घरोघरी आणि बाजारपेठेत लक्ष्मीपूजनाचा उत्साह

दिवाळी आनंद घेऊन येते.. दिवाळी प्रकाश घेऊन येते.. आणि दिवाळी सुख-समृद्धी घेऊन येते.. पुढील वर्ष समृद्धीचे, भरभराटीचे जावो अशी प्रार्थना करून व्यापाऱ्यांनी गुरुवारी लक्ष्मीपूजन केले. दिवाळीचे पहिले दोन दिवस शांत असलेल्या पुण्यात गुरुवारी मात्र फटाक्यांच्या माळांचा कडकडाट सुरू होता. मात्र तुलनेने यंदा फटाक्यांचे प्रमाण घटल्याचे दिसत होते.

यंदा दिवाळीचा प्रत्येक दिवस स्वतंत्र आला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवसाची आपापली खुबी अनुभवत दिवाळीचा उत्साह शहरभर भरून राहिला होता. नरकचतुर्दशीचा दिवसही ग्राहकांच्या घाई-गडबडीत गेल्यानंतर गुरुवारी बाजारपेठेत लक्ष्मीपूजनाचा उत्साह होता. ‘दिवाळी पहाट’सारख्या उपक्रमांचे आयोजन गुरुवारीही करण्यात आले होते. नाटय़गृहे, प्रमुख उद्याने, तसेच विविध ठिकाणच्या सभागृहांमध्ये पहाटे हे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. पुणेकरांनी आवर्जुन पारंपरिक वेषात या कार्यक्रमांना हजेरी लावली. सायंकाळी मुहूर्त साधून घराघरांमध्ये तसेच व्यापारी पेढय़ा आणि दुकानांमध्ये पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करण्यात आले. शेवंती, झेंडूची तोरणे, दिव्यांच्या माळा, आकाशकंदील यांनी दुकाने सजली होती. दारासमोर रेखाटलेल्या मोठय़ा रांगोळ्या उत्साहात भर घालत होत्या. बाजारपेठेतील लक्ष्मी रस्त्यावरील दुकानांनी बँड पथकेही बोलावली होती. पारंपरिक पद्धतीने हिशोबाच्या नव्या वहीचे आणि मुहूर्ताच्या पानाचे पूजन केले जात होते. दुकानांमध्ये ही पूजा सहकुटुंब सुरू होती. घरोघरीही दागदागिने, चांदीची नाणी, चांदीची लक्ष्मीची मूर्ती वा प्रतिमा, नाणी, नोटा तसेच लक्ष्मी (केरसुणी) मांडून भक्तिभावाने लक्ष्मीपूजन केले जात होते. साळीच्या लाह्य़ा, बत्तासे, धने, गूळ, पेढे असा प्रसाद यावेळी वाटला जात होता.

लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त झाल्यावर शहर काही काळ फटाक्यांच्या कडकडाटाने दणाणून गेले. मात्र तरीही पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत चालणारा फटाक्यांचा दणदणाट यंदा मात्र पुणेकरांनी अनुभवला नाही. आवाजाच्या फटाक्यांचे प्रमाण तुलनेने कमी होते. मात्र शोभेच्या फटाक्यांमुळे शहरभर काही काळ धुराचे साम्राज्य होते. दिवाळीतील पाडवा आणि भाऊबिजेसाठी केल्या जाणाऱ्या खरेदीमुळे बाजारपेठांमध्ये शुक्रवारी आणि शनिवारी चांगली गर्दी राहील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विशेषत: सराफ बाजार, विद्युत उपकरणे यांची खरेदी या निमित्ताने होते.