संपूर्ण देशभर बलात्काराबाबत लोकशक्ती एकवटण्यासाठी कारणीभूत ठरली ती दिल्लीतील सामूहिक बलात्काराची घटना. त्या निर्घृण अत्याचाराचा मुकाबला करताना जखमी झालेला त्या मुलीचा मित्र हा त्या घटनेचा एकमेव साक्षीदार तर आहेच पण अत्याचारविरोधातील लोकक्षोभाची ठिणगी कायम राहण्यासाठी धडपडणारा योद्धाही आहे. ‘त्या’ अभद्र रात्री नेमके काय घडले याचा लेखाजोखा त्याने तसेच त्या मुलीच्या आप्तांनी तसेच मित्रमैत्रीणींनी ‘वॉलस्ट्रीट जर्नल’ या वृत्तपत्रासमोरच उलगडला आहे.
कशी होती ती?
तिचे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातले. भारतातल्या कोणत्याही खेडय़ातल्या घराप्रमाणेच तिचे गावी घर होते. त्या घराच्या उंबरठय़ाआड आणि बाहेरही तिची ओळख ‘बिटियाँ’ अशीच होती. शेती हा त्या घराच्या कमाईचा एकमेव आधार होता. पण त्यातून घर चालवणे कठीण झाले तसे चांगले जीवन जगण्याच्या हेतूने हे कुटुंब तीस वर्षांपूर्वी दिल्लीत आले. वडिलांनी बरेच कष्ट केले. १३ वर्षे ते मेकॅनिक म्हणून एका कारखान्यात होते. नंतर दहा वर्षे त्यांनी स्वतचेच छोटे दुकान चालवून पाहिले. गेली तीन वर्षे विमानतळावर लोडर म्हणून काम सुरू केले होते. त्यांना दोन मुलगे आणि ही एकुलती एक..
बिटियाँचे लहानपणापासूनच डॉक्टर बनायचे स्वप्न होते. ती होतीही हुशार. पण डॉक्टरकीचे स्वप्न खिशाला झेपणारे नव्हते. शाळेत असल्यापासूनच बिटियाँला घरच्या परिस्थितीची जाणीव होती. ती शिकवण्या करून छोटी कमाईही करू लागली. वर्गात बहुतेकवेळा तीच अव्वल क्रमांक मिळवत असे. वैद्यकीय शिक्षण आवाक्याबाहेरचे होते तरी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या डेहराडूनमधील एका ‘पॅरामेडिकल सायन्स इन्स्टिटय़ूट’चा पर्याय त्याजवळ जाणारा होता. साडेचार वर्षांचा फिजिओथेरपीचा अभ्यासक्रम तिला खुणावू लागला. नोव्हेंबर २००८ मध्ये त्यासाठी तिने नाव नोंदवले. त्या पदवीने दरमहा तीस हजार रुपयांच्या वेतनाची हमी होती. रोज सायंकाळी पाचपर्यंत शिक्षण आणि सायंकाळी सात ते पहाटे चार असे एका कॉलसेंटरला काम, असा तिचा दिनक्रम होता. वर्गात ती कायमच अबोल आणि अंतर्मुख भासत असे, असे एका प्राध्यापिकेने सांगितले. पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतशी तिची अनेकांशी मैत्री झाली. अनेकांशी ती गप्पा मारू लागली.
एका मैत्रिणीने सांगितले की, तिचे इंग्रजी खूप चांगले होते. सिडनी शेल्डनच्या कादंबऱ्यांची ती चाहती होतीच पण चेतन भगत यांची ‘वन नाइट अ‍ॅट कॉल सेंटर’ हीदेखील तिची आवडती कादंबरी होती. ती नाचही छान करीत असे. अर्थात शिक्षण आणि कॉलसेंटरमधील काम यामुळे रोज ती जेमतेम दोन तासच झोपत असे.
शिक्षणाच्या काळातच फॅशनबाबतही ती जागरुक झाली, असे तिच्या भावाने सांगितले. ऑक्टोबरनंतर ती इंटर्नशीपसाठी दिल्लीत परतली होती.
काय घडले त्या दिवशी?
ती भीषण घटना घडली त्या दिवशी म्हणजे १६ डिसेंबरला दुपारी योगायोगाने सर्वच कुटुंबिय एकत्र होते. तिने आईबरोबर स्वयंपाक तयार केला. पुऱ्या तळल्या. वडिलांच्या ताटातील पुऱ्या पटकावण्यावरून भावंडांशी तिची खेळीमेळीत चढाओढही झाली. जेवणानंतर दुपारी दोन वाजता वडील कामावर गेले. त्यानंतर त्या मित्राला भेटायचे आणि थोडी भटकंती करायची, असे तिने ठरवले. दोघांनी दूरध्वनीवरून तसे पक्केही केले. त्या दोघांचे प्रेमप्रकरण नव्हते, असा दावा त्याने तसेच तिच्या भावानेही केला. मात्र दोघे बऱ्याच वर्षांपासूनचे मित्र होते.
नाताळआधीची दिल्लीची ती उन्हाळी दुपार होती. दोघे ‘सिलेक्ट सिटीवॉक’ या मॉलजवळ भेटले. आर्थिक प्रगतीची द्वाही फिरविणाऱ्या मॉलसंस्कृतीतला हा मॉल. ‘तू किती बारीक झाल्येस,’ तो म्हणाला. त्यावर ‘बारीक होण्यासाठी लोकं किती मेहनत करतात,’ असं ती म्हणाली. या मॉलच्या काचकपाटाआडचा दिमाखदार पायघोळ अंगरख्यावर तिची नजर खिळली होती. हा अंगरखा तिच्यासाठी नंतर घ्यायचा, असं त्यानंही मनोमन ठरवून टाकलं. त्यानंतर दोघं आवडत्या चित्रपटगृहात गेले. याआधी ‘गलिव्हर्स ट्रॅव्हल्स’ हा चित्रपट ज्या रांगेतून पाहिला होता त्याच रांगेची त्याच आसनांची तिकिटंही मिळाली. चित्रपट होता ‘लाइफ ऑफ पाय’.. गावाहून निघालेल्या एका तरुणाची कथा असलेला. सागरी मार्गाने प्रवास सुरू असताना त्यांचे जहाज बुडते आणि वाचतो फक्त एक वाघ आणि हा गावरान मुलगा. त्यांची ही चित्तथरारक कथा पडद्यावर पाहताना काही क्षणांनंतर आपल्याही आयुष्यात असेच एक भयानक झंझावाती संकट येणार आहे, याची चाहूल दोघांनाही नव्हती.
चित्रपट संपला. तिला तो खूप आवडला होता. दोघं बाहेर पडले. त्यांनी प्रथम रीक्षा केली. रीक्षाने ते दक्षिण दिल्लीच्या महामार्गावर निघाले होते. तिथल्या बसथांब्यावरून तिला घरी जाणारी बस मिळणे सोपे जाणार होते.
त्याच सायंकाळी या मॉलपासून पाच मैलांवर असलेल्या ‘रविदास कॅम्प’ या झोपडपट्टीतल्या एका झोपडीत पार्टी रंगली होती. राम आणि मुकेश सिंग या दोघा भावांनी दारु आणि चिकनची ही पार्टी केली होती. राम एका खाजगी बसचा चालक होता. विनय शर्मा हा एका व्यायामशाळेत कामाला असलेला तरुण तसेच फळविक्रेता असलेला पवन गुप्ता आणि आणखी एक-दोन मित्रही पार्टीत रंगले होते. रात्री फेरफटका मारायच्या हेतूने हे सर्वजण बाहेर पडले. रामची बस दिमतीला होतीच. सव्वानऊला बसमधून जाताना या सर्वानी त्या दोघांना पाहिले. ते दोघे बसची वाट पाहात थांब्यावर उभे होते. मग राम सोडून सर्वजण साध्या प्रवाशांसारखे बसले. ते दोघे बसमध्ये आले. त्यांनी वीस रुपये देऊन तिकिटही घेतले. त्यानंतर ही बस घराकडे नव्हे तर नरकयातनांच्या वाटेने जाऊ लागली. दिल्लीतल्या अत्यंत प्रतिष्ठित अशा भागांतूनही भरधाव जाणाऱ्या या बसच्या मागच्या आसनांवर या मुलीला मारहाण आणि बलात्कार सुरू होता. त्या तरुणाला तर अमानुष मारहाणीने घायाळ करण्यात आलेच होते. तब्बल पाऊण तास हा प्रकार सुरू होता. चित्रपटातलं संकट हे निसर्गनिर्मित होतं तर प्रत्यक्षातलं संकट हे मनुष्यनिर्मित. अमानुष. या अमानुष आघातसह काही तासांतच ते दोघं अवमानित, अपमानित आणि रक्ताने माखलेल्या अवस्थेत त्या भरधाव बसमधून बाहेर फेकले गेले. दोघांचे कपडेही फाटून लक्तरांसारखे झाले होते. ती तर बेशुद्धच पडली होती. त्याला धड उभेही राहात येत नव्हते. तशाही अवस्थेत वीस मिनिटे रक्तस्रावाशी झुंजत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना तो मदतीची याचना करत होता. रात्री दहा वाजता महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या ‘डीसीएस लिमिटेड’ कंपनीतील कर्मचाऱ्यांचे प्रथम धुळीत आणि गवतात रस्त्याकडेला पडलेल्या या दोघांकडे लक्ष गेले. मग पोलिसांना पहिला दूरध्वनी गेला.