डाएट, वेट लॉस, काय खावं, काय टाळावं याबाबत आता सगळीकडून माहितीचा पूर वाहतोय. पण थिअरी ते प्रॅक्टिकलमधल्या गमतीजमतीमुळेच डाएटचा संकल्प धुळीला मिळतो. डाएटचं मनावर घेतलेल्या टीनएजर मुलीची ही डायरी त्यासाठीच!

‘‘आई! मी फ्रेंच क्लासला जाते ना तिकडे एक मुलगी येते. खूप गोड आहे. तिचे नाव नेहल. ती मला जराशी मलूल वाटतेय गेले २-३ दिवस.’’ आई, ‘‘का गं?’’.. ‘‘अगं, आमची ‘इंट्रो’ झाली ना तेव्हा मला कळलं की, ती राजस्थानवरून इकडे शिकायला आली आहे. कॅन यू इमॅजिन.. एकटी! आईवडिलांना सोडून, केवळ शिकायला. तेही बम्बई जैसे शेहेरमे अकेले.. बाप रे! इकडे तू मला अजून टॅक्सीत एकटीला पाठवत नाहीस. ती पाल्र्यात एका तमीळ आजींकडे पेइंग गेस्ट म्हणून राहाते. तिला फारसं काही बनवता येत नाही आणि तामबॅम आजी (तमीळ ब्राह्मण) खूपच शिस्तबद्ध आहे म्हणे; पण अफसोस. आजीचं जेवण या नेहलला आवडत नाही. तिच्या चवीपेक्षा खूपच वेगळं आहे. थोडक्यात मॅडम नाश्ता, जेवण नीट खात नाहीत व रोज बाहेरचं खातात, पितात. खूप वेळा पोट बिघडतं व पित्त होतं. काय करणार गं ती!’’अर्थात. आईने लगेचच मला सांगितले की, अगं, तिला घरी जेवायला बोलव. मी पडत्या फळाची आज्ञा असल्यासारखी लगेच शनिवारी तिला घरी बोलावलं. ती जेव्हा घरी आली तेव्हा तिच्या बोलण्या-चालण्यातील अदब काही वेगळीच होती. आईनं चक्क नेटवरून तरला दलाल स्पेशल राजस्थानी पद्धतीचं जेवण बनवलं. मलाही खूप आश्चर्य वाटलं. त्यांच्याकडे बनते तशी आईने डाळभाटी बनवली होती. बाजरा रोटली होती.
आईने तिच्यासाठी छोटीशी भेटवस्तू आणली होती. आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की, ती काय असेल.. अर्थात खादय़पदार्थाची छोटीशी बॅग होती. आईने काही सूचक गोष्टी त्या बॅगेत ठेवल्या होत्या. मढरी, खाकरा, नाचणी-फॅक्ससीडचे लवाश, मूगडाळचे लाडू, मेथीचे लाडू, सुकामेवा, थेपले, पंजिरी, पंचरंगी आचार, बॉर्नविटाचं छोटं पाकीट, मुसलीचं छोटं पाकीट, खजूर-अक्रोडाची मिठाई.

नेहल घरी आल्यावर भरपूर गप्पा झाल्या. मॅडम एकदम सुखावल्या व हळव्यापण झाल्या. आईने तिच्यासाठी मस्त शेवयांची खीर बनवली होती. अगदी तिची आई बनवते तशीच झाली होती. त्यामुळे थोडासा अश्रू टाळण्याचाही कार्यक्रम झाला. या सर्व प्रकारामध्ये मला मात्र स्वयंपाक वगरे काहीही करता येत नाही याची खंत वाटली. केवळ दोन सेकंद.. अंगावरून मुंगीला झटकावं तशी ती खंत मी झटकून दिली. एकटं वगरे राहण्याचं स्वप्न.. स्वप्नातच बघू या असं म्हटलं.
घराबाहेर राहाणे म्हणजे खाण्यापिण्याचे वांधे येतात. आईने तिला दोन-तीन मत्रिणींचे नंबर दिले ज्या घरी जेवण बनवून डबे देतात. ही मुलगी सतत मित्रमत्रिणींच्या घोळक्यात असते. सदा हसरी आहे; पण आतून इतकी एकटी आहे हे मला कधीच जाणवलं नाही. आज ते जाणवलं व वाईट वाटलं. या मुंबई शहरात काय, पण अनेक ठिकाणी असे घरापासून दूर अनेक जण राहतात. त्यांना आपण सर्वानी मदत केली पाहिजे.

आजकाल सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशनमध्ये अनेक सोप्या रेसिपी मिळतात. घरपोच जेवणाचे ऑप्शन्ससुद्धा उदा. होलाशेफ. सर्वात शेवटचा उपाय म्हणजे स्वत: स्वत:च्या गोष्टी पटापट शिकणं, करणं गरजेचे आहे. आपल्याला भारतातच वरकाम व २४ तासांच्या घरकामाला येणाऱ्या बायकांची सवय असते. सर्वत्र स्वत:ची कामं स्वत:च करायला लागतात. स्वावलंबन िझदाबाद!! ल्ल