व्हिगन डाएट हे बारीक होण्यासाठीचं एक फॅड डाएट म्हणून लोकप्रिय होतंय. चुकीच्या पद्धतीनं आणि योग्य तो पूरक आहार न घेतल्यास व्हिगन डाएटमुळे अशक्तपणा येऊ शकतो. व्हिगन डाएटच्या कहाणीचा हा उत्तरार्ध

‘आई, काल व्हिगन डाएटचं खायला दिलंस आणि आमचा उपास घडवलास, मात्र आज मात्र काहीतरी चमचमीत करून मग व्हिगन डाएट डिस्कस कर..’ मी सकाळी सकाळीच डिक्लेअर केलं. खरंच.. मी आदल्या दिवशी पूर्ण शाकाहारी- शिवाय ताक, दही, दूध काहीही नसलेलं जेवले होते. आईने नाष्टा झाल्यावर सांगायला सुरुवात केली. ‘व्हिगन डाएट हा खूप जण वजन कमी करायचा एक पर्याय म्हणून करतात. त्यातले काही स्टाइल म्हणूनही अगदी कौतुकाने सांगतात की आम्ही व्हिगन डाएट करतो. वास्तविक व्हिगन डाएट करताना डोळ्यात तेल घालून आपण पूरक अन्न खातोय ना याकडे बघणं अगदी गरजेचंअसतं. कारण एकतर आपल्या साधनेप्रमाणे नको ते पोटात जाऊ नये आणि जे जातंय त्यात पूरक, परीपूर्ण अन्नघटक असावेत.’
आई सांगत होती.. मूळात शाकाहार आणि त्यात दूध वज्र्या म्हणजे काही जीवनसत्त्व अजिबात मिळत नाहीत. व्हिगन डाएट फॉलो करणाऱ्यांमध्ये बहुधा व्हिटॅमीन बी 12 आणि व्हिटॅमीन ‘डी’ची कमतरताआढळते. कारण या दोन गोष्टींचे सर्वाधिक प्रमाण मांसहारातअसते. केवळ भाजी – पोळी आणि फळांमधून सर्व घटक पोटात जात नाहीत. त्यामुळे हाडं दुखणे, स्नायू दुखणे, थकवा येणे हे सहजगत्या होत राहतं. एकीकडे मांसाहार बंद केल्यामुळे चयापचय कमी होऊन पचनशक्तीवरील भार हलका होतो. वजन कमी व्हायला नक्कीच मदत होते. कारण आपण चमचमीत कमी खातो. पण जीवनघटक कमी पडल्याने पटकन थकवा येतो, सारखं गळून गेल्यासारखही वाटतं. कामातून मन उडतं, सारखी झोप येते. यासर्वांमुळे आपण मग कंटाळतो.
व्हिगन डाएट करणाऱ्या मंडळींनी याची काळजी घेणं गरजेचं आहे. ड आणि ब जीवनसत्त्वाच्याजोरावर माणूस खरंच खूप काम करू शकतो. दूधाऐवजी व्हिगन डाएटवाले बदामाचं दूध पितात. खूप खर्चीक प्रकारआहे पण, पौष्टीकतेच्या दृष्टीकोनातून अफलातून आहे. हे दूध घालून आईसक्रीमही बनते. यातील ओमेगा 3 फॅटी अॅसिड हे म्हणे त्वचेसाठी, केसांसाठी तर उपयोगी आहेच, पण हृदयासाठीदेखील त्याचा खूप फायदा होतो. थोडक्यात जरी खर्चिक तरी फायदेमंद ! कधीकधी नारळाचं दूधही वापरू शकतो. पण यामुळे हृदयविकारतज्ज्ञांचाच जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नारळाचं दूध जरा जपून. आहारात याचा वापर कमी करणंच योग्य आहे.
सोयाबीनचंही दूध वापरता येतं. पण स्त्रियांसाठी ते जरा जास्त योग्यआहे. पुरूषांनी याचा वापर कमी करावा. थायरॉइड आणि अंडाशयाचा त्रास असलेल्या स्त्रियांनीही याचं सेवन करू नये. सोयाबीनचं दूध खूप शक्तिवर्धक असतं. व्हिगन डाएटमध्ये भाज्या, पिष्टमय पदार्थ आणि फळं पोटात जातात. पण प्रथिन्यांची वानवा जास्त होते. मांसाहारी पदार्थामध्ये प्रथिनं मुबलक असतात. शाकाहारींना ती मिळत नाहीत. म्हणून दिवसभरात डाळ, उसळी यांचं प्रमाण आवश्यक्तेनुसार राखणं गरजेचं असतं. खूप वेळा प्रोटीन पावडरची गरज पडते. पण तो विषय जरा क्लिष्ट आहे. त्यावर आपण नंतर चर्चा करू. एवढं सगळं ज्ञान एकदम पचणार नाही.. आईच म्हणाली आणि प्रवचनात ब्रेक घेतला. जाता जाता प्रथिन कशी आवश्यक आहेत हे सांगतच ती उठली. प्रथिने हा महत्त्वाचा अन्नघटक आहे।. स्नायूंची शक्ती वाढवण्यासाठी प्रथिन्यांचा उपयोग होतो. मांसाहारी प्रथिनांमध्ये अंडं हे सर्वात उत्तम उदाहरणआहे. व्हिगन डाएटमध्ये हे खाल्ल जात नाही. मग दोन – तीन प्रकारच्या प्रथिन्यांमधून ते मिळवणं गरजेचं आहे. पूर्णत्वाने शाकाहारामधून आवश्यक तेवढी प्रथिनं मिळणं अशक्य आहे..
आई बोलत होती. आम्ही ऐकत होतो. थोडय़ा वेळाने व्हिगन डाएटचं वलय डोक्याभोवती तयार झालं असं वाटायला लागलं. माझ्या विचारांनी मलाच खुदकन हसू आलं. जेवताना तोंडात कोलंबी टाकली आणि फुल टू त्याचा मसाला चघळत सोयाबिनपासून तयार केलेल्या टोफूची चव कशीअसेल याची कल्पना केली. जंगलबुक मधील मोगली कसं त्या मुलीला बघून नाक मुरडतो तसं मी नाक मुरडलं. आईने डोळे वट्टारले मग. तर माझ्या व्हिगन डाएटची कहाणी अशी सुरू झाली आणि अशी इथेच सुफळ संपूर्ण झाली.

– डॉ. गायत्री ठाकूर