रायटिंग अ बुक इज व्हेरी लोन्ली बिझनेस. यू आर टोटली कट ऑफ फ्रॉम द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. सबमज्र्ड् इन यूवर ऑब्सेशन्स अॅण्ड मेमॉयर्स.
– मारियो व्हर्गस योसा

‘लोन्ली’ या शब्दाचे अर्थ बरेच असले तरी एकाकीच्या जवळ जाणारं काही म्हणजे काय असावं, असा शोध घ्यावासा वाटतो. कुणाच्याही सहवासाशिवायचा.. इतरांपासून तुटला गेलेला.. ही मनाची अवस्था असावी. कारण ‘अलोन’ म्हणजे ‘सेपरेट’ फ्रॉम अदर्स.. दुसऱ्यांमधून वेगळा पडलेला.. स्वत:कडून वेगळाच झालेला. असं ‘लोन्ली’ असणं आणि ‘एकटं’ असणं याच्यात फरक असावा.. बरं, एकटं असताना एकाकी वाटणं, आणि एकाकी वाटताना एकटं नसणं- हेही जरा वेगवेगळंच.. गर्दीत असूनही एकटं वाटलं असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा गर्दीतलं एकाकीपणच आपल्याला अभिप्रेत असावं.
असे एकाकी वाटण्याचे अनेक प्रसंग वा घटना आपल्या जगण्यात सतत येतच असतात. काही आपल्याला समृद्ध करून जातात, काही आपल्याला आणखीनच खचवून जातात. त्या एकाकी वाटण्याच्या आलेल्या प्रसंगांची मालिका हे कलावंताच्या जगण्याचं भागधेय असावं..

इट्स सो लोन्ली व्हेन यू डोन्ट इव्हन नो युवरसेल्फ..

कॉलेजला असतानाची गोष्ट..
एकांकिका स्पध्रेच्या सिलेक्शनसाठी एका वर्गात सारे जमलेले.. त्याआधी एकपात्री अभिनय स्पर्धामधून हमखास बक्षीसं मिळवणारे काही पिसेस करून बरीच बक्षिसं मिळवली होती. त्यामुळे एक भयंकर आत्मविश्वास घेऊनच वर्गात मी बसलेलो.. कुमार शाहू नावाचे दिग्दर्शक- ज्यांनी काही बालनाटय़ं दिग्दर्शित केलेली होती- ते आले. त्यांचा भाचा- ज्याला मी ‘छिन्न’ नाटकात पाहिलं होतं- तोही वर्गात होता. सगळ्यांकडून उभं राहून कुमार शाहूंनी वाचून घेतलं. माझं वाचन उत्तम झाल्याने आता मेन रोल आपल्यालाच मिळणार, या गुर्मीत मी. पण नंतर एकांकिकेत अगदीच चार वाक्यं असणारी भूमिका मला मिळाली. पण तरी आपल्याला नाटकात काही करायचंय, या ध्यासापायी मी चिकटून राहिलेलो. एक दिवस कुमार शाहूंच्या घरी सगळे रिहर्सलला रीडिंग करत असताना माझी वाक्ये झाल्यावर सगळ्यांसमोर कुमार शाहू म्हणाले, ‘‘किशोरचा आवाज म्हणजे स्टेजवर एखादी मुलगी उभी करावी आणि मागून किशोरला बोलायला लावावं इतका पातळ आहे.’’
सगळे खो-खो करून मोठमोठय़ानं हसले. मीही केविलवाणं हसत त्यात सामील झालो. पण एखाद्या कडय़ावरून कुणीतरी अचानक ढकलून द्यावं तसं झालं. प्रसिद्ध काळ्या, धडधाकट नटांसारखा आपला आवाज जाडजूड, भरदार, बेसदार आहेच- या समजुतीला जोरदार धक्का बसला. आपण बोलताना स्वत:चा आवाज स्वत: कधीच नीट ऐकला नाही, ही जाणीव तीव्र झाली. मला तर पुढे मोठमोठय़ा नाटकांतून कामं करायची होती. करिअर करायचं होतं की नाही.. किंवा आपण यात करिअर करूशकू, असं काहीच न वाटण्याइतकंही काही कळत नव्हतं. पण सबकॉन्शस माइंडमध्ये असलेल्या माझ्या इतर कॉम्लेक्सेसना ओव्हरकम करण्यासाठीच मला तेव्हा सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन व्हायचं होतं. माझं कुणीच का नीट ऐकून घेत नव्हतं ते कुमार शाहूंच्या त्या एका वाक्यानं माझ्या काहीसं लक्षात आलं. आता एकांतात जाऊन आपलाच आवाज आपण जरा नीट ऐकू, म्हणून मी रिहर्सल संपल्यावर धावत सुटलो. एखादी नको असलेली वस्तू आपल्याकडे चुकून यावी, ती इतरांपासून आत कुठेतरी दडवून नजर चुकवत गावातून दूर न्यावी आणि टाकून द्यावी अशा काहीशा भावनेनं मी चालतच लगबगीने निघालो. मला आधी घराजवळचा समुद्रकिनारा गाठायचा होता. रात्र झालीच होती. आत समुद्रात शिरून अंधारातून चालत जाऊन दूरवर असलेल्या नेहमीच्या खडकावर बसून माझाच आवाज मला ऐकायचा होता. जवळजवळ तास- दीड तास, एरवी बसने येणारा-जाणारा मी माझ्या नकळतच चालत, धावत, थांबत, फरफटत, मागे वळून पाहत, पुन्हा पुढे बघत, गावातून चालत घरावरून सरळ समुद्रकिनारा गाठला. अंधारातून चालत खूप आत गेलो. ओहोटी होतीच. फक्त वाऱ्याचा आवाज आणि समुद्राची गाज.. किनाऱ्यावरल्या वाळूतून, चिखलातून अंधारात नेहमीच्या त्या खडकावर धडपडत जाऊन बसलो. खूप दम लागला होता. रस्त्यातून चालताना स्वत:चा आवाज जराही निघू न देण्याची काळजी घेतली होती. इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदा मी माझा आवाज स्वत:च ऐकणार होतो. दूरवर समुद्रात चमकणारे होडीतले दिवे पाहत असताना आणखी आणखी एकाकी वाटत गेलं. कधीतरी आपण ओरडून म्हटलेली वाक्यं, गुणगुणलेली गाणी, कुजबुजलेली खसखस मेंदूतल्या खोलीत आपोआप निनादून माझाच आवाज मला ऐकवू लागली. स्तब्ध राहून मेंदूतून ऐकू येणारा आवाज मी ऐकत बसलो.
स्वत:च्या डोक्यातल्या खोलीत स्वत:लाच पाहत स्वत:चाच आवाज ऐकताना आपणच आपल्याला तुरळक तुरळक भेटतोय असं वाटत राहिलं. डोक्यातल्या खोलीतला तो आवाज खरंच खूपच पातळ पातळ येत होता. आपण असे काळेसावळे, राकट-रांगडे, धडधाकट.. आणि तरी आपला आवाज असा? नाही, नाही.. काहीतरी चुकतंय. म्हणून मी मेंदूतल्या खोलीचं दार धाडकन् लावून घेतलं आणि खाडकन् अंधारातल्या त्या खडकावर येऊन पडलो. वारा वाहतच होता.. गाज वाजतच होती.. गळ्यातून आवाज काढू की नको?
दीर्घ श्वास घेतला आणि आपलंच नाव प्रथम उच्चारून पाहावं म्हणून तोंड उघडलं आणि..
दाटून आलेल्या गळ्यातून एक हुंदका बाहेर पडला. हुंदक्यातूनही स्वत:चा आवाज ऐकू येऊ नये याची काळजी आपोआप घेतली जात होती.
जवळजवळ मध्यरात्रीपर्यंत त्या खडकावर सुन्नसा बसून राहिलो. माझाच आवाज ऐकण्याची एक भयंकर भीती गाजेसोबत घोंघावत राहिली. आपलं नशीबच खोटं.. आपल्यातली जनुकंच (जिन्स) कमकुवत.. आपणच असे कसे, असे अनेक प्रश्न पडत असताना भस्सकन् आठवलं..
लहानपणी आईने मुलीचा फ्रॉक घालून माझा एक फोटो काढला होता. तो फोटो मी बऱ्याचदा पाहिला होता. पण अचानक तो का आठवला? माझ्या जन्माच्या वेळेस आईला मुलगी हवी होती, असं माझ्या समोरच कित्येकदा तिनं म्हटल्याचं आठवलं. मग फ्रॉक घातलेला तो फोटो पुन:पुन्हा आठवत राहिला..

लँग्वेज हॅज क्रिएटेड द वर्ड ‘लोन्लीनेस’ टू एक्स्प्रेस द पेन ऑफ बीइंग अलोन.. अॅण्ड इट हॅज क्रिएटेड द वर्ड ‘सॉलीटय़ुड’ टू एक्स्प्रेस द ग्लोरी ऑफ बीइंग अलोन.
– पॉल टिलीच

दुबेजींकडे जाऊन एक वर्षच झालं होतं. वर्षभर आपला आवाज शक्यतो न काढत त्यांच्या नाटकांचं बॅकस्टेज करत होतो. त्यांच्याच घरी एक वर्कशॉप चालू होतं.. पण त्या दिवशी मी एकटाच होतो. बाकीचे का कुणास ठाऊक अनुपस्थित होते. त्यांना एक फोन आला. पलीकडून शाम बेनेगल नावाचे प्रसिद्ध दिग्दर्शक बोलत होते. त्यांच्या मालिकेसाठी त्यांना काही अॅक्टर्स हवे होते. छोटे छोटे एक-दोन वाक्यांच्या रोलसाठी म्हणून. मला त्यांनी दुसऱ्या दिवशी शाम बेनेगलना भेटायला सांगितलं. ‘उसको जाके बोलना दुबेजीने भेजा है.’
‘जी.’
‘क्या बोलोगे?’
‘दुबेजीने भेजा है..’ मी बोललो.
दुबेजी माझ्याकडे पाहतच राहिले. खोलीत स्तब्धता. मग एकदम ओरडून म्हणाले, ‘इस आवाज में बोलोगे तो कोई काम नहीं देगा. सूर नीचा करो.’
‘जी.’
‘बोलो- नीचे के सूर में बोलो.’
‘जी.’
‘बोलो- नीचे सूर में बोलो.’
‘जी.’
‘अबे.. सूर नीचे करो. समझ में नहीं आ रहा है क्या?’
‘नहीं..’ पॉज्.
‘गाओ.. गाना गाओ कोई.’..पॉज्.
‘गाना गाओ गाना..’
‘कौनसा?’
‘कोई भी.’
मी गाणं म्हणू लागलो..
‘कोई जब तुम्हारा हृदय तोड दे,
तडपता हुआ जब कोई छोड दे,
तब तुम मेरे पास आना प्रिये..’
‘चूँप..’ ते एकदम ओरडले. आता माझं काय करावं, हे त्यांना कळेना.
‘साले अॅक्टर बनने आये हो और सादा सूर का कोई पता नहीं.. आज के आज कहीं से भी एक छोटा-मोटा हार्मोनियम पदा करो और किसी गाना सिखानेवाले के पास जाके गाना सिखना शुरू करो.’
‘जी.’ ..पॉज्.
‘हाँ. और कल शाम के पास जाने की कोई जरुरत नहीं.’

दि एण्ड कम्स व्हेन वी नो लाँगर टॉक विथ आवरसेल्वज्. इट्स् दि एण्ड ऑफ जेन्युइन िथकिंग अॅण्ड दि बीगििनग ऑफ दि फायनल लोन्लीनेस.
– एडवर्ड गिबन

गोिवद निहलानी यांच्या ‘आघात’ चित्रपटात आयुष्यात पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याची संधी प्राप्त झाली होती. कामगारांच्या प्रश्नांवर आधारीत या चित्रपटात मॉबमधल्या कामगारांमध्ये उभं राहून घोषणा देण्याचं काम दुबेजींमुळेच मिळालं होतं. घरची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत जात असतानाही, कुठल्याशा नशेत ते सारं विसरून नाटक, दुबेजी आणि त्यांचा ग्रुप एवढंच करत राहताना आई-वडिलांना होणारा त्रास, घरची आíथक परिस्थिती, भावांची शिक्षणं या सगळ्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून, आपल्याला वाटेल तेच करत राहण्याचा उद्धटपणा करण्याचे ते दिवस आठवले की ‘तो’ एक दिवस नेमका आठवत राहतो.
‘आघात’चं शूटिंग सुरू होऊन एखादा महिना झाला असावा. एक दिवस शूटिंगला असताना मी आणि माझ्या काही सहकलावंतांना कळलं की, कन्व्हेअन्स म्हणजे येण्या-जाण्याचे काही पसे कलावंतांना दिले जात आहेत. ठरलेल्या मानधनाव्यतिरिक्त हे वेगळे पसे रोख मिळत आहेत, हे कळल्या कळल्या ते घेण्यासाठी पांढरा शर्ट, पांढरी पँट व पांढरे शूज घातलेल्या त्या प्रॉडक्शन मॅनेजरकडे मी पोहोचलो. त्याने व्हाऊचरवर सही घेऊन ३०० की ३५० रुपये रोख हातावर ठेवले. आयुष्यातली पहिली कमाई. ‘माँ, ये लो मेरी पहली कमाई..’ असे म्हणत सिनेमातल्या आईच्या हातावर उत्साहाने पसे ठेवणारा नायक आठवला.
घरी काहीतरी गडबड आहे अशी कुणकुण त्या दिवसांत येता-जाता लागतच होती. पण आपल्याच धुंदीत असणाऱ्या मला ती जाणवतही नव्हती. आणि आपल्या मोठय़ा मुलाला ती जाणवतही नाही, या जाणिवेने आई-वडील निराश होत होते.. की नाही.. की नक्की काय.. ते आठवतं.. आणि घरातलं एक उदास वातावरण दिसत राहतं.
त्या संध्याकाळी मी घरी येऊन आईच्या हातावर ते सगळे पसे ठेवले तेव्हा तिने वाण्याकडे जाऊन धान्य आणलं आणि घरात स्वयंपाक केला, जेवण वाढलं आणि पहिला घास घेतला तेव्हा पोटात एकाएकी एकाकीपणाची पोकळी फिरते आहे असं वाटत राहिलं. कलावंताला कुठल्या अनाकलनीय धुंदीत सभोवतालच्यांत एकाकी असणं जाणवतंही नाही, हे आज कळतं.. पण..

द क्रीक ऑफ बेडस्प्रिंग्ज् सफिरग अंडर द वेट ऑफ रेस्टलेस मॅन इज् अ लोन्लीअर साऊंड आय नो टिल टुडे..

दुबेंजींकडे जाऊन आता चार-पाच वषर्र् झाली होती. रोज सकाळी त्यांच्या फ्लॅटवर जायचं, त्यावेळी चालू असलेल्या नाटकाची तयारी करायची.. म्हणजे सेन्सॉर सर्टििफकेट आणायचं, परफॉर्मिग लायसेन्स आणायचं, थिएटर बुकिंग पाहायचं, सेट तयार झाला की नाही यावर लक्ष ठेवायचं, तिकीट खिडकीवर बसून तिकिटं विकायची, आणि रात्री रंगमंचावर कामही करायचं- अशी सगळी कामं सुरू होती.
जॉर्ज बर्नार्ड शॉचं ‘व्हिलेज वुईंग’ तेव्हा दुबेजी बसवत होते. नाटकात नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक-शाह हे दोघेच होते.
मी आणि गणेश यादव दोघे बॅकस्टेज सांभाळत होतो. दोन-तीन महिने रिहर्सल झालेली होती. ‘त्या’ दिवशी माटुंग्याच्या कर्नाटक संघात दुपारपासून शेवटची रंगीत तालीम होती. स्टेजवर एक छोटंसं भाजी मार्केट लावलेलं. त्यात काही भाज्या, काही जिनसा ठेवलेल्या. (रात्री शो संपल्यावर मी आणि गणेश त्या सगळ्या भाज्या वाटून घेऊन घरी न्यायचो.)
हे दुकान रत्नाचं. त्यात नसीर येतो आणि तिथे सगळं नाटक घडतं. पहिल्या िवगेतून क्यूवर फोनची बेल वाजवणं, अंधारात कलाकाराची एक्झिट झाली की टॉर्च दाखवणं, वगैरे कामं माझ्याकडे होती. संध्याकाळी ग्रॅण्ड रिहर्सल सुरू होऊन रात्री ११ च्या आसपास ती संपली. सगळे निघून गेले. फक्त मी, दुबेजी आणि गणेश यादव असे तिघेच थिएटरमध्ये राहिलो. सर्व आवरून पायऱ्या उतरताना दुबेजी म्हणाले..
‘अच्छा.. कल सुबह हम दस बजे यहीं पर मिलते है. गुड नाइट.’
मी हबकून गेलो.
‘पर दुबेजी कल तो मैं नहीं हूँ. कल मेरा नासिक में ‘नटसम्राट’ का शो है. उस नाटक से कालिदास का ओपिनग हो रहा है. और ये बात मैंने आपको एक महिना पहिले ही बतायी थी.’
दुबेजी तिथेच थांबले. पॉज्. आणि माझ्याकडे रोखून पाहत म्हणाले, ‘कल तुम नहीं जाओगे.’
‘पर दुबेजी, मैंने आपको बताया था.’
‘बताया होगा.. पर कल तुम नहीं जाओगे.’
‘सर, कल उस पुरे थिएटर का ओपिनग है ‘नटसम्राट’ से. और अब लास्ट मिनिट पे मैं कैसे नहीं जा सकता हूँ?’
‘नो. यू कान्ट. कल तुम नहीं जाओगे. यू हॅव टु च्यूज् बिटवीन मी अॅण्ड डॉ. लागू.’
त्या काळात मी डॉ. लागूंसोबत ‘नटसम्राट’ नाटकात राजा बूटपॉलीशवाल्याची भूमिका करत होतो.
दिग्दर्शक माधव वाटवेंनी आवर्जून मला ते काम दिलं होतं. काही शोज् झाले होते. आणि नाशिकच्या कालिदासचं ओपिनग ‘नटसम्राट’ने होणार होतं. आणि हे मी दुबेजींना आठवणीने महिनाभर आधी सांगितलेलं होतं. तरी दुबेजी मला आता तिथे सोडायला तयार नव्हते.
एक थिएटर पर्सन म्हणून मी तेव्हा काय करायला हवं होतं?
एक अभिनेता म्हणून मी कसं वागायला हवं होतं?
एक शिष्य म्हणून मी काय सांगायला हवं होतं?
एक कलावंत म्हणून मी काय स्टॅण्ड घ्यायला हवा होता?
डॉ. लागूंसारखा महान नट, सुहास जोशींसारख्या अप्रतिम अॅक्ट्रेस, मधुकर नाईकसारखा उमदा प्रोडय़ुसर.. या सगळ्यांना मी आदल्या रात्री काय कळवणार होतो?
या घटनेनंतर मला यापकी कुणीही त्यांच्यासमोर उभं करतील का?
मी दुबेजींचं म्हणणं नाकारून गेलो असतो तर दुसऱ्या दिवसापासून मी त्यांच्या ग्रुपमध्ये नसतो. मग मी निरनिराळ्या व्यावसायिक नाटकांतून दिसलो असतो. कदाचित एक संपूर्ण व्यावसायिक नट म्हणून दिसत राहिलो असतो. कदाचित मला कामं मिळाली नसती.. कदाचित.. कदाचित..
पण मला गेल्या चार-पाच वर्षांत दुबेजींनी जे दिलं होतं ते इतकं बेसिक आणि मौल्यवान होतं, की अजून कितीतरी मला त्यांच्याकडून मिळवायचं होतं. मुळात त्यांनी मला ‘माझा आवाज’ दिला होता. ‘माझा आवाज’ ओळखायला शिकवलं होतं. पण तरी एक थिएटरचा माणूस दुसऱ्या थिएटरच्या माणसांशी अशा ऐनवेळी असा कसा वागू शकतो, हा प्रश्न मला पडला होता. ‘नटसम्राट’ आणि दुबेजी. या दोघांमध्ये मला ‘एक’ निवडायचं होतं. हातात फक्त एक रात्र होती. आणि निवड मलाच करायची होती.
निर्मल वर्माचं ‘तीन एकांत’मधलं वाक्य आठवलं..
‘चुनने की खुली छूट से बडी पीडा इस दुनियाँ में कोई नहीं.’
आपण सगळेच या प्रकारच्या निवडस्वातंत्र्याच्या दोलायमान रस्त्यावर एकाकी फिरत असतो.
आणि जी निवड करतो, त्या निवडीने ते- ते दिवस आठवून नंतर आणखी एकाकी होत जातो.

‘नटसम्राट’च्या त्या दिवसांतच आणखीन एक घडलं होतं.
एक दिवस दुपारी चारच्या आसपास मी आणि गणेश चहासाठी दूध आणायला म्हणून दुबेजी राहत होते त्या परिसरात खाली उतरलो. रस्त्यावरून जात होतो. समोरून एक सुंदर, गोरीपान, उंच मुलगी येत होती.
‘आयला, काय मस्तंय रे..’ असं म्हणत मी तिच्याकडे पाहतच ‘एक्स्क्युझ मी.. व्हॉटस् द टाइम?’ असं विचारलं.
गणेशच्या हातात घडय़ाळ होतं. ते पाहत तिनं रागाचा कटाक्ष टाकला आणि काही उत्तर न देता निघून गेली. अध्र्या तासाने दुबेजींच्या फ्लॅटवर पोहोचलो दूध घेऊन तर दुबेंसमोर तीच मुलगी बसलेली. आता आपलं काही खरं नाही- अशा मन:स्थितीतच दुबेंसमोर सावलीसारखा वावरत होतो. त्या मुलीला नसीरने दुबेंकडे अभिनय शिकण्यासाठी पाठवलं होतं. ती बडोद्याहून आली होती.
..आता मी, गणेश, राजश्री सावंत आणि ती गुजराती मुलगी- असा आमचा ग्रुप जमला. कविता पाठ करणं, पुस्तकं वाचणं, नाटकं वाचून काढणं, दुबेंजींनी सांगितलेले एक्सरसाइज करणं असं सगळं सुरू होतं. मध्यल्या काळात गणेश आणि राजश्री गायबच झाले. आम्ही दोघंच उरलो. ती आणि मी. माझे ‘नटसम्राट’चे शोज्ही सुरू होते.
त्या दिवशी रविवार होता. शिवाजी मंदिरमध्ये सकाळचा शो होता. एक अंक झाला होता आणि मेकअप रूममध्ये ती मुलगी मला भेटायला आली. खूप रडून तिचे डोळे सुजलेले. ‘बोलायचंय..’ म्हणाली. मी खाली आलो. आदल्या संध्याकाळी दुबेजींनी तिला रूमवर बोलावून घेतलं होतं आणि तिला खूप अद्वातद्वा बोलले होते. बडोद्याला परत निघून जायला सांगितलं होतं. कारण त्यांना वाटत होतं की, आम्ही दोघं प्रेमात पडलोय आणि ती माझं त्या वर्कशॉपमधलं लक्ष विचलित करते आहे.
‘आपलं तर काहीच तसं नाही.. मी खूप समजावलं त्यांना. पण ते म्हणाले, ‘मेरे बच्चे को बर्बाद मत करो. वो अच्छा कॉन्सन्ट्रेट कर के काम कर रहा है. उसका ध्यान डायव्हर्ट मत करो. गेट आऊट फ्रॉम हिज लाइफ.’
खूप खूप रडत होती ती.
‘मला खूप शिकायचं होतं रे त्यांच्याकडून. मला करीअर करायचं होतं अॅिक्टगमध्ये. पण दुबेजी इतकं काही बोलले की, आय डोन्ट वॉन्ट टु बी इन् बॉम्बे नाऊ. आय अॅम गोइंग बॅक. बाय..! अॅण्ड ऑल द बेस्ट ..’
निघून गेली ती. तिचा-माझा काही दोष नसताना दुबेजींना असं का वाटलं होतं, कुणास ठाऊक.
ती पाठमोरी जात असताना तिची चाल जितकी एकाकी वाटत होती, तितकं एकटेपण मी आजवर कुठल्याही पाठमोऱ्या जात्या व्यक्तीच्या चालण्यात पाहिलं नाही.

वी आर बॉर्न अलोन. वी लिव्ह अलोन. वी डाय अलोन. ओन्ली थ्रू अवर लव्ह अॅण्ड फ्रेण्डशिप वी कॅन क्रिएट द इल्यूजन फॉर द मोमेंट दॅट वी आर ‘नॉट’ अलोन.

– ऑर्सन वेल्स
‘प्रेमानंद गज्वीनं खूपच सुंदर नाटक लिहिलं आहे.. ‘गांधी- आंबेडकर.’ संध्याकाळी ये ऐकायला. वाचन ठेवलं आहे. मी बसवतो आहे..’ चेतन दातार म्हणाला.
संध्याकाळी दादरला कुठल्यातरी ठिकाणी प्रेमानंदने ते नाटक वाचलं. त्याआधी मी ‘गांधी विरुद्ध गांधी’मधला हरीलाल केलाच होता. प्रेमानंदचं वाचन ऐकतानाच वाटलं, की यातला आंबेडकर जर आपल्याला करायला मिळाला तर..?
‘मी तुझंच नाव निर्मात्याला सांगितलंय. बघू.. ’ चेतन म्हणाला.
ते नाटक व्यावसायिक रंगभूमीवर करायचं ठरलं होतं. दोन दिवसांनंतर.. ‘किशोर सोडून मला कुणीही चालेल, पण तो नको..’ असं निर्मात्यांनी सांगितलंय, असं चेतन म्हणाला.
माझं आणि त्या निर्मात्याचं काही भांडण नव्हतं. तरीही मी का नको, ते मला कळलं नाही. पण मला प्रेमानंदच्या त्या नाटकातल्या आंबेडकरांचे संवाद एकदा तरी म्हणायचे होते.
‘ठीक आहे. मग मी तुला असिस्ट करतो..’ मी चेतनला म्हटलं.
आंबेडकरांच्या भूमिकेसाठी माझं नाव सुचवण्याआधी मराठीतल्या एका नामवंत नटाला विचारणा केली होती, पण त्याने नकार कळवला होता. बऱ्याच घासाघिशीनंतर त्या भूमिकेसाठी एक नवा नट ठरवण्यात आला.
तालमी सुरू झाल्या. मी असिस्टंट होतो. दुबेजी स्कूलचा असल्याने आधीच अख्खं नाटक मी पाठ करून टाकलं होतं.
तो नट नसायचा तेव्हा त्याच्या जागी प्रॉक्सी म्हणून मी उभा राहायचो. विदुषकाच्या भूमिकेत भक्तीताई बर्वे होत्या. मधल्या चार-पाच दिवसांत त्या नटाच्या अडचणीमुळे तो येऊ शकला नव्हता. चेतनने मला व इतर नटांना घेऊन संपूर्ण नाटक ब्लॉक करून टाकलं. त्या नटाच्या अनुपस्थितीत तालमींना मी उभा राहू लागलो होतो. नाटकाला आठवडा असताना निर्मात्यांनी ‘सुरुवातीचे सगळे प्रयोग किशोरच करेल..’ असा अचानक निर्णय घेतला. त्या नटाला हे कळलं तेव्हा तो खूपच दुखावला गेला. त्याच्या अपरोक्ष मी निर्मात्यांना ‘असं नका करू. त्याला आणि मला आलटून- पालटून शोज् करू द्या,’ असं सांगितलं. पण निर्माते आपल्या निर्णयावर ठाम होते.
मुंबईत करीअर करण्यासाठी नवीनच आलेल्या त्या नटाची मानसिक अवस्था पाहून मलाही रडू फुटलं. अर्थात मी त्याच्या समोर रडलो नव्हतो. पण त्याच्या डोळ्यातल्या पाण्यातलं ते ‘एकाकीपण’ कुठल्याही नटाच्या एकाकीपणाला माझ्यात अजरामर करून गेलंय.

द वर्स्ट लोन्लीनेस इज् नॉट टू बी कम्फर्टेबल विथ युवरसेल्फ.
– मार्क ट्वेन
‘गेले चार दिवस हा काही बोलतच नाही. नुसता शून्यात नजर रोखून बसलेला असतो. आम्ही बोलतो ते त्याला कळतं का, ते माहीत नाही. खात-पितही नाही. अधूनमधून अंग गरम असल्यागत वाटतं. आणि कालपासून हा आम्हाला ओळखतो की नाही असं काहीसं वाटायला लागलंय.’
आई-वडिलांनी आमच्या येथील फॅमिली डॉक्टरकडे मला नेलं होतं. त्यांनी मला तपासलं आणि म्हणाले, ‘फिजिकली याला काहीही झालेलं नाही. पण याला खूप मोठ्ठा मानसिक धक्का बसलेला दिसतोय. याला कुठल्यातरी मानसोपचार तज्ज्ञाकडे न्यायला हवं.’
मग मला एका मानसोपचार तज्ज्ञाकडे नेण्यात आलं.
त्याने माझ्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.
आधी खूप वेळ तोच बोलत राहिला. पहिल्या दिवशी मी काहीच बोललो नाही.
कसल्याशा गोळ्या देऊन मला घरी पाठवण्यात आलं. दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून मी बोलायला लागलो.
एखादं पुस्तक वाचून मानसिक तोल इतका ढळू शकतो, याचं माझं मलाच आश्चर्य वाटायला लागलं.
‘त्या’ पुस्तकाबद्दल मी आधी खूप वाचलं होतं. आणि खूप प्रयत्नांती ते पुस्तक मिळवलं होतं. जेमतेम दीडशे पानांचं ते पुस्तक. पण त्यातलं पहिलंच वाक्य वाचून मी हबकून गेलो. ‘आई काल वारली. किंवा परवा असेल. मला नीटसं आठवत नाही. वृद्धाश्रमातून तिच्या निधनासंबंधीचं पत्र आलं. ज्यात लिहीलं होतं- ‘तुमची आई गेली. अंत्यविधी उद्या..’
ते पत्रं घेऊन मी बॉसकडे गेलो. त्यांना दाखवलं. ते माझ्याकडे सहानुभूतीपूर्वक पाहायला लागले.
ते तसे का पाहत होते कळलं नाही. मग ऑफिसमधले इतर लोक सहानुभूतीपूर्वक मला गर्दीनं भेटू लागले. गळाभेट घेताना मला खूप ऑकवर्ड वाटत होतं.’
असा काहीसा पॅरेग्राफ वाचून मी हबकून गेलो. पुढे वाचावं की न वाचावं, या संभ्रमातच काही वेळ बसून राहिल्यानंतर पुन्हा पुस्तक वाचायला सुरुवात केली.
स्वत:च्या आईकडे आणि आसपासच्या संबंधांकडे इतक्या तटस्थपणे, निर्वकिारपणे तो ‘मेयरसोल’ नावाचा नायक हळूहळू तितक्याच तटस्थ आणि कोरडेपणे माझ्यात कधी उतरत गेला, कळलंच नाही.
पुढे आईचं प्रेत ठेवलेल्या कॉफिनचं झाकण उघडण्यासाठी कारपेंटर स्क्रूड्रायव्हर, हातोडा घेऊन मेयरसोलला आईचं शेवटचं दर्शन घेता यावं म्हणून येतो. तेव्हा त्या कारपेंटरला थांबवून ‘नाही, नको. त्याची काही गरज नाही,’ असं त्या प्रेताइतक्याच थंडपणे सांगताना मेयरसोल सवयीने सिगारेट ओढत राहतो व नंतर शांतपणे तिथेच उभा राहून कॉफीचे मंद घोटही घेत राहतो.
दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी प्रेयसीसोबत सिनेमा व सहलीला जाणारा मेयरसोल! प्रेयसीनं ‘तुझं माझ्यावर प्रेम आहे का? तर आपण लग्न करू..’ असं विचारल्यावर ‘खरं म्हणजे या प्रश्नाला अर्थ नाही. पण तुझा आग्रह असेल तर करू लग्न..’असं म्हणणाऱ्या मेयरसोलकडून अनाहुतपणे एक खून होतो- ज्यात तो स्वत:ला दोषी मानतच नाही.
मॅजिस्ट्रेट त्याला विचारतो, ‘तू मेलेल्या शरीरावर गोळ्या का झाडल्या? आईच्या अंत्यविधीच्या वेळी तू इतका थंड कसा वागलास?’ त्यावर ‘कोणत्या वेळी काय वाटलं आणि काय केलं याची नोंद ठेवायची मला सवय नाही. आणि आईच्या मृत्यूनं कोसळवून टाकणारं दु:ख मला झालं नाही, हे मी कबूल करतो,’असं तो म्हणतो.
मेयरसोलच्या आचारविचारात अर्थशून्यता दिसते. जगाला काय वाटेल हा विचारच दिसत नाही. जगणं किती अॅब्सर्ड आहे. आपले वैयक्तिक संबंध किती अर्थशून्य आहेत!
‘आऊटसायडर’मधली छोटी छोटी वाक्यं एकमेकांत अर्थ न मिसळवणारी, वाचकाच्या कल्पकतेला वाव न देणारी, अलंकारिक भाषेपासून संपूर्ण फारकत घेतलेली, तटस्थ, थंड भाषा कधी कधी आपल्याही जगण्यात येते, हे जाणवून माझ्यापर्यंत चालत आलेला मेयरसोल माझ्या इतका खोल का उतरला असावा? इतरही वाचकांच्या आत तो तितकाच उतरला असेल का? ते सगळं वाचून सगळ्यांना माझ्याइतकाच एकाकीपणा आला असेल का?
या प्रश्नांची उत्तर मानसोपचाराच्या ट्रीटमेंटमधून मिळाली की नाही, ठाऊक नाही. पण आपल्या प्रत्येकात तितकाच थंड, अतिमानवी, कोल्ड, तटस्थ, रोखठोक आणि स्पष्ट मेयरसोल दडलेला असतो, हे नक्की. अल्बर्ट कामुला हे पुस्तक लिहिताना किती एकाकीपणा आला असेल! त्याने स्वत:ला कोरून काढलेल्या मेयरसोलला भाषेतून गाळत गाळत कागदावर कसा उतरवला असेल? असे अनेक प्रश्न त्या पुस्तकाच्या वाचनानंतर थंडपणे माझ्यावर चाल करून आले होते.
ते पुस्तक प्रकाशित झाल्यावर एका समीक्षकाने ते निकालात काढलं होतं. तेव्हा त्या समीक्षकाला लिहिलेल्या पत्रात अल्बर्ट कामु म्हणाला होता, ‘आय हॅव री-रिटन धिस बुक अॅटलिस्ट ट्वेंटीफाइव्ह टाइम्स.. अॅण्ड यू हॅव टेकन ओन्ली फ्यू सेन्टेन्सेस टु डिस्कार्ड इट.’
स्वत:च्या आरशात नितळ उतरून लिहिलेल्या, प्रतििबबित केलेल्या मेयरसोलवरील ती टीका अल्बर्ट कामुला किती एकाकी करून गेली असेल!
ज्यांना लेखक, कवी होता येत नाही ते समीक्षक झालेले लोकही आतून किती एकाकी असतील!

द स्ट्रॉंगेस्ट मॅन इन् द वर्ल्ड इज ही- हू स्टॅण्ड्ज अलोन.

दौऱ्यावर गेल्यानंतर दर दोन तासांनी घरी फोन करण्याची माझी नेहमीची सवय. सात-आठ दिवसांचा दौरा आटोपून मी सकाळी अकराच्या सुमारास मी घराजवळील रेल्वेस्टेशनवर पोहोचलो आणि घरी फोन लावला. पलीकडून आई फोनवर रडायलाच लागली.
‘अरे काय केलंस तू हे? असं कशाला करायचं? थोडा तरी विचार करायचा आमचा..’
‘काय झालं?’
‘काही नाही. आधी तू घरी ये..’ आईने फोन कट् केला.
घरी पोहोचलो तेव्हा कळलं, की माझ्या घरावर एक मोर्चा चालून आला होता. त्यातले लोक मला शोधत होते. आम्ही राहत असलेल्या घराची आणि दुकानाची नासधूस करण्याची धमकी त्यांनी दिली होती. त्या काळात मी एक िहदी सिनेमा केला होता. ज्यात मनोज वाजपेयी, सौरभ शुक्ला, मी इत्यादी लोक होतो. आणि दिग्दर्शक होता माझा एक मित्र. सिनेमामध्ये एका गुत्त्यावर सौरभ आणि मनोज दारू पित बसलेले असतात. आणि त्यांच्यातला एकजण म्हणतो-
‘अरे वो उधर ७७७ गांव में लडकी मिलती है..’ वगैरे वगैरे.
सिनेमा आदल्या दिवशीच रिलीज झाला होता. आणि त्यातला एक शो मी राहत असलेल्या गावातील एका नवनिर्वाचित युवक नेत्यानं पाहिला होता. आणि मायलेज घेण्यासाठी त्यानं गावातले काही लोक गोळा करून डायरेक्टरच्या ऑफिसवर नेले.
‘हमारे गाँव की बदनामी हो गयी है.. आपको माफी मांगनी पडेगी.’
म्हणून एका चॅनलच्या वार्ताहराला घेऊन त्याने दिग्दर्शक मित्राचं ऑफिस गाठलं होतं. आणि त्याच्यासोबत उभं राहून माफीनामा शुट केला होता. जो दुसऱ्या एका पार्टीच्या नुकत्याच पदग्रहण केलेल्या युवा नेत्यानं टीव्हीवर पाहिला आणि आपल्यापेक्षा हा जास्त भाव खाऊन जातोय, या भावनेनं तोही पेटून उठला आणि त्याने दोन ट्रक भरून गावकरी गोळा केले व दिग्दर्शक मित्राच्या ऑफिसमध्ये जाऊन त्याच्या तोंडाला काळं फासलं. त्याआधी त्यांचे काही लोक मला घेऊन ऑफिसचा पत्ता शोधून आले होते. आणि आता मीही त्या ऑफिसमध्येच होतो. त्यांनी माझ्यादेखत सर्व ऑफिसची नासधूस केली. माझ्या डोळ्यादेखत माझ्या दिग्दर्शक मित्राच्या तोंडाला काळं फासलं. दुसऱ्या दिवशी दुपारी गावात येऊन गावकऱ्यांची जाहीर माफी मागण्याचा आदेश दिला.
दुसऱ्या दिवशी मी, माझा दिग्दर्शक मित्र, त्याचे काही साथीदार भरदुपारी उन्हात कडक पोलीस बंदोबस्तात गावातल्या नाक्यावर पोहोचलो. भररस्त्यात एक स्टेज उभारण्यात आलं होतं. त्यासमोर र्अध गाव जमा होऊन रस्त्यावरच ठाण मांडून बसलं होतं. स्टेजवर एका पार्टीचे काही तथाकथित प्रमुख नेते उपस्थित होते. मला आणि मित्राला स्टेजवर नेण्यात आलं. एका अतिशय वयोवृद्ध म्हातारीच्या पायावर डोकं ठेवून त्याला सगळ्यांच्या समोर माफी मागायला लावण्यात आली.
ते सगळं पाहत असताना.. हेच का ते सर्व लोक- ज्यांच्यात मी लहानाचा मोठा झालो?
ज्यांच्यासमोर मी घडत गेलो?
ज्यांनी वेळोवेळी माझ्यावर प्रेम केलं?
हेच का ते सगळे सवंगडी- जे माझ्यासोबत लहानपणी खेळले.. बागडले?
यांनीच का मला माझ्या काही घरगुती अडचणींच्या वेळी मदत केली?
असे अनेक प्रश्न पडले होते. केवळ माझ्या गावाचं नाव सीन इम्प्रोव्हाइज् करताना आपोआप, सहज घेतलं गेलं- ज्याची इतकी मोठ्ठी किंमत माझ्यासमोर विनाकारण माझ्या दिग्दर्शक मित्राला मोजायला लागली होती. आणि मी हतबलपणे नुसता पाहत राहिलो होतो.
आपण कुठल्या देशात राहतो?
लोकशाही म्हणजे काय?
अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय?
आपले लोक म्हणजे काय?
आपलं गाव म्हणजे काय ?
असे अनेक प्रश्न त्या प्रसंगानंतर माझ्या सभोवती समुद्राच्या गाजेसारखे फेर धरून नाचू लागले.
अपरिहार्यपणे आपल्याही नकळत राजकारण कसं आपल्या जगण्यात शिरतं, त्याचा तो एक भयाण अनुभव होता.
रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि सारी रात्र गाजेतून बोलणारा समुद्र.. पहिल्यांदा प्रेमात पडल्यानंतर ज्याच्या किनारी जाऊन ढसाढसा रडलो तो समुद्र.. पडत, धडपडत ज्याच्या किनारी भाडय़ाची सायकल घेऊन तोल सावरायला शिकलो तो समुद्र.. जगण्याचं भान देणारा आणि भावनेला त्राण देणारा आणि भरती-ओहोटीला मान देणारा समुद्र.. त्या रात्री खूप एकाकी वाटला. एरवी एकटा असताना मी समुद्रकिनारी भटकायचो. त्या रात्री समुद्रच शेजारी येऊन बसला आणि आपले किनाऱ्याचे हात माझ्या गळ्यात टाकून मुसमुसून खूप रडला.
‘सिनेमा पॅराडीसो’मधल्या प्रोजेक्टर ऑपरेटरप्रमाणे मला म्हणाला, ‘जा. जा. जा. इथून निघून जा. पुन्हा कधीच परत येऊ नकोस. हे गाव आता तुझं नाही राहिलं. इथली माणसं तुला आता परकी झाली..’
त्यानंतर काही वर्षांतच ज्याच्यासोबत आपण आयुष्य काढू असं ठरवलेला समुद्रकिनाऱ्याचा तो गाव मी सोडून दिला. पण तिथला समुद्र आजही त्या बाजूला गेल्यावर हात हलवून म्हणतो, ‘पुढे हो. पुढे हो. पुढे हो. आत शिरूनकोस.’
पण माझी आई आणि भाऊ आजही तिथेच राहतात. मला त्यांना तिथून काढायचंय, पण ते जमत नाही. कधी त्यांना भेटायला गेल्यावर ‘इजाजत’मधला गुलजारसाहेबांचा तो डायलॉग आठवतो..
‘हॉं.. वही शहर है.. वही गली.. सब कुछ तो वोही नहीं है.. पर है वहीं..’


आय हॅव गॉट एव्हरीिथग आय नीड- एक्सेप्ट अ मॅन. अॅंड आय अॅम नॉट वन ऑफ दोज विमेन हू िथक्स अ मॅन इज दि आन्सर टू एव्हरीथिंग.. बट आय अॅम टायर्ड ऑफ बीइंग अलोन..

हा राजीव पाटील समजतो कोण स्वत:ला? त्याने तीन-चार सिनेमे केले, पण माझ्यासारख्या नटाला त्याने एकदाही कास्ट केलं नाही, असं मला वाटत असतानाच राजीवचा एकदा फोन आला- ‘कल सुबे गोरेगांव में मिल, एक सिनेमा करतोय. त्यात रोल आहे तुला.’
रात्रभर विचार करत होतो- आता मस्त रांगडा, तगडा व्हिलन वगैरे देतोय हा आपल्याला. समोर कुणीही असो- मारून नेऊ.. वगैरे वगैरे.
आम्हा अॅक्टर्सना जेव्हा एखादा रोल विचारला जातो आणि मीटिंगला बोलावण्यात येतं तेव्हा सगळ्यांच्याच मनात रोलबद्दलची उत्सुकता आणि अपेक्षा असतात. पण ठरवलेल्या अपेक्षेपेक्षा वेगळंच काही घडल्यावर वाईट वाटतं. एकाकी वाटतं.
सकाळी नऊलाच कॅफे कॉफी डेमध्ये गोरेगावला पोहोचलो.
‘तुला एका छक्क्याचा रोल करायचाय..’ राजीव म्हणाला.
कडेलोट झाला. नव्र्हस झालो. सयाजी िशदेने ‘झुलवा’मध्ये बेन्चमार्क करून ठेवलेल्या भूमिकेनंतर कुणीही साडी नेसून रोल करणं म्हणजे मूर्खपणा होता. पण हे काही चेहऱ्यावर न येऊ देता मी होकार भरला. कारण काम नव्हतं. आणि राजीव गॅंगमध्ये घुसण्याची ती एक संधी होती. आणि त्याने अॅक्टर म्हणून माझ्यावर टाकलेला तो विश्वास वा अविश्वास होता. इतक्या वर्षांचा दुबे स्कूलचा अनुभव वगैरे वगैरेवर मी तो निभावून नेईन यावर माझा विश्वास होता. आणि शिवाय संजय पाटीलने तो रोल खास माझ्यासाठी लिहिला होता. आणि शूटिंगच्या वेळी चर्चा करून अॅक्टर्सला समजावून घेण्याच्या स्कूलचा राजीव दिग्दर्शक होता.
शूटिंगच्या वेळी दोन दिवस आधीच तिथे पोहोचलो होतो. गडिहग्लजच्या परिसरात अजूनही कित्येक जोगते आहेत. तो परिसर, तिथले लोक, त्या प्रथा, ते मंदिर वगैरेंमुळे ते लोकेशन निवडलं गेलं होतं. तिथल्या एका जोगत्याशी- जो आम्हाला मदत करत होता- माझी ओळख करून देण्यात आली. दोन संपूर्ण दिवस त्याचं घर, आजूबाजूचे त्याचे मित्र, त्यांचं जोगवा मागणं, त्यांचं लग्न, त्यांचे सण, त्यांच्या प्रथा याविषयी त्याच्याशी बोलत राहिलो.. पाहिलं.

आणि शूटिंगचा दिवस उगवला.
माझा कॉल टाइम लंचनंतर होता. पण मी बारा-साडेबारालाच तिथे पोहोचलो होतो. उपेंद्रने साडी नेसलेली. केस वाढवलेले. तसा मेकअप् केलेला. सोबत अदिती देशपांडे, स्मिता तांबे, प्रिया बेर्डे, शर्वाणी धोंड, मुक्ता बर्वे होत्याच. लंच टाइम झाला. जेवण झाल्यावर राजीवने मला मेकअप् करून घ्यायला सांगितलं. मी मेकअप्ला बसलो. बराच वेळ तो चेहऱ्याचं काय करत होता, माहीत नाही. शेवटी त्याने आरसा दाखवला. आणि मी सुन्न झालो. मी असा दिसतो? त्या मेकअप्नंतर माझं रूपच पालटून गेलं होतं. मग मला कॉस्च्युम चेंज करायला सांगण्यात आलं. कपडेपट पहिल्या मजल्यावर होता. आजूबाजूला काही मुली काही चेंज करत होत्या. एक अतिशय मॉडर्न मुलगी अगदी उत्साहाने हातात परकर-पोलकं घेऊन आली. म्हणाली, ‘सर, हा परकर घाला..’ मी आतल्या खोलीत गेलो. पॅन्ट काढली, शर्ट काढला आणि परकर चढवला. नाडी बांधली. अंडरवेअरचा ताण जाणवायला लागला. वर उघडा व खाली परकर. मग पोलकं चढवू लागलो आणि एक विलक्षण थरार शरीरात जाणवू लागला. पोलक्याचा छाती-पाठीला होणारा स्पर्श.. बरगडय़ांवर बटण लावताना एक एक्साइटमेंट जाणवायला लागली. छातीवरली छोटी काळी स्तनागं्र ताठ व्हायला लागल्यासारखं वाटलं.
एक पुरुषासारखा पुरुष जेव्हा पहिल्यांदा परकर-पोलकं घालतो तेव्हा त्याला काय वाटत असेल, याचा कधी विचारही न केलेला मी भयानक हादरून गेलो.
कशासाठी करतोय मी हे?
पुरुष असून परकर-पोलकं, साडी नेसून..
व्हॉट अॅम आय ट्राइंग टू डु?
अॅण्ड व्हाय अॅम आय डुइंग इट?
टु प्रुव्ह मायसेल्फ अॅज अॅन अॅक्टर?
बट आय हॅव ऑलरेडी प्रुव्हड् राइट मेनी मेनी टाइम्स इन् मेनी अदर रोल्स.
अॅण्ड टु हूम अॅम आय प्रुिव्हग राइट?
टू मायसेल्फ?
टू राजीव?
ऑर टू ऑल दीज् गर्ल्स अराऊंड हिअर?
ऑर अॅम आय डुइंग राइट फॉर मनी?
का..? का मी करतोय हे? ..अशा अनेक प्रश्नांच्या जंजाळात मी परकर-पोलकं घातलेल्या माझ्याकडे आरशातून मलाच पाहत उभा राहिलो.
नको.. नको.. अगदी टेचात हा परकर उतरवून निघून जावं इथून.
‘नाही करायचं मला हे..’
पण लोक काय म्हणतील?
या इथल्या सुंदर सुंदर मुली काय म्हणतील?
राजीव काय म्हणेल?
दुनिया काय म्हणेल?
संजय जाधव काय म्हणेल?
‘साला सेट छोड के भाग गया. अपने आपको अॅक्टर बोलता है.. साला पिछवाडे पांॅव लगाके भाग गया..’ अशा चर्चा ऐकू येतील. परत कुणीच काही चॅलेंजिंग काम देणार नाही. फक्त कवितांचे कार्यक्रम करत गुजराण करावी लागेल.
‘हॅट साले.. हरामजादे.. भगौडे.. धत्.. निकल जावो मेरे सामनेसे..’ असा दुबेजींचा आवाज कानात घुमायला लागला.
अॅक्टर हा किती इन्सिक्युअर्ड असतो.. किती हतबल, किती बिचारा असतो, याची जाणीव झाली. राजीव उपेंद्रचा जवळचा मित्र आहे. दोघेही दारू पिताना खदाखदा हसतील.. असं काय काय डोक्यात घुमू लागलं. डोकं सुन्न झालं.
मी डोकं धरून तिथेच फतकल मारून बसलो. इतका वेळ आत गेलेले सर काय करतायत म्हणून ती मॉडर्न कॉस्च्युम डिझायनर आत डोकावून गेली. बाहेर मुलींच्या हास्याचा एक फवारा ऐकू आला. बहुतेक माझ्यावरच हसत असाव्यात. शेवटी उठलो. किती वेळ तसंच बसणार? ती मुलगी आली आणि साडी नेसवू लागली. काय हा दैवदुर्विलास! एक मुलगी पुरुषाला साडी नेसवते आहे. शेवटी मी संपूर्णपणे स्वत:ला तिच्या हवाली केलं. तिने साडी नेसवली. मेकअप केला होताच. साडी नेसलेल्या, ‘तसा’ मेकअप् केलेल्या मला मी आरशात पाहिलं. टाळ्या वाजवत सिग्नलवर जवळ येणारे तृतीयपंथी आठवले. त्यांच्याकडे पाहून वाटणारी किळस आठवली. बाईवेषातले पुरुषी आवाज आठवले. त्यांच्या नशिबी जे आलं, तेच वेगळ्या अर्थानं आपल्याही नशिबी का? हा प्रश्न पडला. एकाकीपणाचे एकेक बुरुज उभे राहत राहत सुन्नतेचा कडेकोट किल्ला तयार झाला. चालताना पायांना, मांडय़ांना जाणवणारा साडीचा स्पर्श, पोलक्याचा छाती-पाठीवरला स्पर्श, कमरेखाली मागे कुल्ल्यांना होणारा स्पर्श, आत घट्ट झालेल्या अंडरवेअरचा ताण.. हे सगळं वेगवेगळं एक-एक जाणवू लागलं. काहीच झालं नाही असं भासवताना हळूहळू चाल बदलत गेली. एक.. दोन.. तीन.. चार.. पाच.. सहा.. दहा पावलं चालल्यानंतर आपण तेच झालो आहोत असं वाटू लागलं. पावलागणिक ‘आपण पुरुष आहोत’.. ‘आपण पुरुष आहोत’ ही जाणीव स्वत:ला करून द्यावी वाटली. चालण्याची सवय व्हावी, वॉक ठरवावा म्हणून दूरवर चालत गेलो. गावातले काही लोक फिस्सकन् हसल्याचं दिसत होतं. हा कोण नवीन जोगत्या, असं त्यांना वाटलं असावं.
मग भीड चेपावी, सवय व्हावी म्हणून रोज सकाळी सातलाच साडी नेसून घेऊ लागलो. कधी कधी हॉटेलवरून मेकअप करून, साडी नेसूनच बाहेर निघायचो.. शूटला जायला. पण साडी नेसल्यानंतर शरीरातला काम आणखीनच तीव्र होतोय याची जाणीव झाली.
‘आता सेक्स करावा.. आता सेक्स करावा’ असं क्षणोक्षणी वाटू लागलं. कधी कधी, आपल्याकडून आता काही होणार नाही याची भीती वाटून टॉयलेटमध्ये शिरून साडी वर करून हस्तमथुनही करून पाहिला. आपल्यातला पुरुष जागृत ठेवण्याची धडपड.. आपल्यातला पुरुष संपल्याची शंका.. यातून सावरत ते दिवस चालले होते.
जे करावंसं वाटत नाही, जे व्हावंसं वाटत नाही, तेही करत असतानाचा एकाकीपणा अनुभवण्यासाठी प्रत्येक अॅक्टरने एकदा तरी एकांतात साडी नेसून पाहायला हवी. आणि प्रत्येक अॅक्ट्रेसने पॅन्ट-शर्ट चढवून आपण पुरुष असल्यासारखं वागून बघायला हवं..

जगताना पदोपदी वाटय़ाला आलेलं हे एकाकीपण उलगडून सांगताना जाहीररीत्या एकांत केल्यासारखं वाटतंय. तरी हे सांगतानाही एकाकीपणाचे बुरुज ढासळून पडताहेत.
सार्वजनिक केल्यासारखं वाटतंय; पण तरीही सांगतानाही एकाकीच वाटतं आहे. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की, एकटेपणाचे बुरुज भक्कम असतात.
देअर आर दोज हू वíशप लोन्लीनेस.. आय अॅम नॉट वन ऑफ देम.
इन धिस एज ऑफ फायबर ग्लास, आय अॅम सìचग फॉर जेम
द ख्रिस्टल बॉल अप ऑन द वॉल हॅजन्ट शोन मी निथग यट
आय हॅव पेड द प्राइस ऑफ सॉलिटय़ूट
बट अॅट लास्ट आय अॅम आऊट ऑफ डेब्थ…