माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे पार्थिव मंगळवारी दुपारी विशेष विमानाने दिल्लीतील पालम विमानतळावर आणण्यात आले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्कराच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी यावेळी कलाम यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. लष्करातर्फे यावेळी मानवंदनाही देण्यात आली.
मंगळवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास तिरंग्यात गुंडाळलेले कलाम यांचे पार्थिव लष्करी अधिकाऱ्यांनी विमानातून बाहेर आणले. त्यानंतर सेनादलाने त्यांना मानवंदना दिली. प्रणव मुखर्जी आणि नरेंद्र मोदी दोघेही राजशिष्टाचार बाजूला ठेवत डॉ. कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दिल्ली विमानतळावर उपस्थित होते. त्यानंतर डॉ. कलाम यांचे पार्थिव दिल्लीतील १०, राजाजी मार्गावरील त्यांच्या सरकारी निवासस्थानी नेण्यात आले. तिथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अन्य मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली. दिल्लीतील अनेक लोक कलाम यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जमले आहेत.
डॉ. कलाम यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी दहा वाजता तामिळनाडूतील रामेश्वरम येथील त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येतील.
संसदेच्या दोन्ही सभागृहातही डॉ. कलाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. लोकसभेमध्ये अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि राज्यसभेमध्ये सभापती हमीद अन्सारी यांनी शोकसंदेशाचे वाचन केले. त्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
सोमवारी सायंकाळी पावणेआठ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने येथे देहावसान झाले. ते ८४ वर्षांचे होते. शिलाँग येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेण्ट’मध्ये डॉ. कलाम यांचे व्याख्यान होते. त्यासाठी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तेथे आल्यानंतर त्यांनी काही काळ विश्रांती घेतली. सायंकाळी सहा वाजून ३५ मिनिटांनी त्यांच्या व्याख्यानास प्रारंभ झाला आणि काही वेळातच ते जागीच कोसळले. साधारण सातच्या सुमारास त्यांना बेथनी रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. मात्र, पावणेआठच्या सुमारास त्यांचे निधन झाले.