अमेरिकेच्या लुई बर्जर या कंपनीने जलविकास प्रकल्पाच्या कंत्राटासाठी गोव्यात काही जणांना लाच दिली असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट झाले आहे, असे गोवा पोलिसांनी सांगितले. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले की, गुन्हे अन्वेषण शाखेला चौकशी करून दोन दिवसात प्राथमिक अहवाल देण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान माजी बांधकाम मंत्री चर्चिल आलेमाव यांनी लाच घेतल्याच्या आरोपाचा इन्कार केला आहे. लुई बर्जर कंपनीचे नावही आपण ऐकलेले नाही असे त्यांनी सांगितले. आलेमाव यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष सोडला आहे. दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना ते २००९ मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी राज्य गुन्हे अन्वेषण शाखेने याबाबत अज्ञात मंत्री व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर सांगितले की, अमेरिकी न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्यानुसार लाच दिली गेल्याचे स्पष्ट झाले आहे त्यात कुठलीही शंका नाही.
एक की जास्त मंत्र्यांवर गुन्हा दाखल केला आहे असे विचारले असता त्यांनी सांगितले की, एक मंत्री किंवा अधिक मंत्री असू शकतात. चौकशी सध्या प्राथमिक टप्प्यात असून अमेरिकी न्यायालयाच्या निकालाच्या कागदपत्राआधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी वेळ पडली तर इंटरपोल व परराष्ट्र मंत्रालयाचीही मदत घेऊ. कोठडीत जाबजबाब घेण्याची शक्यता फेटाळून त्यांनी सांगितले की, आताच तसे काही सांगता येणार नाही. न्यूजर्सी येथील एका कंपनीने गोवा व गुवाहाटी येथील जलप्रकल्पांच्या कंत्राटांसाठी लाच दिली होती. दरम्यान आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनीही त्यांच्या राज्यातील लाच प्रकरणात तथ्य असल्यास सीबीआय चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे.