अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी हेलिकॉप्टर खरेदीप्रकरणी इटलीच्या सरकारी वकिलांनी फिनमेकॅन्सिया कंपनीविरोधात तपासकाम थांबविण्याचा निर्णय घेतलेला असला तरी सीबीआयच्या तपासकामावर या मुद्दय़ाचा परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. फिनमेकॅन्सिया कंपनीच्या ऑगस्टावेस्टलॅण्ड या उपकंपनीकडून भारतातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी १२ हेलिकॉप्टरच्या खरेदी व्यवहारांमध्ये भारतातील अधिकाऱ्यांसाठी लाचखोरी झाल्याचा आरोप आहे.
फिनमेकॅन्सिया या कंपनीला आरोपांमधून वगळण्याच्या प्रस्तावाप्रकरणी संबंधित न्यायालयाच्या कामकाजाचा तपशील मागविण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी दिली. यासंबंधीचे दस्तावेज मिळाल्यानंतर इटाली भाषेतून त्यांचा इंग्रजीत अनुवाद करण्यात आला. त्यानंतर सीबीआयच्या तपासकामावर या मुद्दय़ाचा परिणाम होणार नाही, हे लक्षात आल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला.