स्वस्त, मस्त आणि परवडण्याजोगे इमिटेशनचे दागिने कधी कधी सोन्याच्या दागिन्यांपेक्षा जास्त भाव खाऊन जातात. या दागिन्यांमध्ये दिसणारे सध्याचे ट्रेण्ड खूप आकर्षक आहेत. इमिटेशन दागिने म्हणजे कमीपणा किंवा खोटेपणा ही समजूत आता मागे पडली आहे. उलट इमिटेशन दागिन्यांनी ते वापरणाऱ्यांपुढे दागिन्यांचे नवे पर्याय खुले केले आहेत. नजर टाकतानाच दमायला होईल आणि निवडीचा पेच निर्माण होईल इतके प्रचंड पर्याय, नवनवीन डिझाईन्स आणि खिशाला फारसा धक्का पोहोचत नसल्याने प्रत्येक कार्यक्रमासाठी नवीन दागिना घेता येण्याची सोय यामुळे हे दागिने फक्त तरुणींमध्येच नाही तर सर्व वयोगटांतील स्त्रियांमध्ये लोकप्रिय होऊ लागले आहेत. त्यात प्रवासात ने-आण करायला सोयीचे, चोरी झाली तरी फार नुकसान झाल्याची भीती नाही. वर चांगल्या प्रतीचा, डिझाईनचा दागिना नेहमीच कौतुकाचा विषय ठरतो.

पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांमध्ये एरवी नेहमी वापरले जाणारे मंगळसूत्र, नेकलेस, बांगडय़ा, अंगठी अशा दागिन्यांची खरेदी आपण सहज करतो. पण ब्रेसलेट, इअरकफ, हातफुल, बाजूबंद, कानवेल, बिंदी असे ट्रेण्डनुसार सतत बदलणारे दागिने घ्यायचे असतील, तर इमिटेशन दागिन्यांकडेच मोर्चा वळतो. त्यामुळेच इमिटेशन ज्वेलरीने आता सोन्याचांदीच्या बाजारपेठेला हादरे द्यायला सुरुवात केली आहे. गंमत म्हणजे बाजारात या दागिन्यांचे अनेक ब्रॅण्ड्स आहेतच, पण भिशीचा गट, किटी पार्टी, घरगुती समारंभ, प्रदर्शने यांमध्ये हे दागिने सहज विकता येत असल्याने आणि त्यांची मागणीही तितकीच असल्यामुळे यातून कित्येक महिला याकडे व्यवसाय म्हणून बघू लागल्या आहेत.

दर वर्षी नव्याने येणाऱ्या इमिटेशन दागिन्यांमध्येही हल्ली वेगवेगळे ट्रेण्ड्स पाहायला मिळतात. त्यावर स्त्रियांच्या आवडत्या मालिका, सिनेमे, सेलेब्रिटी लुक यांचा मोठा पगडा असतो. ‘होणार सून मी या घरची’, ‘सरस्वती’ अशा मालिकांमधून प्रसिद्ध झालेले मंगळसूत्र, जोधा-अकबर सिनेमामुळे चर्चेत आलेला कुंदन दागिन्यांचा ट्रेण्ड, राजस्थानी स्टाइलच्या प्रभावामुळे प्रचंड मागणी असलेला मांगटिका अशी गेल्या काही वर्षांतील उदाहरणे पाहायला मिळतील.

बाहुबली आणि टेम्पल ज्वेलरी

टेम्पल दागिने हा अस्सल दक्षिण भारतीय दागिन्यांचा प्रकार. दक्षिण भारतातील मंदिरांवरील देवदेवतांच्या प्रतिमा, मूर्ती, बॉर्डर्स, नक्षीकाम यांचा समावेश या दागिन्यांमध्ये असतो. गेल्या वर्षी कुंदन दागिन्यांना प्रचंड मागणी होती. पण आता कल बदलतो आहे. यामध्ये ‘बाहुबली’ सिनेमाचा विशेष हात आहे. दक्षिण भारतीय कथानक असलेल्या या सिनेमामधील देवसेना, शिवाग्मी या स्त्री पात्रांमुळे टेम्पल ज्वेलरी तरुणींमध्ये चर्चेत आली. देवसेनेचा मोठा मांगटिका, तीन-चार पदरी हार, कमरबंद, नथ, अंगठय़ा, कानातले मोठे डूल यांना तरुणींमध्ये मागणी आहे. शिवाग्मीची- बाहुबलीच्या आईची व्यक्तिरेखा काहीशी पोक्त असल्याने मध्यमवयीन स्त्रियांमध्ये तिच्यासारखे सुटसुटीत हार, कानातले छोटे डूल यांची मागणी आहे.

सध्या टीव्हीवर सुरू असलेल्या ‘आरम्भ’ मालिकेतसुद्धा अशा प्रकारचे दागिने दिसतात. टेम्पल दागिन्यांचे वैशिष्टय़ म्हणजे कुंदन दागिन्यांप्रमाणे यांच्यात खडे, हिरे यांचा वापर नसून सोन्याचा वापर अधिक असतो. क्वचित प्रसंगी लाल, हिरव्या रंगांच्या खडय़ांचा वापर या दागिन्यांमध्ये केला जातो. त्यामुळे यांना खास पारंपरिक लुक असतो. त्यामुळे एथनिक लुकमध्ये हे दागिने छान दिसतात. फ्यूजन ड्रेसिंगवरसुद्धा हे दागिने घालता येतात. एरवी दागिन्यांच्या क्षेत्राकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या पुरुषवर्गामध्येसुद्धा गेल्या काही वर्षांपासून दागिन्यांचं आकर्षण निर्माण झालं आहे. यंदाही पुरुषांमध्येही बाहुबली, बल्लाळदेव यांचे लांब सरीचे मोठे पेण्डण्ट, कडे प्रसिद्ध आहेत. कुर्त्यांवर हे पेण्डण्ट उठून दिसतात.

मृणाल भगत

सौजन्य – लोकप्रभा

response.lokprabha@expressindia.com