डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण घोडं अडतं, ते प्रत्यक्ष आचरणात आणताना! त्यासाठीच ही डाएट डायरी..

आमच्या गौरीताईला बाळ होणार आहे. मी चक्क मावशी होणार आहे. काय मज्जा येणार. बाळ, बाळाचे लाड, बाळासाठी खेळणी, आधी गौरीताईचे आणि तिच्याबरोबर आमचेही लाड, आमची चंगळ! बाळ यायला अजून बरेच महिने आहेत. या सात-आठ महिन्यांत कित्ती मज्जा येणार. गौरीताई जेव्हा जेव्हा नवीन कपडे आणायला जाणार तेव्हा आम्ही पण तिच्या बरोबर जाणार. अर्थात आमचे कपडे घ्यायला. तिला जे जे खावंसं वाटणार ते ते सगळं परत परत आम्हालाही खायला मिळणार. मज्जाच मज्जा! अर्थात आईसमोर हे काही फार बोलले नाहीय मी. कारण गौरीताईचे पहिले तीन महिने जरासे वाईटच गेले. बिच्चारी सारखी ओकायची. तिला कसलाही वास सहन होत नव्हता. भाताचा कुकर लागला की, ती खिडकीच्या बाहेर तोंड करून उभी राहायची. आमचं आणि तिचं नशीब होतं की, तिला बोंबील कालवणाचा काही नॉशिया आला नव्हता. नाहीतर आमचे वांदे आले असते.

आमची आईमात्र खूश होती. गौरीताईच्या मत्रिणी, नातेवाईक सर्वाचा चौफेर उपदेशांचा हल्ला चालू झाला होता. आईने मात्र तिला एक सिंपल लिस्ट दिली. प्रथिने आणि पिष्टमय पदार्थ यांचं प्रमाण १:३ ठेवायचं हे ती गौरीताईला वारंवार सांगत असे. आधी छोटी डाएट लिस्ट आणि मग एक मोठ्ठी सविस्तर यादीही आईने गौरीताईकडे सरकवली होती. त्यामध्ये डाएटविषयी सविस्तर लिहिलं होतं. पहिले तीन महिने गर्भधारणेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. यात खूप उलटय़ा होतात. त्यामुळे अन्न पोटात टिकत नाही. वजन कमी होण्याची शक्यता असते. डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेवर घेतल्या की मग उलटय़ा होत नाहीत.

पहिल्या महिन्यांमध्ये फॉलिक अ‍ॅसिड असलेले पदार्थ खावेत. म्हणजे पालक, सालाचा छोटा बटाटा (दम आलूचा), गवार आणि फळांमध्ये अननस, केळं व संत्र. बाळाचा मज्जारज्जू आणि मेंदूच्या उत्तम वाढीसाठी याची आवश्यकता असते. (आईने माझ्या वेळेला बहुदा आईने खाल्ला नसावा. मेंदू सोडून सर्व मस्ती अंगात भरली आहे माझ्या!.. ती यादी वाचताना हा खटय़ाळ विचार आला.)

चौथा महिना चालू झाल्यावर जरा गौरीताई फिरायला जायला लागली. खाण्यात थोडी सुधारणा झाली. दोन ग्लास प्रोटिनची पावडर घालून दूध, रोज दोन-तीन अंडय़ांचा पांढरा भाग, एखादी हिरवी पालेभाजी वगरे. पौष्टिक आहार चालू झाला. तिला रोज गोड खायला आवडायचं. मग आम्ही कधी मिश्टी दही, कधी योगर्ट, कधी नॅचरलचं आइस्क्रीम तर कधी चॉकलेट अशा गोष्टी घेऊन तिला भेटायला जायचो. तिच्या नावाने आम्हीही खायचो हे सांगायला नकोच. तिच्याबरोबर माझंही वजन वाढलं, तसं आईच्या लक्षात यायला लागलं.

शेवटी सातव्या महिन्यात आईने आम्हा सर्वाना धमकी दिली. व्यायाम, पौष्टिक खाणं, दूध, भाज्या, डाळी/ उसळी, कोिशबीर आणि गोड म्हणजे एखादं फळ.. बस! रोजचा गोड मेवा बंद. मधुमेह व गर्भधारणा हे समीकरण म्हणे वाईट आहे. ताईची यथावकाश थ्री डी सोनोग्राफी झाली. बाळाचे फोटो काढले, फ्रेम केले. सारखं पोटाला कान लावून बसायचा टाइमपास झाला. काय विचारू नका.

मग तर आणखी गौरीताई आणि आम्हाला सुट्टी लागल्यामुळे आम्ही आणखी खायखाय करायला लागलो. बोंबील झाले, चॉकलेट, आइस्क्रीम झालं, चाट, पाणीपुरीपर्यंत आलो. मग मात्र आईच्या तावडीत सापडलो आणि हे बाहेरचं खाणं बंद झालं. आपण चलता है! असं म्हणतो पण त्याचा परिणाम खूपच वाईट होतो.. आईचा पट्टा सुरू झाला. चाट मसाला, बाहेरच्या चटण्या, पाणी, चटरफटर गोष्टींमधलं मीठ शरीराला वाईट असतं. त्यानं रक्तदाब वाढू शकतो, कावीळ होऊ शकते. हे सर्व गर्भावर परिणाम करतं. गौरीताई बिचारी ऐकून घेत होती आणि आम्हीसुद्धा.

थोडक्यात आमची हौस फिटली. गौरीताईला गेल्या आठवडय़ात गोड मुलगी झाली. एकदम टवटवीत सूर्यफुलच जणू काही. आता ती बिचारी परत वजन कमी करायच्या मागे लागली आहे. तिच्याबरोबर परत आम्हीसुद्धा!

– डॉ. गायत्री ठाकूर