डेस्टिनेशन ज्वेलरी

एखादं ठिकाण आणि दागिना यांचा संबंध तेथील संस्कृती आणि त्यानुसार दागिन्यांच्या पद्धतीत होणारे बदल इथपर्यंत असतो, हे आपल्याला माहीत आहेच. पण लग्नसमारंभातील नव्या पद्धतींना अनुसरून दागिन्यांमध्येही नवे ट्रेण्ड्स येतात. गेल्या काही वर्षांमध्ये डेस्टिनेशन वेडिंग म्हणजेच राजस्थान, गोवा, केरळ किंवा परदेशी जाऊन लग्न करायच्या पद्धतींमध्ये वाढ झाली आहे. अशा लग्नांना जाताना कपडय़ांबरोबरच दागिनेही सोबत नेणं ओघाने आलंच. पण विमानप्रवास करताना विशेषत: परदेशी जाताना आपल्याकडील सोने, हिऱ्याच्या दागिन्यांचा संपूर्ण तपशील द्यावा लागतो. त्यात वेगवेगळे फॉर्म भरा, विमानतळावरील तपासणी या सगळ्या किचकट प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. हे सगळं टाळण्यासाठी हल्ली लग्न आयोजकांकडून (वेडिंग प्लानर) डेस्टिनेशन ज्वेलरीचा पर्याय सुचविला जातो. लग्न कुठे आहे, यानुसार खास इमिटेशन दागिने बनविले जातात. उदाहरणार्थ, राजस्थानमध्ये लग्न असल्यास, खास शाही लुक असलेले कुंदन, जडाऊ दागिने बनविले जातात. किंवा गोवा, बालीसारख्या समुद्रकिनारी ठिकाणी लग्न असल्यास मोती, हिरे, व्हाइट फिनिशचे दागिने बनविले जातात. अशा दागिन्यांमध्ये आवर्जून मासा, शंखशिंपले असे समुद्राशी संबंधित मोटीफ वापरले जातात. युरोप, थायलंडसारख्या देशांमध्ये लग्न असल्यास नाजूक हिऱ्याचे दागिने बनविले जातात. यामुळे कपडय़ांसोबत दागिनेसुद्धा लग्नाच्या थीमला साजेसे होतात आणि विमानतळावरील कंटाळवाणी प्रक्रियासुद्धा आटोपशीर होऊन जाते.

हल्ली सोन्याच्या दागिन्यांचे ट्रेण्डसुद्धा वर्षांकाठी बदलतात आणि सोन्याचे दागिने मोजकेच खरेदी केले जातात. त्यात संगीत,हळद, रिसेप्शन, प्री-वेडिंग पार्टी, मेहेंदी अशा लग्नातील समारंभांची संख्या आता वाढली आहे. पूर्वी फार तर दोन समारंभांत आटोपणारा लग्नसोहळा आता पाच ते सात दिवस रंगतो. अशा वेळी प्रत्येक सोहळ्यात तेच तेच दागिने घालायला वधूलाही कंटाळा येतो. त्यामुळे लग्नासाठी ड्रेसनुसार वेगवेगळे इमिटेशन दागिने बनविण्यास तरुणी पसंती देत आहेत. बहुतेकदा हे दागिने डीटॅचेबल असतात. कारण लग्नाचे दागिने हे शक्यतो मोठाले, भरजरी बनविले जातात. पण नंतर हे मोठे दागिने वापरले जात नाहीत. अशा वेळी एक मोठा हार बनविण्याऐवजी दोन-तीन छोटे हार जोडून एक हार बनविला जातो. नंतर गरजेनुसार हे हार वेगवेगळे करून वापरता येतात.

ट्रायबल प्रभाव

जगभरातील आदिवासी, हिप्पी, भटक्या जमातीच्या दागिन्यांमध्ये एरवीच्या दागिन्यांपेक्षा वेगळेपणा आवर्जून पाहायला मिळतो. चंद्र, सूर्य, वनस्पती, फुलं असे नैसर्गिक घटक त्यांच्या दागिन्यांमध्ये असतात. त्याचबरोबर हे दागिने बोल्ड असतात. ऑक्सिडाइज चांदी, रंगीत धागे, मणी, दगड यांचा वापर यात केलेला असतो. या दागिन्यांचा लुक सध्या तरुणींना आवडू लागला आहे. त्यामुळे अफगाणी, पर्शियन, बंजारा पद्धतीचे दागिने सध्या आवर्जून पाहायला मिळतात. एरवी हे दागिने चांदीमध्ये बनविले जातात, पण इमिटेशन दागिन्यांमध्ये या मोटीफ आणि स्टाइलचा प्रभाव नक्कीच पाहायला मिळतोय.
अर्थात हे बदल होताना स्वस्तात मस्त हे बिरुद मिरविणाऱ्या इमिटेशन ज्वेलरीनेसुद्धा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. पण त्यामुळे ठरावीक कार्यक्रमासाठी भाडय़ाने इमिटेशन दागिने उपलब्ध करून देणाऱ्या वेबसाइट आता येऊ लागल्या आहेत. पण तरीही सोने, हिरे, प्लॅटिनम यांच्या दागिन्यांच्या तुलनेत इमिटेशन दागिने कधीही स्वस्तच. त्यामुळे त्यांची मागणी वाढतच जाणार हे खरं.

आर्ट डेकोचा प्रभाव

१९२०च्या दशकात युरोप, अमेरिकेत उदयाला आलेल्या आर्ट डेको चळवळीचा प्रभाव भारतातील कित्येक इमारतींवर आवर्जून पाहायला मिळतो. आर्ट डेको स्टाइलचा प्रभाव स्थापत्यकला, पेंटिंग, फॅशन, दागिने अशा वेगवेगळ्या क्षेत्रांवर होता. यंदाही दागिन्यांमध्ये ही स्टाइल आवर्जून पाहायला मिळते आहे. यात प्रामुख्याने भौमितिक आकारांचा समावेश असतो. पण या आकारांनाही किंचित कमनीयता दिल्याने त्यात छान लयबद्धता दिसून येते. मुंबईतील ब्रिटिशकालीन इमारतींमध्ये ही स्टाइल पाहायला मिळते. गंमत म्हणजे या स्टाइलमुळे पारंपरिक फ्लोरल डिझाइन्सना मिळणारा भौमितिक आकार उठून दिसतो. यंदा दागिन्यांना या स्टाइलसोबतचं थ्रीडी डिझाइन्सची जोड मिळाली आहे. या दागिन्यांमध्ये मोती, मणी, रंगीत खडे, सिमेट्रिक डिझाइन्स यांचा वापरही केला जातो. काहीशा पाश्चात्त्य डिझाइन स्टाइलकडे जाणारी ही शैली इमिटेशन दागिन्यांमध्ये आवर्जून पाहायला मिळते.

मृणाल भगत

सौजन्य – लोकप्रभा

response.lokprabha@expressindia.com