नवी दिल्लीत १६ डिसेंबर रोजी झालेल्या सामूहिक बलात्काराचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही उमटत आहेत. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी नवी दिल्लीतील बलात्कारपीडित युवतीच्या मृत्यूबाबत तीव्र शोक व्यक्त केला असून अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी कठोर कायदे करण्याची सूचना भारत सरकारला केली आहे. महिलांच्या बाबतीतील अशा प्रकारचे पाशवी कृत्य कधीही सहन केले जाणार नसल्याचे मून यांनी सांगितले.
 मून यांनी आपल्या शोकसंदेशात पीडित युवतीच्या कुटुंबीयांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक महिलेला सन्मान मिळण्याचा अधिकार असल्याचे मून यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे. या प्रकरणी भारत सरकारने आतापर्यंत केलेल्या कृतीचेही मून यांनी स्वागत केले असून या प्रकरणातील कायद्यांच्या सुधारणांना संयुक्त राष्ट्रांचा संपूर्ण पाठिंबा असेल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.