येथे चोवीस वर्षांच्या महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार करून चालत्या रिक्षातून फेकून दिले. ती बेशुद्ध अवस्थेत दक्षिण २४ परगणा जिल्ह्य़ात अकरा येथे पडली होती. कोलकाता येथील उपनगरात ही घटना घडली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रवींद्रनाथ अभारू यांनी सांगितले की, या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून या प्रकरणातील महिलेशी नाते असणारा प्रमुख आरोपी फरार आहे. या महिलेला पतीने टाकून दिले असून ती अकरा येथे आईसोबत राहात होती. तिला शफीक या तिच्या नातेवाईकाने ३१ जुलैच्या सायंकाळी घरून बोलावून घेतले. तिला नंबर प्लेट नसलेल्या रिक्षात बसवले व त्याच्यासोबत त्याचे चार मित्रही रिक्षात होते. नंतर त्यांनी या महिलेला पेय पाजले व तिची शुद्ध हरपली. नंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला़
काँग्रेस नेत्याच्या पुत्राकडून बलात्कार
मीरत : एकवीस वर्षीय महिलेवर पळवून नेऊन एका स्थानिक काँग्रेस नेत्याच्या मुलाने बलात्कार केला असे पोलिसांनी सांगितले. गौतमबुद्धनगर जिल्ह्य़ातील रहिवासी असलेल्या काँग्रेस नेत्याच्या पुत्राने नोएडा येथून २८ जुलैला या महिलेस पळवून आणले व तिला मीरतला घेऊन आला व तिथे हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला, असे पोलीस उपमहानिरीक्षक के. सत्यनारायण यांनी सांगितले. महिलेने सदर पोलीस स्टेशनला तक्रार करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी तक्रार घेतली नाही. नंतर ती थेट मीरतच्या पोलीस उपमहानिरीक्षकांकडे गेली त्यांनी लगेच या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले.