काही वर्षांमागे साक्षेपी संपादक राम पटवर्धन यांनी ‘सध्या सर्वत्र कानठळ्या बसविणारी शांतता आहे!’ असे विधान एका मुलाखतीत केले होते. समाजातील अनिष्ट गोष्टींविरुद्ध आवाज उठवायला, एखाद्या विषयावर हिरीरीने वादविवाद करायला आज कुणीच पुढे सरसावत नाही, हे त्यांना त्यातून ध्वनित करायचे होते. आजही तीच परिस्थिती कायम असली तरी कोलाहल मात्र वाढला आहे. सोशल मीडियाच्या चव्हाटय़ावर अनेकजण निरनिराळ्या विषयांवर आपापल्या परीने ‘व्यक्त’ होत असले तरी त्या व्यक्त होण्याला विवेकाची जोड असतेच असे नाही. त्यातही हल्ली ‘पोलिटिकली करेक्ट’ राहण्याकडेच बहुतेकांचा कल असतो. विवेकाचा आवाज जणू हरपला आहे. या हरवलेल्या विवेकाच्या संदर्भात विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे त्या- त्या क्षेत्रातील हरवलेल्या आवाजासंबंधात काय म्हणणे आहे, हे आम्ही यानिमित्ताने ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकातील परिचर्चेत समजून घेऊ इच्छितो. म्हणूनच यंदाच्या ‘लोकसत्ता’ दिवाळी अंकातील या परिसंवादाचा विषय आहे :
‘विवेकाच्या शोधात चार क्षेत्रे!’