मी नुकतेच ड्रायिव्हग शिकलो आहे. दर वीकेण्डला किमान पाच जणांना शहराच्या ठिकाणी आरामात प्रवास करता येईल, अशा गाडीच्या शोधात मी आहे. कृपया मला पेट्रोल व्हर्जनमधील कोणती गाडी चांगली सूट होईल, याचे मार्गदर्शन करा. -मनीष तेजानी. 

कोणत्याही नव्या ग्राहकाला सहजसोप्या पद्धतीने आणि अगदी आरामात चालवता येऊ शकेल, अशी एकच गाडी आहे, आणि ती म्हणजे मारुती वॅगन आर. यात पेट्रोल आणि सीएनजी असे दोन्ही व्हर्जन्स उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या वयोगटांतील महिला-पुरुषांना ही गाडी सोयीची ठरते. तसेच तिच्या लांबी-रुंदीमुळे ती शहरात चालवण्यासाठी जास्त उपयुक्त ठरते. शहरात तिचा मायलेजही चांगला म्हणजे १६ किमी प्रतिलिटर असा आहे. याव्यतिरिक्तही तुम्हाला अन्य पर्याय आवश्यक असेल तर मारुतीचीच रिट्झ किंवा निसानची डॅटसन गो या गाडय़ांचाही विचार करायला हरकत नाही.

मी शेतकरी आहे. मला दररोज किमान ८० ते १०० किमीचा प्रवास करावा लागतो. कृपया मला अशी कार सुचवा की ज्यातून मला माझा शेतमालही नेता-आणता येईल आणि नियमित वापरही करता येईल. कृपया मला टाटा झेनॉनबद्दलही सांगा.
– पंकज बावस्कर, बुलडाणा
टाटा झेनॉन ही सर्वोत्कृष्ट गाडी आहे. त्यात चार बाय चार मॉडेलची सुविधा असल्याने चिखलात, खराब रस्त्यांवर तुम्ही ती सहजपणे चालवू शकता. तिला मिनी ट्रॅक्टर असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. ही गाडी ११०० किलो ग्रॅमपर्यंतचे वजन वाहून नेऊ शकते आणि पाच जण यात आरामात बसू शकतात. तसेच एसीची सुविधाही आहे त्यात. या गाडीला मागे ओपन कॅरियर असल्यामुळे तुम्हाला शेतीची अवजारे ठेवता येतील. मिहद्रा जिनिओ डीसी या गाडीचाही विचार करू शकता.

मी जानेवारी, २०१४ ला स्विफ्ट डिझायर (पेट्रोल) घेतली. केवळ ११ महिन्यांतच मी ती १३,५०० किलोमीटर चालवली. म्हणजे महिन्याला अंदाजे १२२७ किलोमीटर माझी गाडी चालली आहे. इतके अंतर केवळ ११ महिन्यांत पार करणे गाडीच्या दृष्टीने योग्य आहे का? त्यामुळे गाडीचा मेन्टेनन्स खर्च वाढेल का ?
-राजेंद्र दातार
सहसा पेट्रोल गाडीला मेन्टेनन्स नाही येत. पण एका महिन्यात १२०० किमी म्हणजे तुमचा पेट्रोलवरचा खर्च खूप झाला असेल. त्यामुळे तुम्हाला डिझेल गाडी सोईची ठरली असती. सहसा काही अडचण येत नाही, पण जर तुम्ही १००च्या वर स्पीडने चालवत असाल तर नक्कीच इंजिनमध्ये कार्बन जमा होईल आणि मायलेज खूप कमी होईल. वेळच्या वेळी ऑइल बदलले तर काही होणार नाही गाडीला.