डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना! डाएटचं मनावर घेतलेल्या टीनएजर मुलीची ही डायरी त्यासाठीच!

आई! आजी कशी आहे गं? मी आईला फोनवरच विचारलं. आईची आई ही माझी अनेक आवडत्या आजींपैकी एक. तिला जरा बरं वाटत नव्हतं. म्हणून आई तिची सेवा करायला माहेरी गेली होती. माझी काही दिवसाची सुटका. अर्थात हे नुसतंच म्हणायला. कारण बाबांची नियमित सोय बघणं, घरकामासाठी येणाऱ्या बायकांचे वेळापत्रक नीट ठेवणं आणि धाकटीचा अभ्यास घेणं ही काही सोप्पी कामं नव्हती. दोन दिवस जाणवलं नाही, पण नंतर कधी कधी नको असलेली आई अगदी नेहमी बरोबर असावी असं वाटलं.

तर आई आजीकडे गेली ते मामीच्या प्रकृतीकडे जरा लक्ष ठेवायलादेखील. माझी मामी तशी जराशी नाजूकच आहे. म्हणजे तिला सगळे नेहमीच जपून असतात आणि जपून घेतातही. कारण ती बिचारी सारखी आजारी पडत असते. मामी शरीराने दिसत नसली तरी मनाने जराशी बारीक आहे. तिला सारखी सर्दी, खोकला होतो. कधीतरी नागीण झाली होती, तर कधी पाठीवर खाजणी झाली होती. पायाला चिखल्या तर अनेकदा होतात. सतत काहीतरी होत असतं.. काही विचारू नका. आजीची काळजी घ्यायला नको म्हणून मामी काहीतरी कारणं सांगते असं सर्वाना वाटायचं. पण आमच्या मातोश्रींनी या वेळी याचा छडा लावायचा ठरवला.

मातोश्री माहेरी पोचल्याबरोबर त्यांचं कार्य सुरू झालं. मामीचा आहार विचारल्यावर आईनं चक्क दम भरला. हे असले सोस चाळीशी जवळ आल्यावर योग्य नाहीत. जेवायच्या वेळा पाळणं हे सर्वात महत्त्वाचं. बेसन, शेंगदाणा, वांगी, मशरूम असे काही पदार्थ बंद केले. सर्वसाधारण प्रथिनांची अ‍ॅलर्जी असते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, असा वर सल्लाही दिला.

मामीचा सकाळ, दुपार, संध्याकाळचा चहा बंद केला व ग्रीन टी चालू केला. वेगवेगळी चव तिला दिली. संत्र, िलबू, दालचिनी, मध इत्यादी चवी चक्क तिला आवडल्या. ‘ग्रीन टी’चं महत्त्व आईने पटवून दिल्यावर तिला जरा बरं वाटलं. सकाळी नाश्त्याच्या आधी आईने तिला दोन कच्च्या लसणीच्या पाकळ्या खायला सांगितल्या होता. कच्ची लसूणपाकळी म्हटल्यावर मामीने अर्थातच तोंड वाकडं केलं. तोंडाला वास येतो वगरे खूप कारणं सांगितली. आईने काही तिला दाद दिली नाही. लसणीचे वास सोडला तर अनेक फायदे आहेत. हृदय संवर्धकता, रोग प्रतिकारशक्ती वाढवणे, जंतुरोधकता यासाठी लसूण खाल्लाच पाहिजे. जरासा चावून दुधाबरोबर गिळला तर दिवसभर तोंडाला वासही येत नाही.

मामीला माझ्यासारखीच चटरफटर खाण्याची आवड आहे. आईने मुद्दाम तिच्यासाठी आल्याची वडी घेतली होती. तसंच अळशी व बडीशोप एकत्र करून दळलेला मुखवास.. त्याचीही एक बरणी नेली होती. सतत पित्ताचा त्रास होतो, म्हणणारी मामी आता दररोज वेळच्या वेळी जेवत होती. दुपारी ताजं दही खाऊ लागली होती. मस्त जिरं पावडर, संधव घातलेलं ताक प्यायल्यामुळे दुपारचं ऊन तिला बाधत नव्हतं आता. दुपारची १०-१५ मिनिटांची डुलकी तिला संध्याकाळी ताजं टवटवीत करायची. मामा संध्याकाळी कामावरून आला की खूश असायचा. मग आई, आजी, मामा, मामी रात्रीचं जेवून पत्ते खेळायचे.

हे सगळं आईकडून मला दररोजच्या फोनवर समजत होतं. मला मात्र इकडे ‘ाा दोघांची सेवा करायला ठेवलं होतं. आईने मामीचा चिवडा, लाडू बंद केलं. त्या जागी फळं आणली. जीवनसत्त्व नेहमीच प्रतिकारशक्ती वाढवतात. काजू, पिस्ते जाऊन बदाम, अक्रोड आले. या साध्या सोप्या गोष्टींचा १५ दिवसांत मामीला खूप फायदा झाला. रोगप्रतिकारक शक्तीसाठी शाकाहाराबरोबर पौष्टिक मांसाहारही आवश्यक आहे. चिकनसूप, अंडी वगरे रोज घेतल्याने फायदा होतो. पालेभाज्याही गरजेच्या आहेत. थोडक्यात परत परत पौष्टिक खा आणि निरोगी राहा! आई मामीला दिलेला मंत्र मला ऐकवत होती.

रात्री गुड नाइटचा फोन केला तेव्हा ‘फेसटाइम’वर चक्क दुधाचे हळद घातलेले ग्लासेस घेऊन मला चियर्स केलं चौघांनी! एकंदर सगळंच चांगलं चाललं होतं तिकडे. आता १५ दिवस आई घरी नसल्यानं मला मात्र दु:ख झालं होतं आणि चियर्स करायला वेगळ्या द्रव्याची गरज असल्याचं वाटू लागलं. पण आम्ही आमची तहान कोकवर भागवली. बाबा, मी आणि माझ्या धाकटय़ा बहिणीने मस्त बर्फ घातलेले कोकचे ग्लास एकमेकांवर खणकवले आणि चियर्स केलं. हा फोटो आईला दाखवल्यावर तरी आई आमच्या चिंतेने लवकर परत येईल. जोरात गळा काढून रडायची वेळ येणार नाही माझ्यावर.. हा सुप्त हेतू सार्थ झाला.