लोकसभा निवडणुकीसाठी केवळ पंधरा महिने उरले असून आम्ही पद्धतशीर आणि एकजुटीने काम केल्यास पुन्हा काँग्रेसलाच जनादेश मिळेल, असा विश्वास काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रविवारी चिंतन शिबिराच्या समारोपाच्या दिवशी काँग्रेसच्या अधिवेशनाला संबोधित करताना व्यक्त केला. चिंतन शिबिराअंती काँग्रेसचे जयपूर घोषणापत्रही जाहीर करण्यात आले.
देशाचे ऐक्य आणि अखंडतेवर घाला घालणाऱ्या शक्तींशी लढण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. देशाला दारिद्रय़मुक्त करण्यासाठी काँग्रेसने काम केले. आम्ही एकदिलाने चांगले काम केले तर २०१४ सालीही काँग्रेस पुन्हा निवडून येईल, याविषयी शंकाच नाही, असा विश्वास सोनिया गांधींनी व्यक्त केला.
सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी महिला आणि मुलांवरील अत्याचारांबद्दल अस्वीकारार्ह टिप्पणी केल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. महिला आणि मुलांविरुद्ध गुन्हेगारीची मानसिकता आम्ही खपवून घेणार नाही. दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या अमानुष घटनेने देशाला हादरविले. त्या तरुणीचा मृत्यु आम्ही व्यर्थ ठरू देणार नाही, असे सांगतानाच, संसद आणि विधिमंडळात महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारने प्रभावी काम केले, अशी प्रशंसा त्यांनी केली. जागतिक मंदीचा परिणाम भारतावरही झाला आणि त्यामुळे जनतेच्या हिताविरुद्ध सरकारला काही कठोर निर्णय घेणे भाग पडले. हे कठोर आर्थिक निर्णय कशामुळे घ्यावे लागले याची कारणे आम्ही जनतेपुढे मांडायला हवी. संघटनेच्या प्रत्येक स्तरावर नेतृत्व ओळखून प्रशिक्षण आणि प्रोत्साहन देण्याची जबाबदारी संघटनेतील पदाधिकारी आणि सरकारमधील मंत्र्यांनी पार पाडावी. त्यांनी आपल्या चौकटीचा विस्तार करून केवळ आवडत्या सहकाऱ्यांपुरते मर्यादित न राहता सर्व कार्यकर्त्यांंनाही मदत करावी, असे खडे बोल सोनियांनी सुनावले.
चिंतन शिबिरातील तरुण सहकाऱ्यांच्या सहभागाविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला. दिल्लीच्या झालेल्या काँग्रेस अधिवेशनात भ्रष्टाचाराला लगाम लावण्यासाठी पाच सूत्री कार्यक्रमाच्याअंमलबजावणीची त्यांनी माहिती दिली. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ‘आपका पैसा, आपके हाथ’ ही योजना हाती घेतली. पक्षाने भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा सुरुच ठेवला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.