सध्याच्या परिस्थितीत जागतिक अर्थव्यवस्थेला पुढे ढकलण्यासाठी चीनशिवाय आणखी एका खंबीर आधाराची गरज आहे. भारतासाठी ही एक सुवर्णसंधी आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी व्यक्त केले. ते सोमवारी न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातील कार्यक्रमात बोलत होते. भारतात वाढत्या अपेक्षांच्या रूपाने क्रांतीचे वातावरण निर्माण झाले असून हे चांगले लक्षण असल्याचे यावेळी जेटलींनी सांगितले. भारत आता अशा पातळीवर आला आहे की, जेथे ६ ते ८ टक्क्यांच्या विकास दरावर समाधान मानणे शक्य नाही. अनेक भारतीय देशाचा साधारण विकास दर ८ किंवा त्यापेक्षा जास्त असावा, अशी अपेक्षा करत असल्याचे जेटलींनी सांगितले.
सध्या चीनच्या खांद्यावर जागतिक अर्थव्यवस्थेची धुरा आहे. मात्र, जागतिक अर्थव्यवस्थेला आणखी पुढे न्यायचे असेल तर आणखी एका खांद्याची गरज असून भारतासाठी ही एक नामी संधी असल्याचे जेटलींनी म्हटले. सध्या भारत ज्या गतीने प्रगती करत आहे ती गती कायम राखल्यास येत्या काही वर्षांमध्ये देशाचा विकास दर, विकासाची क्षमता आणि गरिबीच्या समस्येशी झुंज देण्याची क्षमता निश्चितच वाढेल, असा विश्वासही यावेळी जेटलींनी यावेळी व्यक्त केला.