पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्मीर प्रश्न उकरून काढल्यावर सोशल नेटवर्किंगवर भारताला पाठिंबा देण्यात येत आहे. पाकिस्तानच्या माजी नेत्यांनीही शरीफ यांचे भाषण कोणीही गांभीर्याने घेतले नसल्याचे ट्वीट केले आहे.

शरीफ यांनी भारतावर अस्थिरता पसरवल्याचा आरोप केल्यावर भारतानेही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत पाकव्याप्त काश्मीर सोडण्यास सांगितले आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या मुक्तीसाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी स्पष्ट केले.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी काश्मीर  प्रश्न उपस्थित करण्यासाठी जागा योग्य निवडली, मात्र प्रश्न मांडणारी व्यक्ती चुकीची असल्याचे स्वरूप यांनी ट्विटरवर म्हटले आहे. ट्विटरवर भारताच्या पाठीराख्यांनी प्रतिक्रिया देताना पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र असल्याचे म्हटले. शरीफ यांच्या भाषणाचे पाकिस्तानमध्ये स्वागत करण्यात आले असून भारतासमोरील आव्हान वाढल्याचे पाकिस्तानमधील काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तर काहींनी पाकिस्तानविरोधी प्रतिक्रिया नोंदविली आहे. संयुक्त राष्ट्रांसमोर काश्मीर प्रश्न मांडल्याने पाकिस्तानला काहीही लाभ होणार नसून इस्लामाबाद आणि नवी दिल्ली यांच्यात आरोप-प्रत्यारोप होतील, असे पाकिस्तानचे माजी राजदूत हुसेन हक्कानी यांनी म्हटले आहे. पाकिस्तान हे दहशतवादी राष्ट्र असून ते काश्मीरमध्ये दहशतवादी घुसविण्याचे काम सातत्याने करतात, अशी

प्रतिक्रिया टी.एस. चंद्रशेखर यांनी ट्विटरवर दिली.