‘तू तिथं मी’ या मालिकेतील नकारात्मक भूमिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेली प्रिया मराठे गाडय़ांच्या बाबत मात्र सकारात्मक आहे! अभिनयाच्या आवडीबरोबरच तिला विविध ब्रँडच्या गाडय़ांचीही आवड आहे. तिच्या या कारप्रेमाविषयी तिने व्यक्त केलेले मनोगत..


प्रिया मराठे

अभिनयाची आवड वेगवेगळ्या छटेच्या व्यक्तिरेखा साकारून पूर्ण करायची खूप इच्छा आहे. छोटय़ा पडद्यावर खलनायिका छटेची व्यक्तिरेखा साकारल्यानंतर आता संपूर्णपणे सकारात्मक आणि न्यायासाठी झगडणारी वकील अशी आव्हानात्मक भूमिका साकारायला मिळणार आहे याचा निश्चितच आनंद आहे. अभिनयाची आवड जोपासताना आणि आव्हाने स्वीकारतानाच ‘कार पॅशन’ जोपासण्याचाही मी प्रयत्न करत असते. ड्रायव्हिंग करण्याचा आनंद शक्य तेव्हा लुटण्याचा माझा पूर्वीपासूनचा शिरस्ता आहे. सगळ्यात पहिली गाडी मी माझ्या पैशाने घेतली ती म्हणजे सेकंड हॅण्ड मारुती झेन. गाडी चालवायला शिकल्यानंतर हात साफ करण्यासाठी मी सेकंड हॅण्ड गाडी घेतली होती. चित्रीकरणाच्या ठिकाणी मुंबईत मी ही गाडी खूप फिरवली. साधारण त्या वेळी एक-सव्वा लाख रुपयांना घेतलेली मारुती झेन चालविण्याचा आनंद खूप लुटला. अलीकडेच होंडा सिटीची आयव्हीटेक या मॉडेलची चंदेरी रंगाची गाडी मी घेतली आहे. परंतु, तरीसुद्धा माझ्या सासुरवाडीला पुण्यात मी मारुती झेन अजूनही ठेवली आहे. पुण्यात गेल्यावर ती मी अजूनही आवर्जून चालविते. होंडा सिटीचे विचाराल तर होंडाचे इंजिन म्हणजे ‘मख्खन ऑन रोड’ असेच म्हणावे लागेल. मला सीडान कार आवडते पण माझा नवरा शंतनू मोघेला एसयूव्ही प्रकारातील गाडय़ा आवडतात. त्यामुळे आता आम्ही आगामी काळात फॉच्र्युनर ही गाडी घेण्याचा विचार करणार आहोत. केवळ आणि केवळ ड्रायव्हिंगचा आनंद मनमुराद लुटण्यासाठी आम्ही दोघे अलीकडेच गुजरातच्या सीमेपर्यंत जाऊन आलो. जवळपास दमणपर्यंत गेलो आणि मुंबईच्या रहदारीपासून दूरच्या महामार्गावरील रस्त्यांवर ड्रायव्हिंगचा आनंद मनमुराद लुटला. पुण्याला जातानाही एक्स्प्रेस वे सुरू झाला की मला गाडी चालविण्याचा मोह आवरता येत नाही. ‘अल्टिमेट ड्रीम कार’ विचाराल तर मर्सिडीजची दोन आसनांची लाल रंगाची गाडी ही माझी स्वप्नातली गाडी आहे. परंतु, आपल्याकडे ती वापरणे सयुक्तिक नाही असे वाटते. म्हणून फॉच्र्युनर घेणार आहोत. पण जेव्हा शक्य होईल तेव्हा मला मर्सिडीज किंवा ऑडी या कंपन्यांच्या अद्ययावत मॉडेलच्या गाडय़ा घ्यायला नक्कीच आवडेल.