कोणासही आता क्षणाचीही उसंत नाही. पेपरा-पेपरांतून, च्यानेला-च्यानेलांतून एकच लगीनघाई उडाली आहे. पेपरांच्या पानांचे लेऔट ठरविले जात आहेत. रिपोर्टरे जुनी वार्तापत्रे वाचून काढत आहेत. मनातल्या मनात बातम्यांचे इंट्रो ठरवताहेत. उपसंपादके तणावग्रस्त आहेत. त्यांस टेन्शन एकच- फोटो आणि नावे तर चुकणार नाहीत ना? पक्षीय बलाबलाच्या चार्टात काही चूक तर होणार नाही ना? बिच्चारे!

तिकडे च्यानेलांतही युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. स्टुडय़ोंत कोरेकरकरीत सेट उभारले जाताहेत. टचस्क्रीन लावले जात आहेत. ग्राफिक्स काढले जात आहेत. अवघे गावठी प्रणब रॉय आणि विनोद दुवा आणि योगेंद्र यादव उद्या कोणता सूट घालून सुटायचे याच्या विवंचनेत आहेत. गेस्ट को-ऑर्डिनेटर नामक मनुष्यप्राण्याचे हाल तर विचारू नका! आपल्या स्टुडय़ोत चर्चेच्या अखिल भारतीय कार्येक्रमात कोणा-कोणास पाचारायचे याच्या याद्या करून त्या बिचाऱ्यांचे हात दुखून आले आहेत.

वेळच तशी आहे. उद्या डोंबोलीचा निकाल आहे!

आता तुम्ही दातोंतले उंगली घालून महदाश्चर्याने पुसाल की, हॅ! डोंबोलीचा निकाल! त्याचे एवढे कॅय विशेष? तर माझ्या प्रिय मतदार बंधू-भगिनींनो, ते एवढे साधे नाही. ही डोंबोलीची निवडणूक आहे. हा डोंबोलीचा निकाल आहे. तेथील कोणतीही निवडणूक ही जात्याच ऐतिहासिक आणि सार्वत्रिक असते! या निवडणुकीवर राष्ट्राचे (पूर्व-पश्चिम गोखले रोडसकट!) भवितव्य ठरणार असते. यंदा तर तेथे अवघी स्मार्ट सिटी (अधिक अक्षरी सहा हजार पाचशे कोटी रुपये!) पणाला लागली आहे. हतो वा प्राप्यसी २७ गावे, जित्वा वा भोक्ष्यसे स्मार्ट सिटी असे हे महाभारत आहे! त्यामुळेच पाहा- देशातील अवघ्या अहीमहींचे, दिग्गजांचे, मातब्बरांचे लक्ष कसे डोंबोलीकडे लागले आहे!

ते पाहा, ते पाहा- आपले लाडके (गुगलीवुगली वुश!) मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या जिवाची कशी तगमग सुरू आहे. हाती कॅल्क्युलेटर घेऊन कसलीशी गणिते करताहेत ते..

‘१२२.. समजा- सेनेला दिले ७, मनसेला किती? एक? ठीक आहे. एक! बाकीच्यांना देऊ  या का दोन? एवढे द्यायचे? बरं, देऊ  या. म्हणजे मग उरले- ११२! बाप रे.. एवढे येणार? नव्हे नव्हे, यायलाच पाहिजेत! नाहीतर नमोजींपुढे कोणत्या तोंडाने जाणार? ते चांगले म्हणत होते- मी घेतो दोन-चार सभा. एखादी रामवाडीत घेतो. एखादी फडके रोडवर घेतो. कित्येक तासांत असं बोलणं झालंच नाही. पण आपण त्यांना नको म्हणून सांगितलं. म्हटलं, हम हैं ना! तुमच्यासारखीच पॅकेजं देतो बघा दणक्यात. दिली! आता त्याची फळं मिळालीच पाहिजेत.

पण मिळतीलच. अखेर त्रिदिनात्मक शतचंडी यज्ञाचे म्हणून काही फळ असतेच की नाही? बरं, फळ नाही तर नाही, पण चार-दोन फोडी तरी?’

ते तिकडे आपले शिक्षणमंत्री ना. विनोदजी तावडेजी कसे मिशीतल्या मिशीत हसत आहेत. हसू देत

त्यांना. मुख्यमंत्र्यांना सीईटीला बसवल्याचा आनंद होतोय त्यांना. पण आपण (मुख्यमंत्र्यांप्रमाणेच) त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुढे थेट मातोश्रीवर जाऊ  या.

ऐका- महाराष्ट्र येथे काय म्हणतोय ते! महाराष्ट्र म्हणजे बोलत असतात आमचे परमहृदयसम्राट मा. श्री. उद्धवजी ठाकरेजीच! आपण त्याला ‘आवाररररज महाराष्ट्राचा!’ असे म्हणायचे, इतकेच.

‘यज्ञ करताहेत यज्ञ! त्यापेक्षा विकास करा. इथं आम्ही मतं मागितलीत ती कामं करून.. कामं. भाषण करणं म्हणजे काय सोपं काम आहे? अरे, रक्ताची शाई करावी लागते त्यासाठी. गाईला महागाई, साबरमतीला बारामती, होमहवनाला होम.. अशी यमकं जुळवणं म्हणजे काही फ्रुट सलाड खायचं काम नाही!

या माझ्या कामाच्या बळावरच इथं भगवा फडकणार आहे. सगळा लोढा अखेर शिवसेनेच्याच मागे येणार आहे..’

तुम्हाला ‘लोढा’ असे ऐकू आले का? वस्तुत: त्यांना ‘लोंढा’ असे म्हणायचे होते! पण ते जाऊ  द्या. आता सकाळचे अकरा वाजलेत. तेव्हा राजेश्री राजसाहेब ठाकरेंच्या इकडे डोकावण्यास काहीही हरकत नाही. त्यांचा पहिला चहा झाला असेल एव्हाना!

ते पाहा- ते कसे मन लावून डिस्नेची कार्टूने पाहात बसले आहेत. आपली राष्ट्रउभारणीची कामे- म्हणजे भाषण देणे, पत्रकार परिषद घेणे वगैरे झाली की ते बाकीचे फालतू उद्योग करीतच नाहीत.. इतरांप्रमाणे. थेट कार्टूनेच पाहात बसतात. पण आता मात्र त्यांच्या मनात विचार आहेत ते डोंबोलीचेच.

‘उद्या निकाल लागला म्हणजे सुटलो! मग काय व्हायचं ते होऊ  दे! लोकांना काय, कुणालाही मतं देतात. उचलला अंगठा, दाबलं बटण! शी! ही काय लोकशाही झाली?

उद्या काही वेडंवाकडं झालं ना, तर याद राखा. सगळ्यांना सांगीन- हा विजय लोकशाहीचा नाही, तर गाईचा नाही, तर शाईचा आहे! कोण गाईचा मुद्दा मांडतंय, कोण शाई टाकतंय.. शी!

माझ्या हातात सत्ता दिली ना कुणी इथं घरी आणून, तर एकेकाला असा सूतासारखा सरळ करीन! चहा आणा रे एक कप इकडं..’

काय म्हणालात? आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचे काय चाललेय ते पाहायचंय तुम्हाला? काय ही अघोरी इच्छा? त्यांचे चेहरे पाहण्यापेक्षा सुधींद्र कुलकर्णीची ती छायाचित्रे काढून पाहा त्या दिवशीच्या पेपरांतली! सारखीच वाटतील!!

खरं सांगायचं तर आज कोणाचेच विचार जाणून घेण्यात काहीही अर्थ नाही. कारण की, या डोंबोलीचा काही भरवसाच देता येत नाही. या शहराला शोभायात्रा काढण्याची मोठी हौस. ते कधी कोणाची शोभा करील याचा काही नेम नाही.

-अप्पा बळवंत
balwantappa@gmail,com