समितीत मांडवी किनारपट्टीवर पाणी अडविण्यास तत्त्वत मंजुरी देण्यात आली आहे. कोकणातून मुंबईत येण्यासाठी हा सर्वात स्वस्त व जलद जलवाहतुकीचा पर्याय आहे. दररोज साधारण दीड ते दोन हजार प्रवासी या मार्गाचा वापर करतात. आठ महिने सुरू असणारा ही जलवाहतूक पावसाळ्यात मात्र बंद असे. मात्र पाणी अडविण्याल्याने हा मार्ग बारमाही खुला होणार आहे. २०१० साली नवी प्रवासी जेटी बांधण्यात आली होती. मात्र तेव्हादेखील पाणी अडविण्यासाठी बंधारा बांधण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्याचे संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील उपस्थित होते. राज्य सरकारने जहाजबांधणी मंत्रालयास मांडवा किनारपट्टीवर पाणी अडविण्यासाठी प्रस्ताव दिला होता. या प्रकल्पामुळे किनापट्टीलगतच्या स्थानिकांना लाभ होईल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.