पाकिस्तानात सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये अल्पसंख्य असलेल्या शियांसह एकूण ३१ जण ठार झाले. विशेष म्हणजे, पाकिस्तानातील ‘एक्सपो सेंटर’ या इमारतीत सध्या संरक्षण सामग्रीचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरले असून बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत आणि याच प्रांतांमध्ये मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार बोकाळला आहे.
पाकिस्तानात गेले वर्षभर काही विशिष्ट समूहांना लक्ष्य करून मारले जात आहे. यामध्ये पाकिस्तानातील अल्पसंख्य शियांचा समावेश आहे. या हिंसाचारामागे मूलतत्त्ववादी संघटनांचा हात असून २०१२ मध्ये अशा हल्ल्यांत ठार झालेल्या व्यक्तींची संख्या २४८ झाली आहे. किंबहुना गेल्या पाच वर्षांत एकटय़ा कराची शहरात १३६३ जणांना आपला जीव गमवावा लागल्याची माहिती पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहारमंत्री रेहमान मलिक यांनी दिली.
ताज्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये पाकिस्तानात कराची येथे २३ जण, तर बलुचिस्तानची राजधानी असलेल्या क्वेट्टामध्ये ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये मदरसामधील विद्यार्थी, काही पोलीस अधिकारी आणि नागरिकांचा समावेश आहे.