‘होणार सून मी या घरची’ मधला शांत, संयत श्री उर्फ शशांक केतकर. या मालिकेने शशांकचे जीवनच बदलून गेले. मालिकेच्या माध्यमातून शशांक घराघरात पोहोचला. मात्र, मिळालेल्या लोकप्रियतेने शशांक बदलला नाही. आजही तो पूर्वीसारखाच साधा-सरळ आहे. शशांकने त्याच्या ‘ड्रीम कार’ विषयी केलेले शेअरिंग त्याच्याच शब्दात..
‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतील श्री गोखले ही भूमिका मिळाली आणि अल्पावधीत लोकप्रिय ठरली. त्यापूर्वी अन्य वाहिनीवर एक मालिका केली होती. परंतु, श्री गोखले या व्यक्तिरेखेने सारेच काही बदलून टाकले. आधी मी बाबांची गाडी चालवायचो, त्याची साफसफाई, देखभाल सगळे आवडीने करायचो. ‘होणार सून..’ पूर्वी मी एक सेकण्ड हॅण्ड गाडी घ्यावी अशा विचारात होतो. परंतु, ‘होणार सून..’ सुरू झाल्यानंतर स्वतंत्रपणे स्वत:च्या पैशातील नवीन गाडी घेण्याचा निर्णय घेतला आणि मी बरीच शोधाशोध करून, बरीच मॉडेल्स पाहून त्याचे फायदे-तोटे पाहून मारूती सुझुकीची ‘एर्टिगा’ या मॉडेलची पांढऱ्या शुभ्र रंगाची गाडी डिसेंबर, २०१३ मध्ये घेतली. हीच गाडी का घेतली याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मला मोठी ‘स्पेशिअस’ गाडी खूप आवडते. एर्टिगा ही सात आसनी गाडी आहे. घरच्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन फिरायला जाणे यासाठी जशी ही गाडी उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे चित्रीकरणासाठी जाताना लागणाऱ्या सर्व गोष्टी, तयार कपडय़ांचे जोड, अन्य सामान सहजपणे ठेवता येते आणि शिवाय आपल्यासोबत अन्य लोकांनाही गरज पडली तर घेऊन जाता येते इतकी ही गाडी मोठी आहे. म्हणून एर्टिगा मॉडेल खरेदी करण्यास प्राधान्य दिले. मोठय़ा गाडीची ऐट आणि उपुयक्तता या दोन्ही दृष्टीने मला मोठी गाडीच आवडते. साधारण ९ लाख रुपये किमतीची माझ्या आवडत्या पांढऱ्या शुभ्र रंगाची माझी एर्टिगा स्वच्छ ठेवणे, नियमितपणे सव्र्हिसिंग करणे हे मी स्वत: करतो. गाडीची शान राखायची तर गाडी दुरून पाहिल्यावर सुद्धा चकचकीत शुभ्र रंग नजरेत भरणारा असतो. म्हणून मी शुभ्र रंगाची एर्टिगा गाडी घेणे पसंत केले. माझ्या मनात ठरवलेली, मनात भरेलली जी माझी ‘ड्रीम कार’ म्हणता येईल अशी एकच गाडी आहे. ती म्हणजे ‘व्होग’.
शब्दांकन : सुनील नांदगावकर