पोलिसांच्या ताब्यात असताना आपल्यावर तीन पोलिसांनी बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केल्याने अलदूर पोलीस ठाण्यातील पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये दोन महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
महिला आरोपीने केलेल्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक के. आर. शिवकुमार, गुरुराज आणि के. बी. महेश हे कॉन्स्टेबल्स, महिला कॉन्स्टेबल कृतिका आणि पोलीस उपनिरीक्षक नंदिता शेट्टी यांना निलंबित करण्यात आले असून त्यांची चौकशी प्रलंबित आहे, असे पश्चिम क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप रेड्डी यांनी वार्ताहरांना सांगितले.
सोनसाखळी चोरीप्रकरणी आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तीन पोलिसांनी १८ फेब्रुवारी रोजी आपल्यावर बलात्कार केला, असा आरोप महिला आरोपीने केला आहे. आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतले, तेव्हा दोन महिला पोलीस अधिकारीही उपस्थित होत्या.
आता सदर महिला आरोपीची आणि पोलिसांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याबाबतचा अहवाल प्रलंबित आहे, असेही रेड्डी म्हणाले.