काही वर्षांपूर्वी यामहा कंपनीने स्पोर्टी लुक आणि दणकट असलेली एफझेड भारतीय बाजारात उतरवून मध्यमवर्गीय युवकांना भुरळ घातली होती. त्यांना युवावर्गासह इतरांकडूनही मोठी मागणी होती. एफझेडची क्रेझ अद्याप कायम असली तरीही १५० सीसी किंवा त्यापेक्षा अधिक इंजिन क्षमता असलेल्या मोटारसायकली गेल्या दोन वर्षांत बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. सुझुकी, हिरो मोटोकॉर्प, टीव्हीएस आणि होंडा या नामवंत कंपन्यांनी स्पर्धेत उडी घेतली आहे.

सुझुकी जिक्सर आणि एसएफ

सुझुकी या जपानी कंपनीने याआधी भारतीय बाजारात कमी श्रेणीच्या मोटारसायकली उतरविल्या होत्या. मात्र त्या फारशा यशस्वी न ठरल्याने यामहा एफझेडला टक्कर देऊ शकणारी जिक्सर ही १५५ सीसी इंजिन क्षमतेची मोटारसायकल भारतीय बाजारात २०१४मध्ये उतरवली. सुझुकीच्या जीएसएक्स- आर १००० या सुपरबाइकचे कमी श्रेणीतील मॉडेल आहे. एफझेडला स्पर्धक म्हणून जिक्सरकडे पाहिले जाते. परफॉरमन्स, सस्पेन्शन, अ‍ॅव्हरेजच्या बाबतीत ही मोटारसायकल उत्तम असली तरीही काही मुद्दय़ांवर कंपनीने ग्राहकांचा हिरमोड केला आहे. मोटारसायकलला वापरण्यात आलेले पार्ट्स काही प्रमाणात कमी प्रतीचे आहेत. इंजिन बंद करण्याचे, इंडिकेटरचे आणि सुरू करण्याची बटणे एफझेडच्या तुलनेत कमी प्रतीची वाटतात. तसेच पेट्रोल टाकीला देण्यात आलेला आकार स्पोर्टीपणा आणत असला तरीही रंगाचा दर्जा साशंक करतो. छोटय़ा छोटय़ा गोष्टींचेही ओरखडे लगेच लक्षात येतात. या काही गोष्टी सोडल्या तर ही मोटारसायकल ग्राहकांना भुरळ घालणारी आहे. इंजिनक्षमता जास्त असूनदेखील ५५ ते ५८ च्या आसपास अ‍ॅव्हरेज (कंपनीचे ६३) देते. चांगले मायलेज देण्यासाठी कंपनीने सुझुकी इको परफॉरमन्स (एसईपी) हे तंत्रज्ञान वापरले आहे. आणखी एक सरस बाब म्हणजे पुढील डिस्क ब्रेक लावल्यावर गाडी स्मूथ थांबते. स्पोर्टी लुक येण्यासाठी दोन एक्झॉस्ट असणारा सायलेन्सर वापरण्यात आला आहे. पहिल्यांदा जिक्सर काही मोजक्याच रंगात उपलब्ध होती. आता विविध रंगांच्या संयोगामध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. जिक्सरनंतर यामहाच्या फेझर, आर-१५ ला टक्कर देण्यासाठी जिक्सर-एसएफ बाजारात आली आहे.

वजन- १३५ किलो.
इंजिन क्षमता- १५४.९ सीसी
प्रकार- ४-स्ट्रोक, सिंगल सिलिंडर, एअर कुल्ड
सस्पेंशन- मोनो
किंमत- ८४ ते ८६ हजार
होंडा युनिकॉर्न १६०

युवावर्गाची गरज ओळखून यामहाने स्पोर्टी लुक असलेली एफझेड-१६ ही स्पोर्ट बाइक २००८मध्ये भारतीय बाजारात आणली. या बाइकला मोठा प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला नेक्ड श्रेणीतील मोटारसायकलनंतर फेअिरग असलेली फेझर, आर-१५ अशा मोटारसायकल उतरवून भारतीयांना या कंपनीने भुरळ घातली. दणकट आणि धूम स्टाइल वेग यामुळे ही मोटारसायकल काही काळातच तरुणांमध्ये लोकप्रिय बनली होती. मोटारसायकल इतर बाबतीत सरस असली तरी अ‍ॅव्हरेजमध्ये मार खात होती. ४०-४५ किमीचे मायलेज मिळत होते. यामुळे कंपनीने ‘फ्युएल इंजेक्शन’ आणि ‘ब्लु कोअर’ हे तंत्रज्ञान वापरत २०१४ मध्ये नवीन मॉडेल बाजारात आणले. तसेच इतर बदल करताना जुन्या मॉडेलचे वजन १३५ होते ते दोन किलोने कमी केले. तसेच इंजिन क्षमता १५३ सीसीवरून १४९ सीसीवर आणले. मोटारसायकलच्या रंगांमध्येही आकर्षकपणा आणताना विविध संयोगांमध्येही उपलब्ध केली आहे. नव्या मॉडेलमध्ये सायलेन्सर, सीटची रचना, टायरचा आकार आदींमध्ये बदल केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे पावसाळ्यात पाठीमागे बसलेल्या व्यक्तीवर चिखल उडणार नाही याची काळजी घेत कंपनीने मडगार्डची सोय केली आहे. पहिल्या मॉडेलमध्ये याची उणीव पावसाळ्यात प्रकर्षांने जाणवत होती.

इंजिन क्षमता- १४९ सीसी
प्रकार- ४-स्ट्रोक, एअर कुल्ड, एसओएचसी, २-व्हॉल्व्ह
सस्पेन्शन- टेलिस्कोपिक, मोनोक्रॉस
किंमत- ८२ ते ८३ हजार

बजाज एएस पल्सर

बजाज या भारतीय कंपनीने पल्सर श्रेणीतील १५० ते २२० सीसी इंजिन क्षमता असेलेली अनेक मॉडेल बाजारात उतरविली आहेत. मागील काही वर्षांपासून सतत नवनवीन मॉडेल बाजारात आणण्याचा कंपनीचा प्रयत्न असतो. कंपनीने प्रसिद्ध अ‍ॅव्हेंजर या मोटारसायकलला नवीन लुक देत बाजारात आणले आहे. कमी किमतीत अद्ययावत मोटारसायकल देण्याचा प्रयत्न असला तरीही मेन्टेनन्समध्ये या मोटारसायकली मार खातात. काही वर्षांनंतर मोटारसायकल खिळखिळी होत असल्याचा अनुभव ग्राहकांना पहिल्या पल्सरपासून येत आहे. या श्रेणीमध्ये कंपनी चांगले मायलेज देण्याचा प्रयत्न करते. काही वर्षांपासून कंपनी डीटीएसआय तंत्रज्ञान वापरत आहे. एस पल्सर १५० आणि २०० सीसीमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने स्पोर्टी लूक देण्याकडे विशेष लक्ष पुरविले आहे. वजनाच्या बाबतीत स्पर्धेतील इतर मोटारसायकलना मागे टाकत १५० सीसीचे १४३ तर २०० सीसीचे १५३ किलो ठेवले आहे.

इंजिन क्षमता- १४९.५ / १९९.५ सीसी
प्रकार- ४-स्ट्रोक, एअर / लिक्विड कुल्ड
सस्पेन्शन- टेलिस्कोपिक अ‍ॅण्टी फ्रिक्शन बश, मोनो(नायट्रॉक्स)
किंमत- ७९/९३ हजार.
होंडा युनिकॉर्न १६०

हिरो या कंपनीशी संयुक्त करार असताना होंडा कंपनीने आपली दमदार सीबी युनिकॉर्न बाजारात आणली होती. ही मोटारसायकल १५० सीसी प्रकारातील होती. चांगले मायलेज, दणकटपणा आणि परफॉरमन्समुळे ही मोटारसायकल लोकप्रिय झाली. मात्र, युवावर्गाला हवा असलेला आकर्षक स्पोर्टीपणा या मॉडेलमध्ये आणण्यात कंपनी कमी पडली. यानंतर होंडाने या श्रेणीमध्ये स्पर्धा करण्याचा प्रयत्न केला. डॅझलर सपशेल अपयशी ठरल्यानंतर २०१३मध्ये ट्रिगर बाजारात आणली मात्र स्पोर्टीपणा नसल्याने तीनेही विक्रीमध्ये मार खाल्ला. यानंतर कंपनीने युनिकॉर्न-१५०लाच नवे रूपडे देत १५०+ सीसीच्या स्पर्धेत तग धरण्यासाठी इंजिनक्षमता १६०सीसी करीत बाजारात आणले. इंजिनक्षमता वाढवूनही चांगले मायलेज देण्यात कंपनी यशस्वी ठरली तरीही मात्र मोटारसायकलमध्ये स्पोर्टी लुकची कमतरता जाणवते.
पाठीमागील ब्रेकलाइटवर होंडाचा एच आकार काढून, पेट्रोल टाकीचा आकार व पुढील फेअरिंग बदलून कंपनीने काही अंशी ग्राहकांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न केला आहे. चांगल्या प्रतीचे पार्ट्स वापरण्यात आले आहेत. स्टॅण्डर्ड आणि सीबीएस अशा दोन प्रकारांत ही मोटारसायकल उपलब्ध आहे. भारतीय बाजारपेठेची गरज ओळखून होंडाने स्पोर्टी लुक देणारी सीबी हॉर्नेट १६० आर ही मोटारसायकल नुकतीच भारतीय बाजारात आणली आहे. अद्याप तिची विक्री सुरू नसली तरीही सुझुकी जिक्सर, एफझेडला चांगला पर्याय देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे.

इंजिन क्षमता – १६२.७१ सीसी
प्रकार- ४-स्ट्रोक, एअर कुल्ड, एसआय
सस्पेन्शन- टेलिस्कोपिक, मोनो (हायड्रॉलिक)
किंमत – ७२ ते ७८ हजार

हेमंत बावकर

hemant.bavkar@expressindia.com