बाइकवर फिरणे हा माझा छंदच आहे. कळत्या वयापासून मी बाइकच्या प्रेमात पडलो. माझ्या घरच्यांनाही माझे हे पॅशन माहीत असल्याने त्यांनी मला कधी या बाबतीत अडवले नाही. म्हणूनच पुणे ते पानिपत या बाइक रॅलीला त्यांनी कोणतीही कुरकुर न करता परवानगी दिली. एका वर्तमानपत्रात मी ‘पानिपत २५०’ हा लेख वाचला. पानिपतावरील युद्धाला झालेल्या २५० वर्षांबद्दल तो लेख होता. पानिपताचा इतिहास पुन्हा जाणून घेण्यासाठी पुणे ते पानिपत अशी बाइक रॅलीही त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आली होती. मीही मग ठरवले की आपणही या रॅलीत सहभागी व्हावे. आयोजकांशी पत्रव्यवहार करून परवानगी मिळवण्यात साधारण एक महिना गेला. २ जानेवारीला नाशिकहून पुण्याला गेलो व शनवारवाडय़ापासून आमची रॅली सुरू झाली. पहिले दोन-तीन दिवस काही वाटले नाही. रोजचा २५० ते ३०० किमीचा प्रवास. रोज पहाटे चारला उठून आन्हिकं आटोपून पहाटे पाचला आमचा हा प्रवास सुरू व्हायचा. वाटेत भेटणारे सहकारी, लोकांकडून होणारे उत्स्फूर्त स्वागत, निरनिराळ्या प्रांतांची होणारी ओळख, यांमुळे पहिले आठ दिवस मजेत गेले. मग मात्र थकायला लागलो. जसजसे आम्ही उत्तरेकडे सरकत होतो तसतशी थंडी अंगाला झोंबू लागली होती. अक्षरश तीन-तीन शर्ट, त्यावर स्वेटर वगरे घालूनही थंडी जायची नाही. शिवाय अवघड, वळणावळणाचे रस्ते यांमुळे अनेकांनी रॅली अर्धवट सोडून घराकडे परतण्याचा निर्णय घेतला. आम्ही ओंकारेश्वर, उज्जन, हरिद्वार, काशी, मथुरा असे करत अखेरीस पानिपतावर पोहोचले त्यावेळी फक्त १५ जणच उरलो होतो. पानिपतावर आमचे स्वागत झाले. यथावकाश तेथील इतिहास समजून घेतला व २६ जानेवारीला पुन्हा नाशिकला परतलो. घरी जंगी स्वागत झाले. पुणे ते पानिपत हा तब्बल सात हजार किमीचा प्रवास मी पूर्ण केला होता, हे माझ्यासाठी अभिमानास्पद होते. तेव्हापासून बाइक चालवण्याचा माझा आत्मविश्वास दुणावला आहे. अजूनही आम्ही मित्रमंडळी सुटी लागली की जवळपासच्या एखाद्या गडकिल्ल्यावर बाइकनेच जातो.
प्रीतेश कांगुणे, नाशिक

राष्ट्रीय स्मारकाला भेट
माझ्याकडच्या टीव्हीएस स्टार बाइकने मी आतापर्यंत तब्बल तीन लाख किमी प्रवासाचा पल्ला गाठला आहे. यातील सर्वात संस्मरणीय प्रवास ठरला तो अंबड (जालना जिल्हा) ते बेळगाव हा. साडेसहाशे किमी अंतराचा हा प्रवास पूर्ण करण्यासाठी मला तब्बल १८ तास लागले होते. बेळगाव जिल्’ाातील खानापूर तालुक्यात नंदगड हे एक गाव आहे. ब्रिटिशांशी लढताना शहीद झालेल्या संगोळी रायन्ना या देशभक्त वीराचे हे जन्मगाव. येथेच त्याचे राष्ट्रीय स्मारक आहे. २४ जानेवारी २०१० रोजी मी या ठिकाणी जाण्यासाठी अंबड येथून बाइकने निघालो. बीड- बार्शीमाग्रे पंढरपूरला रात्री १२ वाजता पोहोचून मुक्काम केला.
सकाळी लवकर उठून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. माझ्या सोबतीला कैलास गायके हा मित्र होता. कोल्हापूरला जेवणासाठी विश्रांती घेऊन आम्ही बंगलोर हायवेने निपाणी बेळगाव करीत खानापूर येथे पोहचलो. तेथील पोलिसांनी बाइकचा क्रमांक पाहून तेथील आम्हाला थांबवले व आमची चौकशी केली. नंदगडबद्दल सांगितल्यावर त्यांनी आम्हाला चहा पाजून नंदगडकडे जाणा-या रस्त्यापर्यंत आणून सोडले पोलिसांनी केलेल्या मदतीने आम्ही भारावून गेलो.
१८ तासांच्या प्रवासामुळे थकवा आला होता. मात्र नंदगडला पोहचल्यावर उत्साह आला. तिथे आमची मुक्कामाची सोय चौधरीनामक व्यक्तीने केली होती. रात्री आराम केल्यानंतर २६ जानेवारीच्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला नजीकच्या शाळेत गेलो. क्रांतिवीर संगोळी रायन्नाच्या पराक्रमाविषयी एस. एल. अक्किसागर यांच्याकडून सविस्तर माहिती समजून घेतली. रायन्नाच्या स्मारकाशेजारी असलेल्या झाडाला स्त्रिया धागा बांधतात आणि रायन्नासारखा पुत्र पोटी यावा असा नवस करतात. दिवसभरातील सर्व कार्यक्रम बघून आंनदाने परतीच्या प्रवासाला निघालो. आत्तापर्यंत मी किल्ले रायगड, मुंबई, पुणे, महाबळेश्वर, नाशिक, नंदुरबार, अमरावती, नांदेड, गोवा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश व गुजरात आदी ठिकाणी माझ्या आवडत्या बाइकवरून प्रवास केला आहे.
-राम लांडे, अंबडनक्षलवाद्यांशी गाठ
चंद्रपूर जिल्हा म्हणजे कायम नक्षलवाद्यांच्या हिंसाचाराच्या बातम्यांनी गाजलेला जिल्हा समजला जातो. त्यातही अहेरीचा जंगल भाग त्यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे या ठिकाणी कोणी सहसा जात नाही. रात्रीच्या वेळी तर या किर्र जंगलात कोणी जाण्यासाठी धजावतही नाही. मी मूळचा चंद्रपूरचाच असल्याने मला याची चांगली माहिती होती. तरीही माझ्यावर एकदा प्रसंग आलाच. माझा मार्केटिंगचा जॉब असल्याने मला सातत्याने फिरतीवर राहावे लागते. चंद्रपूरच्या आसपासचा परिसर हे माझ्या कामाचे क्षेत्र. त्यामुळे सातत्याने या भागात फिरावे लागते. त्यामुळे मी करिझ्मा ही माझी बाइक घेऊनच फिरतो. एकदा मला गडचिरोलीला जावे लागणार होते. सायंकाळ झाली होती. मला वाटले आपण सहज पार करू गडचिरोलीपर्यंतचा रस्ता. माझ्या मार्गात अहेरीपण होते. म्हणजे जंगलमाग्रे जावे लागणार हे स्पष्ट होते. सर्व कल्पना असूनही मी धाडस केले.
माझा पार्टनरही काही कारणास्तव येऊ शकणार नव्हता. पण मला माझ्या करिझ्मावर विश्वास होता. निघालो सायंकाळी गडचिरोलीच्या दिशेने. अहेरीच्या जंगलात प्रवेश करताच थोडय़ा अंतरावर मला नक्षलवाद्यांनी घेरले. गाडी अडवून त्यांनी मला थांबवले. माझी सर्व विचारपूस केली. त्यांच्यातील एकाने गाडी घेऊन गावाच्या दिशेने प्रयाण केले.
नक्षलवाद्यांनी मला तिथेच थांबवून ठेवले. नंतर जंगलभर फिरवले. माझ्याकडील सर्व कागदपत्रे तपासली. शिवाय माझे आय कार्डही त्यांनी पाहिले. पोलिसांचा खबरी नसल्याची पक्की खात्री त्यांनी करून घेतली. दरडावूनच सगळी चौकशी केली. माझ्याकडून कसलाही धोका नसल्याचे लक्षात येताच त्यांनी मला पुन्हा या वाटेने न जाण्याची धमकी देऊन जंगलाबाहेर माझी रवानगी केली. गाडी गावात ठेवली होती. ती घेऊन मी पुन्हा माझ्या गावी परतलो, परत त्या दिशेने न जाण्याच्या इराद्यानेच..
-प्रकाश देऊळकर, चंद्रपूर</strong>

मी बाइकवेडा..
तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..!
शब्दमर्यादा : २०० शब्द.
ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com