मागील भागात आपण लोक अदालतचा वापर करून अपघाताच्या नुकसान भरपाईचे खटले तडजोडीच्या माध्यमातून मिटवले जातात हे पाहिले होते. मात्र वाहनचालकावर मोटार वाहन कायदा तसेच भारतीय दंडसंहिते अनुसार गुन्हे दाखल होतात व या गुन्ह्य़ांचा निपटारा कसा करायचा हा प्रश्न कायम राहतो. यालाही न्यायव्यवस्थेने पर्याय शोधून काढला आहे. गुन्हे कबुली (प्ली बाग्रेिनग) या माध्यमातून अशा प्रकारचे खटले पटकन मिटवता येणे शक्य होते. याद्वारे गुन्हा कबूल केल्यामुळे न्यायालयाचा तसेच न्यायप्रक्रियेतील अनेक घटकांचा वेळ वाचतो. तसेच यात गुन्हा कबूल केल्यामुळे शिक्षेतही सुटका मिळू शकते. साधारणत: अर्धी शिक्षाही माफ केली जाते. तर काही वेळा केवळ आíथक दंडाच्या स्वरूपात शिक्षा ठोठावली जाऊन प्रकरण निकालात काढले जाते. मात्र, गंभीर स्वरूपाच्या खटल्यांमध्ये हा गुन्हे कबुलीचा वापर धोकादायक ठरतो. परंतु छोटय़ा-किरकोळ अपघातांसारख्या प्रकारात याचा वापर केला असता तो सोयीस्कर ठरतो. अशा प्रकारे या प्ली बाग्रेिनगच्या मार्गाचा वापर योग्य प्रकारे करण्यासाठी कायद्यातही योग्य असा बदल करण्यात आला. या मार्गाचा वापर करताना आरोपीला स्वेच्छेने व कोणत्याही दबावाशिवाय याबाबत न्यायालयाकडे अर्ज सादर करावा लागतो. तसेच हा अर्ज शपथपत्रासोबत देऊन हा अर्ज आरोपी स्वेच्छेने सादर करत असून, तो शिक्षेचे स्वरूप माहीत करून घेऊनच अर्ज सादर करत असल्याचे आणि यापूर्वी अशा स्वरूपाचा कोणताही गुन्हा आपल्या हातून घडलेला नाही, असा उल्लेख त्याला करावा लागतो.
या अर्जाची पडताळणी केल्यानंतर व न्यायालयाची खात्री पटल्यानंतरच न्यायालय अशा स्वरूपाचा अर्ज स्वीकारते व सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेतल्यावर सर्व खटल्याचा सांगोपांग विचार करून निर्णय देते. या बाबतीत न्यायालय आरोपीचा सहानुभूतीपूर्वक विचार करते व त्याला शिक्षेत काही प्रमाणात सूटही देते. अशा प्रकारे गुन्हे कबुलीच्या मार्गाने न्याय व्यवस्थेने प्रलंबित अपघाती प्रकरणांचा निपटारा करण्याचा मार्ग शोधला आहे. त्यामुळे गंभीर व महत्त्वाच्या प्रकरणांवर लक्ष देऊन न्याय व्यवस्थेवरील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वर नमूद तत्त्वाचा स्वीकार करण्यासाठी भारतीय फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये २१ अ (एक्सएक्सआय ए) हे नवे प्रकरण २००६ मध्ये तयार करण्यात आले आहे.