काँग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांच्याविरुद्धचे वृत्त प्रक्षेपित न करण्यासाठी ‘झी’ समूहाच्या दोन संपादकांवर १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप असून त्याप्रकरणी शनिवारी समूहाचे   अध्यक्ष सुभाष चंद्र हे पोलिसांपुढे चौकशीसाठी हजर राहिले होते.
सुभाष चंद्र यांना दिल्ली न्यायालयाकडून १४ डिसेंबपर्यंतच अटकपूर्व जामीन मिळाला असून ते शनिवारी आपल्या वकिलांसह चाणक्यपुरी येथील गुन्हे अन्वेषण विभागाच्या कार्यालयात हजर राहिले होते. तेथे पोलिसांनी त्यांची याप्रकरणी चौकशी केली.
परदेशात असल्याचे कारण देऊन सुभाष चंद्र हे प्रथम पोलिसांपुढे चौकशीला हजर राहण्यास तयार नव्हते. मात्र त्यानंतर त्यांनी ९६ तासांत पोलिसांपुढे चौकशीला हजर राहण्याची तयारी दर्शविली. समूहाचे कर्मचारी आणि काँग्रेस खासदार यांच्यात जो व्यवहार झाला त्याची माहिती सुभाष चंद्र यांना आहे, असे गृहीत धरून सुभाष चंद्र यांना आरोपी म्हणूनच वागणूक देण्यात आल्याचे चौकशी अधिकाऱ्यांनी न्यायालयास सांगितले. सुभाष चंद्र आणि त्यांच्या पुत्राला त्यांचे पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.