भारतात झालेल्या विविध दहशतवादी हल्ल्यांमधील दोन संशयित आरोपींना सौदी अरेबियामध्ये अटक करण्यात आली आहे. अबु सुफिया ऊर्फ असदुल्ला खान आणि झैनुल अबिदिन ऊर्फ झाहिद शेख अशी या दोघांची नावे आहेत. पुढील काही आठवड्यांमध्ये या दोन्ही आरोपींचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. झैनुल अबिदिन यानेच पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटासाठी स्फोटके पुरविली होती.
अबु सुफिया हा मूळचा हैदराबादचा रहिवासी असून, २०११-१२ साली रियाधमध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या बैठकीला तो उपस्थित होता. यावेळी त्याच्यासोबत बेंगळुरूमधील काही तरूणही तिथे होते. लष्करे तैय्यबाशी संबंध असल्याच्या आरोपांवरून यापैकी काही तरुणांना नंतर भारतात अटक करण्यात आली. राष्ट्रीय तपास संस्थेकडून या सर्वांविरोधात वॉरंट जारी करण्यात आले असून, यापैकी अनेक जण सौदी अरेबियामध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. सुफिया याला आठ महिन्यांपूर्वीच सौदीमध्ये अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बेंगळुरू पोलीसांनी दहशतवादी हल्ल्यांच्या केलेल्या तपासात झैनुल अबिदिन याचे नाव पुढे आले. भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या इंडियन मुजाहिदीनला स्फोटके पुरविण्याचे काम झैनुल अबिदिन याच्याकडून केले जात होते. पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटासाठी वापरण्यात आलेली स्फोटके त्यानेच पुरविली होती. त्याला २० दिवसांपूर्वी अटक करण्यात आली असून, लवकरच त्यालाही भारतात आणले जाणार आहे.