गाणं आणि अभिनय अशा दोन्ही क्षेत्रातील उदयोन्मुख गायिका-तारका अशी प्रतिमा मिळविणारी सुपरहिट ‘टाइमपास’ चित्रपटाची नायिका केतकी माटेगावकर आता ‘काकस्पर्श’ (हिंदी व तामीळ) चित्रपटांतून देशभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. तिचा सोलो आल्बमही लवकरच प्रकाशित होणार आहे.
dr04गाणं आणि अभिनय या दोनपैकी एकाच गोष्टीची निवड करणं माझ्यासाठी खूपच अवघड बाब आहे. या दोन्ही माझ्या आवडी आहेतच, पण आता मला गायनाबरोबरच अभिनयाचीही ‘पॅशन’ वाटू लागली आहे. अशीच ‘पॅशनेट’ मी कारसाठी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. माझ्याकडे ह्य़ुंदाईची व्हेर्ना फ्लुइडिक ही कार सध्या आहे. मला कार ड्रायव्हिंग करायला खूप म्हणजे खूप आवडतं. परंतु शूटिंगला जाताना, गाण्याच्या रेकॉर्डिगला जाताना नियमितपणे मी गाडी चालवू शकत नाही. व्हेर्ना गाडीला अप्रतिम असा पिकअप आहे. मुख्य म्हणजे गाडी म्हटलं की एक विशिष्ट असा ‘लूक’ गाडीला असणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ह्य़ुंदाईच्या व्हेर्नाचा देखणा ‘लूक’ मला आवडला म्हणूनच ही गाडी घेतली. नेहमी गाडी चालवत नसले तरी शूटिंग करून किंवा गाण्याचं रेकॉर्डिग करून दमल्यानंतर व्हेर्ना गाडीत मागे आरामात झोपता येते. माझ्या गरजेनुसार ही गाडी आहे म्हणून मला ती आवडते. कार ड्रायव्हिंगचे ‘पॅशन’ही मला प्रचंड आहे. ‘अल्टिमेट ड्रीम कार’ असे मात्र विचाराल तर ‘बीएमडब्ल्यू’ हेच माझे उत्तर आहे. बीएमडब्ल्यूला असलेला आकर्षक ‘लूक’, लोगो हे माझ्यासारख्या ‘पॅशनेट कार’प्रेमीला खुणावणारं आहे निश्चितच.
केतकी माटेगावकर
शब्दांकन – सुनील नांदगावकर