आज लक्ष्मीपूजन

दिवाळी सण आनंदाचा, उत्साहाचा, आप्तस्वकीयांच्या भेटीचा. निराशेवर मात करून आनंद साजरा करण्याचा. यानिमित्ताने शहरातील विविध वस्त्यांमधील इमारती दीपमाळांनी उजळल्या आहेत. आकर्षक आणि विविधारंगी रांगोळ्यांनी अंगणे सजली असून, लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच या दीपोत्सवात उत्साहाने सहभागी झाले आहेत.

उद्या घरोघरी आणि व्यापारी प्रतिष्ठानामध्ये लक्ष्मीपूजन केले जाणार असून त्याची तयारी सुरू झाली आहे. शहरातील चितार ओळीत लक्ष्मीचे देखणे रूप असलेल्या वेगवेगळ्या आकारातील लक्ष्मीच्या मूर्ती विक्रीला आहे.

शिवाय दिवाळीनिमित्त लागणाऱ्या विविध वस्तूंनी बाजारपेठ सजली असून ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठा ओसंडून वाहत आहेत. सजावटीसाठी झेंडूसह विविध फुलांची मागणी वाढली आहे. बर्डीवरील फूल बाजारात वेगवेगळ्या जातीची फुले विक्रीला आली आहे. फुलांचे भाव वाढले आहेत. एकूणच दिवाळीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, दररोज घडय़ाळाच्या गजराने जागे होणारे शहर सनईच्या सुराने आणि फटाक्याच्या आवाजाने जागे झाले. शहरातील विविध भागात आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी रसिकांनी गर्दी केली.

लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त

बुधवारी घरोघरी व प्रतिष्ठांनामध्ये लक्ष्मीची पूजा करण्यात येणार आहे. प्रदोषकाळी म्हणजेच सायंकाळी ५.४० ते ८.१० वाजतादरम्यान लक्ष्मीची पूजा करावी. ज्या शिवलिखित मुहूर्तावर लाभसमयी लक्ष्मीपूजन करावयाचे असेल त्यांनी रात्री ८ ते ९.३० वाजतादरम्यान पूजन करावे. ज्यांना स्थिर लग्नावर लक्ष्मीची पूजा करावयाची असेल त्यांनी सायंकाळी ५.४४ ते ८.४८ वाजतादरम्यान, शुभ मुहूर्तावर पूजा करायची असेल तर रात्री ११.३० ते १२.३० वाजतादरम्यान पूजा करावी. रात्री १२.३० ते पहाटे २ वाजेपर्यंत ही अमृतवेळ असल्याने पूजा करता येईल. साधारणत: व्यापारी वर्ग शुभ मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करीत असतात, अशी माहिती पंचागकर्त्यां विद्या राजंदेकर यांनी दिली.