भारतीय नागरिक मतदानाचा हक्क का बजावतात, त्यामागे कोणती अपेक्षा, दबाव किंवा प्रोत्साहन असते का, राजकीय पक्ष मतदान करण्यास भाग पाडतात का आणि पुढील सार्वत्रिक निवडणुकीत मतदार कोणता चमत्कार घडवतील आदी प्रश्न जयपूर येथे सुरू असलेल्या साहित्य महोत्सवातील एका चर्चासत्रात उपस्थित करण्यात आले. ‘डेमोक्रसी डायलॉग्ज’ या मालिकेत ‘व्हाय इंडिया व्होट्स’ हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. भारतीय नागरिकांना मतदान करण्याची प्रेरणा मिळते, की त्यांच्यावर सक्ती केली जाते, भारतीय मतदार हे जादूच्या पोतडीसारखे आहेत, त्यांच्या राजकीय मतांचा कधीही थांगपत्ता लागत नाही, असे राजकीय नेते मानवेंद्रसिंग म्हणाले.  कोणत्या पक्षाला मतदान केल्यास ते देशासाठी लाभदायक ठरू शकेल याबाबतचा निर्णय घेताना ते बुचकळ्यात पडतात, असे एका वृत्तवाहिनीचे संपादक सुधीर चौधरी म्हणाले.