मस्त लांबसडक रस्ता आहे, रस्त्यात अजिबातच ट्रॅफिक नाही, सूर्यप्रकाश एकदम छान आहे, हवादेखील मस्तानी आहे.. अशा वेळी लाँग ड्राइव्हला जाण्याची मजा काही वेगळीच असते. मग गाडीतल्या म्युझिक प्लेअर सिस्टीमवर किशोर किंवा लताची गाणी लावून त्या रस्त्यावरून गाडी चालवत दोघांनीच गप्पा मारत जाण्यासारखं सुख नाही. अशा लाँग ड्राइव्हला गेल्यावर गप्पा मारताना एक खंत लागून राहते, ‘यार, आत्ता ना स्पीड सेट करून एक्सलरेटर आणि क्लचवरचा पाय टाकून आरामात बसता आलं असतं तर..’ खरं तर या ‘तर’चं उत्तर १९४०च्या दशकातच एका अभियंत्याने देऊन ठेवलं आहे. आणि हे उत्तर आहे क्रूझ कन्ट्रोल किंवा ऑटो पायलट प्रणाली!

विमानातल्या या ऑटो पायलट प्रणालीबद्दल आपण खूप काही ऐकून असतो. या प्रणालीवर विमान सेट केलं की, ते आपला वेग, दिशा वगरे आपोआप ठरवतं. ऑटोमोबाइल क्षेत्रासाठीही हे ऑटो पायलट तंत्रज्ञान अगदी १९४५पासून अस्तित्वात आहे. राल्फ टीटर या अंध अभियंत्याने १९४५मध्ये तयार केलेल्या या तंत्रज्ञानाचा वापर १९५८मध्ये पहिल्यांदा करण्यात आला. तेव्हापासून हे तंत्रज्ञान गाडय़ांमध्ये सर्रास वापरलं जातं. या तंत्रज्ञानाद्वारे इलेक्ट्रिकल रेग्युलेशनच्या मदतीतून गाडीचा ठरावीक वेग निश्चित करून त्या वेगातच ती गाडी आपोआप चालेल, याची सोय केलेली असते. त्यामुळे चालकाला लाँग ड्राइव्ह करताना बऱ्यापकी आराम मिळू शकतो.

क्रूझ कन्ट्रोल तंत्रज्ञान काम कसं करतं?

गाडीचा वेग, वेळ आणि थ्रॉटलची नेमकी जागा यांचा आढावा घेऊन क्रूझ कन्ट्रोलचं इलेक्ट्रॉनिक कन्ट्रोल युनिट थ्रॉटल उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ निश्चित करतं. त्यामुळे चालकाने निवडलेल्या वेगातच गाडी चालू राहील, याची सोय केली जाते.
गाडी क्रूझ कन्ट्रोल किंवा ऑटो पायलट मोडवर टाकण्यासाठी गाडीत ती सुविधा असणं अर्थातच महत्त्वाचं असतं. स्टीअिरगच्या पॅनलजवळच क्रूझ कन्ट्रोलचं बटण असतं. ते बटण दाबून ऑन केल्यावर गाडी आहे त्या वेगात क्रूझ कन्ट्रोल मोडमध्ये जाते. त्यानंतर चालकाला त्याच वेगात आरामात गाडी चालवणे शक्य होते. गाडी क्रूझ कन्ट्रोलमध्ये गेली की, चालकाला क्लच किंवा एक्सलरेटर यांवर पाय ठेवण्याची काहीच गरज नसते. चालक आरामात पाय पसरून किंवा अक्षरश: मांडी ठोकूनही बसू शकतो. मात्र त्यासाठी एकच अट म्हणजे रस्ता वळणावळणाचा नसावा. तसंच क्रूझ कन्ट्रोल मोड बंद करायचा झाल्यास फक्त ब्रेक लावल्यास गाडीचा ताबा पुन्हा चालकाच्या हाती येतो. त्याशिवाय क्रूझ कन्ट्रोल पॅनलवर कन्ट्रोल बंद करण्याचं बटणही उपलब्ध असतं. मॅन्युअल ट्रान्समिशन असलेल्या गाडय़ांना तर क्लचवर पाय ठेवल्यानंतरही गाडी पुन्हा चालकाच्या ताब्यात येते. त्यामुळे हे तंत्रज्ञान वापरण्यास अगदीच सोपं असतं. विशेष म्हणजे पॅनलवर असलेलं ‘रिझ्युम’ हे बटण दाबल्यावर तुम्ही त्याआधी निश्चित केलेल्या वेगात गाडी पुन्हा क्रूझ कन्ट्रोल मोडमध्ये धावायला लागते.

फायदे काय?

ल्ल क्रूझ कन्ट्रोल तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे लांबच्या प्रवासात गाडी चालवणं खूपच सोपं होऊन जातं. अनेकदा लांबच्या प्रवासात गाडी चालवताना पाय आखडणं, चालकाला अजिबात हलता न येणं आदी गोष्टींमुळे चालकाचा जीव मेटाकुटीला येतो. पण क्रूझ कन्ट्रोल तंत्रज्ञानामुळे चालकाचा बराच त्रास कमी होतो.
ल्ल दुसरा फायदा म्हणजे या तंत्रज्ञानामुळे पशांची खूपच बचत होते. या मोडमध्ये गाडी एकाच वेगात धावते. त्यामुळे क्लचचा वापर खूपच कमी होतो. पर्यायाने इंधन बचत होते. तसंच गाडीचं एकूण आयुर्मानही वाढतं.
ल्ल आणखी एक फायदा म्हणजे गाडी एकाच वेगात चालल्याने वेग वाढण्याचा आणि वेगमर्यादा ओलांडली जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे अपघातांचं प्रमाणही खूप कमी होतं. तसंच वेगमर्यादा ओलांडल्याबाबत दंड भरावा लागत नाही, त्यामुळे त्या अनुषंगानेही आíथक बचत होते.

तोटे, कोठे कोठे?

ल्ल या तंत्रज्ञानाचा भारतात वापर करणं खूपच कठीण आहे. युरोप किंवा अमेरिकेसारखे मलोन् मल सरळसोट रस्ते भारतात अपवादानेच आढळतात. त्यामुळे कोकणातल्या प्रवासात क्रूझ कन्ट्रोल मोडवर गाडी चालवणे अशक्य आहे. तीच गत महाराष्ट्रातल्याच नाही, तर इतरही अनेक रस्त्यांबाबत आहे. पण वळणावळणाचा रस्ता नसेल, तर क्रूझ कन्ट्रोल फायद्याचं ठरेल.
ल्ल नवख्या चालकांना क्रूझ कन्ट्रोल मोडवर गाडी चालवणं, म्हणजे गाडीवरील आपला ताबा किंवा नियंत्रण सुटल्यासारखं वाटतं. गाडीच्या एक्सलरेटरवरचा पाय काढला, तरी गाडीचा वेग कमी होत नाही, ही गोष्ट अनेक नवख्या चालकांसाठी किंवा हे तंत्रज्ञान पहिल्यांदाच वापरणाऱ्या चालकांसाठी खूपच गोंधळात टाकणारी असते. त्यामुळे चालक बिचकण्याची शक्यता खूप जास्त असते.