श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी रनिल विक्रमसिंघे यांचा शपथविधी आज झाला. अध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांनी त्यांना शपथ दिली. श्रीलंकेतील अल्पसंख्याक तामिळींसह सर्वामध्ये सलोखा राखण्यासाठी राष्ट्रीय एकता सरकारने नवीन राज्यघटनेचे आश्वासन दिले आहे. विक्रमसिंघे हे ६६ वर्षांचे असून युनायटेड नॅशनल पार्टीच्या विजयानंतर त्यांना सत्ता मिळाली आहे. युनायटेड नॅशनल पार्टी (युएनपी) व अध्यक्ष सिरिसेना यांचा श्रीलंका फ्रीडम पार्टी (एसएलएफपी) हा पक्ष यांच्यात सत्तावाटपाचा करार झाला आहे.
दोन विरोधी राजकीय पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची श्रीलंकेतील ही पहिलीच वेळ आहे. लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम या बंडखोर संघटनेशी तीन दशके सामना केल्यानंतर श्रीलंका शांतता व स्थिरतेसाठी धडपडत आहे. सोमवारच्या निवडणुकीत विक्रमसिंघे यांचा विजय झाल्यानंतर माजी अध्यक्ष महिंदूा राजपक्षे यांची सत्तास्थापनेची आशा संपली होती. विक्रमसिंघे यांना पंतप्रधानपद देताना एक समझोता करार झाला असून त्यानुसार वांशिक सलोखा व मानवी हक्कांचे पालन करण्यासाठी घटना परिषदेची नेमणूक करण्याचे ठरवण्यात आले आहे. विक्रमसिंघे यांनी सर्व पक्षांना एकत्र काम करण्याचे आवाहन केले असून तामिळी अल्पसंख्याकांच्या पाठिंब्याची अपेक्षा केली आहे. यूएनपीला १०६ जागा मिळाल्या असून साध्या बहुमतासाठी त्यांना ७ जागा कमी पडल्या. त्यामुळे एसएलएफ पी पक्षाची मदत घेण्यात आली व त्या पक्षानेही सरकारमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली. नवीन सरकारने निवडणूक सुधारणा राबवण्याचे ठरवले असून प्रमाणानुसार प्रतिनिधित्वाची पध्दत बदलण्याचे सूचित केले आहे. यापुढे श्रीलंका अलिप्ततावादी परराष्ट्र धोरण राबवणार आहे असेही सांगण्यात आले आहे.