दिवाळी म्हटलं की, अनेकांच्या मनात आपापल्या घरात साजरा होणाऱ्या सणाची आठवण होते आणि मग आठवणींचा प्रवास सुरु होतो. अभिनेता देवदत्त नागेसुद्धा त्याच्या कारकिर्दीत सध्या बराच पुढे आला असला तरीही त्याची नाळ मात्र अलिबागशीच जोडली गेली आहे. तिथल्या प्रत्येक गोष्टीत त्याला वेगळेपण जाणवतं. अगदी दिवाळी साजरा करण्याच्या पद्धतीतसुद्धा. याच दिवाळी सेलिब्रेशनविषयी त्याने अधिक माहिती दिली आणि किल्ला ते बेसनाचे लाडू, असा दिवाळीचा त्याचा प्रवास उलगडून सांगितला.

आमच्या इथे दिवाळी साजरी करण्यासाठी अनेकजण बरेच उत्साही असल्याचं पाहायला मिळतं. त्यातही दरवर्षी आम्ही किल्ला बनवतो. इथे तशी प्रथाच आहे. त्यामुळे साक्षात शिवाजी महाराजही आमच्यासोबत हा सण साजरा करण्यासाठी आल्याचीच अनुभूती आम्हाला होते. ‘शिवाजी महाराज की जय’, अशी आरोळी ठोकत थंड वातावरणात अभ्यंगस्नानाने आमच्या दिवाळीची सुरुवात होते. घरी साजरा केली जाणारी प्रत्येक दिवाळी खास असते. पण, यंदाची दिवाळी माझ्यासाठी जरा जास्तच खास आहे. त्यामागचं, कारणही तसंच आहे.

हेच कारण सांगताना देवदत्त म्हणाला, ‘मिस्टर ऑलिम्पिया’, शरीरसौष्ठवांसाठी अतिशय महत्त्वाची असणारी स्पर्धा मला याचिदेही याची डोळा पाहण्याची संधी मिळाली. मुख्य म्हणजे तिथे विशेष अतिथी म्हणून मी उपस्थिती लावली होती. तो अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि आल्हालदायक होता. कारण, माझ्यालेखी या स्पर्धेचं फार महत्त्वं आहे. तिथे आपल्या शरीरावर बरीच मेहनत घेतलेले बॉडीबिल्डर पाहून, मी भारावलो होतो. ‘आयबीबीएफएफ एशिया’च्या सेक्रेटरींमुळे मला ही संधी मिळाली. त्यामुळे माझ्या दिवाळीची सुरुवात अत्यंत सुरेख अशीच झाली. या सुरेख सणाच्या निमित्ताने आणि आताच पार पडलेल्या ‘मिस्टर ऑलिम्पिया’ स्पर्धेच्या औचित्याने मी सर्व तरुणांना एकच संदेश देऊ इच्छितो की दिवाळी आहे, उत्साहाचा सण आहे, फटाके वाजवा, पण त्यात अतिरेक नको. भरपूर फराळ खा. मुख्य म्हणजे व्यसनांपासून दूर राहा.

सध्या दिवाळीच्या निमित्ताने देवदत्त मुंबई आणि अलिबाग अशी ये- जा करणारा हा अभिनेता लवकरच एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, प्रेक्षकांनी आपल्यावरचं प्रेम असंच कायम ठेवावं कारण कोणत्याही कलाकारासाठी रसिक मायबापच सर्वकाही असतो. त्यामुळे त्यांची दादही तितकीच महत्त्वाची, असंही तो म्हणाला.