सप्टेंबरमधील नरमलेल्या वाहन विक्रीच्या आकडेवारीने ऐन दिवाळसणात निरुत्साहाचा क्षण आणून ठेवला. पितृ पंधरवडय़ाचा त्यात सिंहाचा वाटा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय येणाऱ्या महिन्यातील सणांमध्येच खरेदी करावी, हा सहनशील हेतूही त्यामागे असावा. परिणामी देशांतर्गत प्रवासी कारची किरकोळ का होईना मात्र विक्री एक टक्क्याने रोडावली. वर्षभरापूर्वीच्या दीड लाखाच्या आसपासच ती यंदा फिरती राहिली. यापूर्वी सलग चार महिन्यांत त्यात वाढ राखली जात होती. वाहनांवरील उत्पादन शुल्क सवलत डिसेंबपर्यंत कायम ठेवण्यात आल्याचे स्वागत या कालावधीत होत होते.
यंदा दसऱ्यालाही फार वाहने विकली गेली असतील, असे वाटत नाही. तुलनेने नव्या उत्पादनांची अधिक रेलचेल यंदा तरी तशी फारशी दिसली नाही. तेव्हा दिवाळीपासूनही उंचावणाऱ्या आशा करण्यात अर्थ नाही. मात्र, सप्टेंबरमधील नकारात्मक प्रवास कदाचित यंदाच्या सणांमध्ये रुळावर येताना दिसू शकेल. तसे झाले तर सप्टेंबरमध्ये खरेदीसाठीचा यलो सिग्नल यंदाच्या सणांमध्ये हिरव्या रंगात परिवर्तन होताना दिसेल. कारण आता पुन्हा तसे वाहन खरेदीसाठी संधी नाही. आणि सध्या सुरू असलेल्या सवलतीच्या योजनाही राहणार नाहीत. फार फार तर उत्पादन शुल्कातील कपातीची जोड असेल.
dr555फोक्सवॅगन, होन्डा, ह्युंदाई, टाटा मोटर्स, महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा यांनी त्यांची जुनीच वाहने नव्या रूपात सादर केली आहेत. तुलनेने देशातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकीने आघाडी घेतली आहे. कंपनीने तिची नवी सिआझ सादर केली आहे. सेदान श्रेणीतील एसएक्स४ची जागा हे वाहन घेत आहे. होन्डाची नवी सिटी तसेच अमेझचा प्रगतीचा प्रवास अद्यापही कायम आहे. या स्पर्धेत एकेकाळचे मातब्बर देशी स्पर्धक महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा व टाटा मोटर्स काहीसे मागे पडले आहेत. महिंद्राने तिची लोकप्रिय स्कॉर्पिओ नव्या दमात सादर केली. सध्याच्या राजकारणाचा माहोल पाहता त्याचे यश लवकरच ऑक्टोबरच्या आकडेवारीवरून सिद्ध होईलच. मात्र एकूणच वातावरण उत्साहवर्धक नाही. सूट, सवलतींची, ३० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतची ऑफर यंदाही आहे. दिवाली धमाकाच्या जाहिराती फिरत आहेत.
dr02सप्टेंबरमधील वाहन विक्री केवळ प्रवासी कार आणि व्हॅनसारख्या उत्पादनांबाबतच निराशाजनक राहिली आहे. हे दोन्ही वाहन प्रकार यंदा नकारात्मकतेत गेले आहेत. तुलनेने बहुपयोगी वाहने व दुचाकीतील वाढ दुहेरी आकडय़ातील आहे. बहुपयोगी वाहनांमध्ये एसयूव्हीची वाढती पसंती या वाहन क्षेत्राला वर घेऊन गेली आहे. तर वधारत्या दुचाकींमध्ये स्कूटरचा हिस्सा महत्त्वाचा राहिला आहे. वाढते शहरीकरण आणि वाहतुकीतील सुलभता यामुळे गिअरलेस स्कूटरला अग्रक्रम दिला जातो. सर्वच वयोगटांतील ग्राहकवर्गाकडून या वाहन प्रकाराला पसंतीची पावती आहे. दुचाकींमध्ये यंदा मोटरसायकलमध्येही अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. एकेकाळचे व्यवसाय भागीदार राहिलेल्या हिरो व होन्डामध्ये सुरू झालेली स्पर्धा यामुळे दोन्ही कंपन्या नव्या उत्पादनावर भर देत आहे. गेल्या काही महिन्यांपासून घसरणीला सामोरे जावे लागलेल्या बजाजनेही वाहनांचे अद्ययावत रूप जाहीर केले आहे. टीव्हीएसनेही स्कूटर प्रकारात आघाडी घेतली आहे. यामाहा, पिआज्जिओ या आपल्या गटात हिस्सा राखून आहेत.
चालू आर्थिक वर्षांतील पहिला अर्धवार्षिक प्रवास पाहिला तर वाहन उद्योगासाठी ते बऱ्यापैकी चांगले गेले असे म्हणता येईल. एप्रिल ते सप्टेंबरमध्ये वार्षिक तुलनेत वाहनांनी १५ टक्के वाढ राखली आहे. तेव्हा उर्वरित अर्धवार्षिक प्रवासही याच दिशेने गेल्यास मंदीतून हे क्षेत्रही बाहेर येईल, अशी चिन्हे आहेत. २०१४-१५ मध्ये एकूण प्रवासी वाहन विक्री केवळ ५ टक्के वेगाने वाढेल, अशी भीती वाहन उत्पादक संघटनेला आहे. वाहन खरेदीला बळ देणारा आणखी एक घटक कर्ज व्याजदर तूर्त चढाच आहे. देशांतर्गत औद्योगिक उत्पादन वाढीचा प्रवास नरम असताना वाहन क्षेत्रातील निर्यात १४ टक्क्यांनी उंचावल्याचे लक्षण यशासमान आहे.