दक्षिण भारतामधील राज्यात भाजपला पहिल्यांदा सत्ता मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा देत असल्याचे आपण अध्यक्ष गडकरी यांना कळविले आहे, हे सांगताना येडियुरप्पा एवढे भावनाविवश झाले की, त्यांना अश्रू अनावर झाले.
पक्षाने मला सर्व काही दिले आणि मीही पक्षाच्या उभारणीसाठी माझे आयुष्य झोकून दिले होते, पण पक्षातील काही लोकांना मी नको होतो. त्यांना मला पक्षात मिळणारा मान, माझे वजन सहन होत नव्हते. त्यामुळे त्यांनी माझ्याविरुद्ध षड्यंत्र रचले व त्यामध्ये मला बळी दिले गेले. पक्षाच्या आदेशानंतर मी मागील वर्षी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. मात्र माझ्या सौजन्यशीलतेचा गैरफायदा घेण्यात आला. गेले वर्षभर हे सर्व अपमान मी संयमाने सहन केले, पण आता दु:खी मनाने मला पक्ष सोडण्याचा कटू निर्णय घ्यावा लागत आहे, असे येडियुरप्पा यांनी सांगितले.  येडियुरप्पा ९ डिसेंबर रोजी ‘कर्नाटक जनता पक्ष’ (केजेपी) या प्रादेशिक पक्षाची स्थापना हावेरी येथे करणार आहेत. कर्नाटक भाजपमध्ये आपले समर्थक खासदार, आमदार, मंत्री असले तरी त्यांनी इतक्यात पक्ष सोडू नये, अशी सूचना त्यांनी या वेळी केली. जगदीश शेट्टर सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण करावा, अशी आपली इच्छा असल्याचे येडियुरप्पा यांनी या वेळी स्पष्ट केले. येडियुरप्पांना ५० आमदारांचा पाठिंबा असल्याचे बोलले जात आहे.