नीलेश मोहरीर
गाणं, संगीत हे माझं पहिलं ‘पॅशन’ आहे. हे पॅशन जपताना मी माझ्या कारप्रेमालाही तेवढंच प्राधान्य देत असतो. संगीत हे माझं जसं पहिलं ‘पॅशन’ आहे. तसंच कार्स हे माझं दुसरं ‘पॅशन’ आहे असे म्हटले तरी त्यात अतिशयोक्ती ठरणार नाही. कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीला मी माझ्या आयुष्यातील पहिली कारखरेदी केली. ती माझी पहिली कार, टाटा इंडिका, आजही माझ्याकडे आहे. टाटाच्या गाडय़ांचा उत्तम परफॉर्मन्स समजला. परंतु सेडान कार्स मला खूप आवडतात. कारण म्हणजे एक तर अशा गाडय़ांमध्ये भरपूर ‘लेग स्पेस’ आणि दिसायला स्पेशस असतात. म्हणून यंदाच्या फेब्रुवारीत टाटा मान्झा ही वाईन रेड रंगाची गाडी घेतली. साधारण ७-८ लाख रुपये किमतीची ही गाडी खूप ‘स्पेशिअस’ आहे. म्हणूनच ती मला आवडते. खरे तर असे मानले जाते की, पुरुषांना एसयूव्ही गाडय़ा शोभून दिसतात. पण सेडान कार्सना माझे प्राधान्य असते. कारण त्यातील आसन व्यवस्था, मोकळी जागा, त्याचबरोबर ‘लक्झरीयस’ आणि ‘एलिगण्ट’ लूक सेडान कार्सना असतो. टाटा मान्झामध्ये हे सगळे काही आहे. म्हणूनच ही गाडी मला आवडली. भरपूर जागा आणि मोठा आकार यामुळे ही गाडी लांबून पाहिली तरी नजरेत भरते. ही माझी ड्रीम कार आहेच कारण मी माझ्या पैशातून खरेदी केली. परंतु, खरी ड्रीम कार अशी विचाराल तर बीएमडब्ल्यू आहे. बीएमडब्ल्यूची शान काही औरच. विशिष्ट मॉडेल विचाराल तर अगदी अलीकडे बीएमडब्ल्यू फोर सीरिजमधली कूपे या मॉडेलची गाडी ही माझी ड्रीम कार आहे. कधी ना कधी तरी माझी ड्रीम कार मी घेणारच हे मात्र नक्की. एक तर बीएमडब्ल्यू ब्रॅण्ड आणि या मॉडेलचा ‘लूक’ मला खूप आवडला आहे. गाणं आणि गाडी हे माझं ‘पॅशन’ आहे.
शब्दांकन : सुनील नांदगावकर