dr04 २०११ साली वयाच्या ५९ व्या वर्षी गाडी घेतली आणि घरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मुलगा दोन-तीन दिवसांत गाडी शिकला व हौसेने आम्हाला ठिकठिकाणी घेऊन गेला, पण थोडय़ाच दिवसांत कंटाळला. आम्ही मात्र चातकासारखी तो प्रसन्न होऊन आम्हाला फिरायला घेऊन जाईल याची वाट पाहत बसायचो, मनात संताप आणि असहायता दाटून यायची.
एक दिवस तिरमिरीत येऊन प्रतिज्ञा केली की, काहीही झाले तरी ड्रायव्हिंग शिकायचंच आणि ड्रायव्हिंग स्कूल गाठलं. वयाच्या ५९ व्या वर्षी गाडी शिकता येईल का म्हणून चौकशी केली. त्यांनीही ८० वर्षांच्या माणसाला गाडी शिकवल्याचे सांगितले (खरे-खोटे तेच जाणोत) आणि आमचे गाडी शिकणे सुरू झाले. थोडय़ाच दिवसांत लक्षात आले की शेजारी बसलेला ट्रेनरच गाडी नियंत्रित करतो आणि उगाचच आपल्याला गाडी आल्याचा भास होतो. (बलगाडी पुढे चाललेल्या कुत्र्यासारखा) रोज २० ते २५ मिनिटे असा महिन्याचा कोर्स संपला, पण स्वतंत्र गाडी चालवण्याचा अजिबात विश्वास वाटेना. गाडी शिकायचा निश्चय मात्र कायम होता. (खरे तर मुलाची जिरवायची होती.) ओळखीतला एक खासगी ट्रेनर बघितला. निरक्षर पण गाडी उत्तम शिकवतो, असा त्याचा लौकिक होता. त्यानेसुद्धा १५ दिवसांत गाडी शिकवतो, असे सांगून ५००० रु. फी सांगितली. परत एकदा गाडी शिकणे सुरू झाले, पण १५ दिवस संपत आले तरीही मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये गाडी चालवता येईल असे वाटेना. त्याची मुदत संपत आल्याने तोही कंटाळला. आता मात्र प्रेस्टिज इश्यू झाला.
१५व्या दिवशी एक कल्पना सुचली. त्याच ट्रेनरला रोजंदारीवर ठेवले. सकाळ-संध्याकाळ शिकवायचे दिवसाला ५०० रु. कबूल केले. मग मात्र त्याचा उत्साह वाढला. त्यांनी जीव तोडून गाडी शिकवली व मी जीव तोडून गाडी शिकलो. गाडी शिकताना माझ्यासाठी सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे तिसरा गीअर टाकणे, काहीही केल्या तो पडायचाच नाही. म्हणून मी कित्येक वेळा दुसऱ्या गीअरमध्येच गाडी चालवायचो आणि ट्रेनरच्या चेष्टेचा विषय ठरायचो. जवळजवळ २० ते २५ दिवस गाडी शिकलो, अगदी पूर्ण विश्वास येईपर्यंत. आज मी अत्यंत सफाईने गाडी चालवू शकतो. मुंबईच नव्हे, तर पुणे आणि कोल्हापूरलासुद्धा गाडी घेऊन गेलोय. गाडी चालवणे हे माझे व्यसन झाले आहे.
२०१२ साली सेवानिवृत्त झालो आणि आता जवळजवळ रोज मी व पत्नी गाडीने फिरतो. (नाटक, सिनेमा, मॉल्स, समुद्रकिनारे, वेगवेगळ्या ठिकाणची मॉर्निग वॉक, अपना बाजार वगरे) गाडी शिकण्याचा आनंद शब्दात वर्णन करण्यापलीकडचा आहे. मुलगा मात्र म्हणत असतो- ‘‘बाबा, मी कंटाळा केला म्हणून तू गाडी शिकलास!’’ आज दर गुरुपौर्णिमेला त्या निरक्षर ट्रेनरला सलाम करतो व त्याने सांगितलेल्या सर्व सूचनांचे पालन करतो.
प्रमोद शिकारखाने, मालाड, मुंबई

गरज बनली आवड
dr06गाडी शिकायला सुरुवात केली ती केवळ गरज म्हणूनच. मुलीची स्कूल बॅग, स्वत:ची पर्स सांभाळत रिक्षाने जाण्या-येण्याचा प्राणायाम अनुभवलेला. त्यामुळे प्रवासखर्च व गाडीचे लोन याचा अंदाज घेऊन गाडी घ्यायचे ठरवले व ड्रायिव्हग स्कूलचे धडे सुरू केले. कॉलेज जीवनात दोनचाकी (लुना) चालवलेली, त्यामुळे सुरुवातीला वाटले अरे ही तर आरामदायक चारचाकी! बॅलन्स सांभाळण्याचा तर येथे प्रश्नच नाही. लायसन्स मिळाल्यावर गाडी विकत घेतली. जुन्या गाडीवर हात साफ करायचा हा अनेकांचा सल्ला या अननुभवी विद्याíथनीने पाळला व सेकंड हँड ‘मारुती ८००’ ची निवड केली. गाडी चालवणे हे किती जबाबदारीचे काम आहे हे मात्र तेव्हा कळू लागले.
एक-दोनदा सिग्नलला थांबवलेली ट्रॅफिक माझ्या आताही लक्षात आहे. एकदा मात्र बसच्या नेमकी समोर असलेली गाडी मला सुरू करता येईना. बसचालकाने जोरजोरात दिलेला हॉर्न, बघ्यांची गर्दी, प्रसंगावधान राखून नवरा ड्रायव्हर सीटवर बसला व गाडी सुरळीत पुढे नेली. मी मात्र हा माझ्यातल्या स्त्रीशक्तीचा अपमान आहे असे समजून बराच वेळ गप्प बसून होते. मग मात्र मी एकटीने सफाईने गाडी चालवायला शिकले. अनुभवाने माणूस शहाणा होतो ना तसे. आज माझ्याकडे मारुतीचीच झेन एस्टिलो ही गाडी आहे. तिची माझी रोजची धावपळ सुरू आहे. तीच माझ्या प्रत्येक मन:स्थितीची साक्षी आहे. हल्ली मात्र कधी कधी हिचा ताबा माझ्या मुलीकडे असतो. गाडीभोवती माझी जरी भावनिक गुंतवणूक असली तरी मुलीला मात्र मंत्र दिला आहे की गाडीचे वाटेल ते नुकसान झाले, हरकत नाही कोणत्याही जिवाला मात्र अपाय होता कामा नये. मुलीला जरी हाय स्टेट्स गाडीचे आकर्षण असले तरी सध्या तरी माझी ही एस्टिलोच तिला सेबत करणार आहे.
– डॉ. प्रगती उपशाम, नेरुळ, नवी मुंबई</strong>

 ड्रायव्हिंग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. शिकताना अनेकदा मजेशीर अनुभव येतात. काही अनुभव गंभीर असतात. शिकण्याच्या या प्रक्रियेतून तावूनसुलाखून बाहेर पडल्यानंतर मिळालेले ड्रायिव्हग लायसन्स अनोखा आनंद देऊन जाते. तुमचा हा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, काही अडचणी आल्या का, तुमचा फर्स्ट हँड अनुभव कसा होता, आता तुम्ही किती सफाईदारपणे गाडी चालवता.. थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची. सोबत कारबरोबरचा तुमचा फोटोही पाठवायचा. शब्दमर्यादा २००च असावी. मग टाका गीअर आठवणींचा.. मेल करताना त्यावर ‘माझी कारकीर्द’साठी असा उल्लेख अवश्य असावा.
माहिती मेल करा.. ls.driveit@gmail.com