कॉंग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला कमी लेखण्याचा प्रयत्न झाल्यास आगामी २०१४ ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा इशारा, केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. केरळमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात पवारांनी हे वक्तव्य केलं.
या मेळाव्यात शरद पवारांनी कॉंग्रेसवर कडाडून टीका केली.  राष्ट्रवादी काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुक स्वबळावर लढण्याचे ठरविले असतानाही कॉंगेरसने नऊ ठिकाणी आमच्याच विरोधात आपले उमेदवार उभे केले. त्यापैकी पाच ठिकाणी आमच्या आणि काँग्रेसच्या उमेदवारामध्ये थेट लढाई होती, तर चार ठिकाणी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार उभे होते. सहाजिकच याचा फायदा भाजपला झाला आणि भारतीय जनता पक्षाला पुन्हा एकदा गुजरातमध्ये सत्ता मिळविण्यास मदत झाली. कॉंग्रेसमुळेच गुजरातमध्‍ये भाजपचा विजय झाला, असा आरोप पवारांनी केला. कॉंगेरसचे हे दुटप्पी धोरम असेच चालू राहिल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसला आगामी २०१४ च्या निवडणुका स्वबळावर लढण्याबाबत विचार करावा लागेल, असा इशारा पवारांनी दिला आहे.  
यूपीए सरकार विरोधात जनतेक्षा प्रक्षोभ वाढत असताना घटक पक्षांनीही कॉंग्रेसच्या विरोधात बंडाचे निशाष उगारले आहे. राज्यापाठोपाठ आता केंद्रातही राष्ट्रवादीने बंडाचे धोरण पुकारल्यामुळे संख्याबळासाठी जोड-तोडीचे राजकारण करू पाहणा-या कॉंग्रेस पक्षाला लवकरच पवारांच्या या विधानाचा विचार करून ठोस पावले उचलावी लागतील असं चित्र सध्या दिसत आहे.